‘काश्मीर की कली’ हा १९६४चा सिनेमा. त्याला अजून १५ दिवसांनी बरोबर ५९ वर्षे होतील. पण त्यातली गाणी कुठे लागली, तर आजही असंख्य रसिक ती स्वत:शीच गुणगुणू लागतात. जवळच्या टेबलावर ठेकासुद्धा धरतात! ही ताकद होती दोन जणांची. पहिले म्हणजे संगीतकार ओ. पी. नय्यर आणि दुसरे गीतकार एस. एच. बिहारी!
सिनेमाचे निर्माते-दिग्दर्शक होते शक्ती सामंत. शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर बरोबर होते प्राण आणि नाझीर हुसैन. सोबत धुमाळ आणि पद्मा चव्हाण या दोन मराठी कलावंतांशिवाय होते मदन पुरी, टूनटून आणि सुंदर.
धनाढ्य मिल मालकाचा लाडावलेला मुलगा राजीव लाल (शम्मी कपूर) वडिलांच्या मृत्यूनंतर मिलमध्ये मनमानी गोंधळ घालतो. त्यामुळे त्याच्या विधवा आईला चिंता वाटू लागते. मग घरातील जुनी नोकर करुणा (मृदुला राणी) त्याचे लग्न करून टाकायचा सल्ला देते. आईने दाखवलेल्या सर्व मुलींना काहीना काही उपद्व्याप करून शम्मी कपूर पळवून लावतो. मात्र शेवटी या सगळ्यांतून सुटका करून घ्यायची म्हणून वडिलांच्या कश्मीरमधील बंगल्यात जाऊन राहण्याचा सल्ला त्याला मित्र देतो आणि त्याप्रमाणे तो जातो. तिथे त्याची भेट फुले विकणाऱ्या चंपाशी (शर्मिला टागोर) होते आणि सिने-रीतीप्रमाणे तो तिच्या प्रेमात पडतो! तेव्हापासून त्यांचे लग्न होईपर्यंत आलेल्या अडचणींची गुंतागुंत आणि सुंदर गाण्याची मेजवानी म्हणजे हा सिनेमा!
‘कश्मीर की कली’मध्ये जुन्या परंपरेप्रमाणे भरपूर गाणी होती. म्हणजे एकूण चक्क ९, तीही आपल्या दृष्टीने भरपूर, तेव्हाच्या स्टँडर्डप्रमाणे नाही! कारण त्या काळी नॉर्मल सिनेमातसुद्धा १२/१२ गाणी असत. सर्वच गाणी लोकप्रिय झाली! मग ते ‘दिवाना हुवा बादल’ असो, ‘हैं दुनिया उसीकी जमाना उसीका’ असो ‘सुभानल्ला, हंसी चेहरा, ये मस्ता अदाये’ किंवा ‘किसी न किसीसे, कभी न कभी, कही ना कही, दिल लगाना पडेगा,’ नाही तर ‘तारीफ करू क्या उसकी, जिसने तुम्हे बनाया,’ असो! सर्वच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली.
असेच एक अगदी रोमांटिक गाणे होते शर्मिला टागोर आणि शम्मीकपूरच्या तोंडी. स्वर आशा भोसले आणि रफीसाहेबांचा. बहुतेक गाण्यांना संगीतकार ओ. पी. नैयर यांनी त्यांच्या ब्रँडचे खास ठेकेबाज संगीत दिले होते! बिहारीसाहेबांनी नव्यानेच प्रेमात पडलेल्या जोडीच्या सुरुवातीच्या ‘परस्पर स्तुतीच्या खेळकर काळातील’ प्रेमसंवादाचा मूड इतका छान पकडला होता की श्रोता लगेच स्वत:ही त्या मूडमध्ये जाऊ शकत असे. प्रेयसी लाडिकपणे प्रियकराला विचारते आहे, ‘तू दोन-चार प्रेमळ, नटखट इशारे काय केलेस आणि मी चक्क तुला वश झाले रे! ही किमया तू कुठून शिकून आलास?’ आता नायकही तिची मनसोक्त स्तुती करण्याच्याच मूडमध्ये आहे. तो म्हणतो, ‘तू आधी हे सांग, नजरेच्या नुसत्या एक-दोन कटाक्षात घायाळ करून टाकायचे तू तरी कुठे शिकलीस ते जरा सांगशील का? मीही तिथेच शिकलो असे समज!’
