Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींनी ८० कोटी गरीबांना दिली दिवाळी भेट

पंतप्रधान मोदींनी ८० कोटी गरीबांना दिली दिवाळी भेट

पुढील पाच वर्षे मिळणार मोफत रेशन

दिवाळीचा सण काही दिवसांवर आला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो गरीब जनतेला दिवाळीची मोठी भेट दिली आहे. केंद्राच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे आता देशातील ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळणार आहे. या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी गरीबांना सरकारकडून रेशन दिले जाते. दिवाळीचा सण आठवडाभरावर असताना या योजनेच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील गरीब जनतेला दिलासा मिळाला आहे.

छत्तीसगडमधील दुर्ग येथे पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी मोफत रेशन योजनेला पाच वर्षे मुदतवाढ देण्याची घोषणा केली. या महिन्यात छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये ९० जागांच्या विधानसभेसाठी ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

‘कोरोना’नंतर सुरु केली योजना
कोरोना महामारीनंतर केंद्र सरकारने ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ सुरू केली होती. कोरोना महामारीनंतर लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. विशेषत: गरिबांना खाण्यापिण्याच्या संकटाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गरीबांच्या मदतीसाठी मोफत रेशन योजना सुरु केली होती. त्या योजनेचा ८० कोटी देशवासी लाभ घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिसेंबरमध्ये योजना संपुष्टात येणार होती
‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मिळतो. लाभार्थ्यांना हे धान्य मोफत मिळते. केंद्र सरकारने सर्वप्रथम ३० जून २०२० रोजी याची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या ही योजना डिसेंबर २०२३ मध्ये म्हणजेच पुढील महिन्यात संपणार होती. आता ५ वर्षांच्या मुदतवाढीनंतर, लोकांना डिसेंबर २०२८ पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेबद्दल म्हणाले की, भाजप सरकारने आता देशातील ८० कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना आणखी ५ वर्षे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचे बळ देत आहेत’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -