- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन अाहे तसेच अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. देशातील १२ ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे.
भारतात अनेकविध मंदिरे आढळून येतात. यातील बहुतांश मंदिरे अगदी प्राचीन असल्याचे दिसून येते. या मंदिरांचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. भारताने आजवर अनेक आक्रमणे झेलली. परकीय आक्रमकांनी भारतातील हजारो मंदिरांचीही नासधूस केली. अनेक आक्रमणे झेलूनही अनेक मंदिरे आताच्या घडीलाही अगदी डौलाने उभी आहेत. महाराष्ट्रालाही मोठी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्रातही अनेक प्राचीन मंदिरे आहेत. अतिशय सुप्रसिद्ध असलेले आम्रनाथ मंदिर म्हणजेच आताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा इतिहास, महत्त्व व मान्यता अगदी विशेष आहेत.
अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील मांवाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०-६१ मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मांवाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते. या ठिकाणाचे मूळ नाव ‘आम्रनाथ’ असे होते, ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले. या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव पडला आहे, असे सांगितले जाते. हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. मात्र काही अभ्यासकांच्या मते, अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे. हे एकच भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागांत आहे. गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती व गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे.
सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की, अनेक वलये उठावीत, अशी एकामागोमाग एक अनेक वर्तुळे कोरली आहेत. मंडपाच्या खांबांवर अंत्यत कोरीव अशी मूर्ती आहे. या भिंतीवर एकूण ७० अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर-पार्वतीच्या विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत. तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक असल्याचे म्हटले जाते. या मंदिराजवळ एक गुहा असून, ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते.
केवळ मुंबई, महाराष्ट्रातील नाही, तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले. मात्र कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते. मात्र याला आधार असल्याचे दिसून येत नाही. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)