इशारों इशारोंमें दिल लेनेवाले (आशा)
बता ये हुनर तूने सीखा कहाँसे…
निगाहों निगाहोंमें जादू चलाना,
मेरी जान सीखा हैं तुमने जहाँसे…
रफीसाहेब रोमँटिक गाण्यांच्या वेळी काहीसा खोडकर, काहीसा खास आर्जवी स्वर लावत असत. त्यांच्या आवाजात शम्मी कपूर गायचा, राजकपूर गायचा, देव आनंद गायचा, खरे तर त्या काळाचे कुणीही त्यांच्याच आवाजात गायचे आणि रसिक ते प्रत्येक गाणे डोक्यावर घेत असत! ‘कश्मीर की कली’च्या या गाण्यात नायक नायिका प्रेमाच्या सुरुवातीच्या अत्युच्च उन्मादात आहेत. उर्दूत याला ‘जुनून’ म्हणतात. मनाची ती अवस्था मोठी मजेदार असते. तारुण्यातील शारीरिक अनुभवांच्या आनंदापेक्षा कधी कधी ही अमूर्त भावनाच माणसाच्या मनाला जास्त फुलवते, मोहरून टाकते!
उत्कट अस्सल प्रेम आणि अनावर परस्पर आकर्षणाच्या काळात त्या एका आवडत्या व्यक्तीशिवाय काहीही सुचत नसते. रुचत नसते. शम्मी कपूर अगदी निरागसता दाखवत शर्मिलाला विचारतो, ‘मला तू आवडलीस यात माझा काय दोष गं? तुझी एकेक हालचाल अशी होती की, मी घायाळच होत गेलो ना!’ ‘प्रिये, जुन्या हीर-रांझाच्या प्रेमकथेमधील, रांझासारखी किंवा लैला-मजनूमधील मजनूसारखीच माझीही कहाणी तुझ्यामुळे आकारास येतीये.’
मेरे दिलको तुम भा गए,
मेरी क्या थी इसमें खता,
मुझे जिसने तड़पा दिया,
यही थी वो ज़ालिम अदा…
ये राँझाकी बातें, ये
मजनूके किस्से,
अलग तो नहीं हैं मेरी दास्तांसे…
इशारों इशारोंमें दिल…
यावर प्रिया थोडीच गप्प बसणार? तीही त्याला लटक्या रागात सुनावते, ‘जे प्रेम करतात ना, ते काही आपल्या प्रेमाची अशी जाहीर वाच्यता करत नसतात, बरं का!’ आपल्या जीवलग व्यक्तीला ते असे पुन्हा पुन्हा ‘माझे तुझ्यावर किती प्रेम आहे!’ ते जातवतही नसतात. मनातली प्रत्येक भावना थोडीच अशी जाहीरपणे सांगायची असते? आणि जर असे स्वत:च्या तोंडानेच आपल्या प्रेमाची कबुली दिली, तर मग त्यात मजाच ती काय राहिली? गाण्यात प्रेमातली काहीशी खेळकर नोकझोक आहे. पण आशाताईंनी असा लाडीक आवाज काढलाय की त्यामुळे शर्मिला अधिकच सुंदर वाटून जाते.
मुहब्बत जो करते हैं वो,
मुहब्बत जताते नहीं…
धड़कने अपने दिलकी कभी,
किसीको सुनाते नहीं…
मज़ा क्या रहा जब की खुद कर दिया हो,
मुहब्बतका इज़हार अपनी ज़ुबांसे…
निगाहों निगाहोंमें…
मग हे प्रेम-कम-लटके-भांडण असेच सुरू राहते. प्रियकर म्हणतो, ‘प्रिये, तू लाखात एक आहेत हे मान्यच आहे गं! पण जरा माझ्या चोखंदळ, रत्नपारख्या नजरेलाही दाद देशील की नाही? वसंत ऋतूलाही ज्या फुलाचा मोठा अभिमान वाटत होता, मी तेच फूल बरोबर निवडले ना?’ मग माझ्या रसिकतेचे काही कौतुक, काही कदर?
माना की जान-ए-जहां,
लाखोंमें तुम एक हो…
हमारी निगाहोंकी भी,
कुछ तो मगर दाद दो…
बहारोंको भी नाज़ जिस फूलपर था,
वही फूल हमने चुना गुलसितांसे…
इशारों इशारोंमें दिल…
जुने कवी अशी उत्कट भावनेची द्वंद्वगीते समरसून लिहीत. त्यात कधी परस्पर-प्रेमाचा कबूलनामा असे, तर कधी परस्परांनी केलेल्या प्रतारणेबद्दलची तक्रार. कधी विरहाच्या असह्य दु:खातून आलेली वेदना, तर कधी ‘त्या बाजूने’ आलेल्या प्रेमाच्या अनपेक्षित होकाराचा बेधुंद उत्सव!
आताच्या चंगळवादी, बेफाट, आत्मकेंद्रित, उच्छृंखल धांगडधिंगाण्याचा ऊबग आला, तर यूट्यूबवर जावे आणि टाइम-मशीनमध्ये शिरून सरळ त्या आश्वस्त, शांत, समृद्ध, संगीतमय सप्तरंगी स्वप्नांच्या काळात घटकाभर जाऊन मन ताजेतवाने करून घ्यावे, इतके, तर अजूनही आपल्या हातात आहेच की!
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…