प्रा. डॉ. गजानन सीताराम शेपाळ
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक कारागिरांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या चरितार्थ चालविणाऱ्या व्यवसायाला पारंपरिक कला या नजरेतून पाहून एक प्रगल्भ असा दृष्टिकोन समस्त भारतीय समाजासमोर मांडला आहे आणि त्यावर शासन निर्णय देखील घेतला आहे. ही बाब देशाच्या कला आणि संस्कृतीला जपणारी, तर आहेच तथापि भारतीय कला आणि संस्कृतीचा सन्मान देखील वाढविणारी आहे. पारंपरिक कलांचा आणि आमच्या सर जे. जे. स्कूलचा ऋणानुबंध आहे, असे मला वाटते.
मी, विश्वविख्यात सर ज. जी. उपयोजीत कला महाविद्यालय, मुंबई येथे १९९६पासून दृश्यकला विषयांचे अध्ययन करीत आहे. २०१४ च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत महाराष्ट्र शासनाच्या ई-पोर्टलवर महान्यूजवर आमच्या सर जे. जे. स्कूल वर लेखमाला लिहीण्याचा योग आला होता. त्या अानुषंगाने सर जे. जे.शी संबंधित दस्तऐवज अभ्यासताना अनेक अभिमानास्पद बाबी वाचायला मिळाल्या. १८५७ ला स्थापन झालेल्या सर जे. जे. स्कूल पूर्वी मुंबईत कलाशाळाचे वर्ग इतरत्र भरविले जायचे आणि तेव्हा कला शाळा वा आर्ट स्कूल न म्हणता “कारागिरांचा वर्ग” म्हणून संबोधले जायचे. तेव्हा “कलाकार”, “आर्टिस्ट” असे शब्द नव्हते. त्यांना “कारागीर” या नावाने संबोधले जायचे.
सर जमशेठजीं जिजिभाईंच्या टेक्सटाइल ॲण्ड वेविंग या व्यवसायाला त्यांना रंगकाम करणाऱ्या कारागिरांची आवश्यकता असायची. त्यासाठी ते युरोपातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनांना भेटी देत असत. तेथील कलाकृती पाहून त्या निर्माण करणाऱ्या कांही कारागिरांची ते भेट घेत असत. त्यांच्याकडून त्यांच्या कपडा व्यवसायाला पोषक अशा कलाकामाचं “डिझाईन” किंवा आताच्या भाषेत “आर्टवर्क” बनवून घेत असत. भारतात मायदेशी आणि मुंबईत आल्यावर त्या डिझाईन्सचा ते कापडाल रंगीत बनविण्यासाठी उपयोग करीत असत. हे काम वेळ खाणारं होतं. खर्चिक तर होतंच; परंतु कठीणही होतं. परदेशी कारागिरांवर अवलंबून राहावं लागायचं. अशा परिस्थितीत त्यांनी एक निर्णय घेतला आणि समकालीन मित्र व सहकारी यांच्याशी केलेल्या विचारमंथनातून तत्कालीन कंपनी सरकारकडे १८५०च्या दरम्यान कारागिरांची शाळा स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला. पुढे सततच्या पाठपुराव्यामुळे आणि सर जमशेठजींच्या तत्कालीन कंपनी सरकारकडे असलेल्या प्रतिष्ठेमुळे १८५७ मध्ये भारतात पहिली कारागिरांची शाळा मुंबईत सुरू झाली. ज्या शाळेला चालविण्यासाठी आवश्यक देणगी सर जमशेटजी जिजिभाई यांनी दिली म्हणून सदर कारागिरांच्या शाळेला सर जे. जे. कलाशाळा असे नाव देण्याचा ठराव तत्कालीन कंपनी सरकारने पारीत केला. पुढे हीच कलाशाळा “सर जे. जे. आर्ट स्कूल” झाले. कंपनी सरकार या स्कूल ला “सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट” या नावाने संबोधू लागले.
या स्कूलमध्ये शिकणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांना कारागीर म्हणून संबोधले जायचे. ज्यांना शिकवायला ब्रिटिशांनी लंडनहून अर्थात पश्चिमेकडील त्यांच्या देशातून शिक्षक मागवले होते. त्यावेळी सर जमशेटजींनी खास मद्रासहून मिस्टर हंटर यांना मुंबईत बोलावून घेतले होते. मिस्टर हंटर यांचा प्रशासनिक अनुभव दांडगा होता. त्यांनी सर जे. जे. स्कूलच्या अभ्यासक्रमाचे विषय, कारागिरांना स्कॉलरशिप्स, फ्री शीप्स इत्यादी विषयांचे अत्यंत विचारपूर्वक नियोजन करवून दिले. त्यावेळचे कारागिरांचे विषय हे तत्कालीन बारा बलुतेदारांच्या व्यवसायाशी निगडित होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दगडावर कारागीरी, लाकडावर कोरीव काम अर्थात कारागिरी, कागदावर रेखीव काम अशा एक नव्हे अनेक विषयांद्वारे त्यावेळच्या सामाजिक, व्यावसायिक आवशयकते नुसार सर जे. जे. कलाशाळेत कारागिरांना प्रशिक्षण दिले जायचे.
हा मला योगायोग वाटत नाही. पंतप्रधान विश्वकर्मा योजना आणि सर जे. जे. स्कूलचा ऋणानुबंध आहे, असं मला वाटतं. नुकताच सर जेजेमध्ये १९ ऑक्टोबरला एक कार्यक्रम झाला ज्यासाठी देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान स्वतः आले होते. सर जेजेला “डिम्ड टू बी डिनोव्हो”चा उच्च शैक्षणिक स्तर शिकविणाऱ्या संस्थेचा स्तर… हा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. हा कार्यक्रम खास महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि कला संचालनालयाने आयोजित केला होता. दृश्यकला शिक्षणातील उच्च दर्जाचे कलाशिक्षण कला विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी “डिनोव्हो”चा दर्जा देत असतानाच केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली की, “पंतप्रधान विश्वकर्मा योजना”मध्ये काम करण्यासाठी आम्ही, सर जे. जे. स्कूलमध्ये पाच दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करू.
फार सुंदर मिलाफ आहे हा…!! उच्च कलाशिक्षणासाठी “डिनोव्हो”चा दर्जा आणि पारंपरिक, जुन्या, नामशेष होऊ पाहणाऱ्या कलांना-कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी “पंतप्रधान विश्वकर्मा योजना”, ज्या योजनेद्वारे १८ प्रकारच्या पारंपरिक कला-कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्याचा निर्णय… ज्या कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी “जेजे”चा भविष्यातील सहभाग… हे समिकरण म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या कलाभिरुचीच्या प्रगल्भतेची चुणूक दाखविणारे आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलेल्या ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची’ माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्त-कलाकार आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी “पीएम विश्वकर्मा योजने”ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. सदर योजनेसाठी १३,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. “पीएम विश्वकर्मा योजने”च्या पहिल्या टप्प्यात अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. १-सुतार, २-होडी बांधणी कारागीर, ३-चिलखत बनवणारे, ४-लोहार, ५-हातोडी आणि अवजार संच बनवणारे, ६-कुलूप बनवणारे, ७-सोनार, ८-कुंभार, ९-शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे), १०-चर्मकार (पादत्राणे कारागीर), ११-मेस्त्री, १२-टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर, १३-बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे, १४-न्हावी (केश कर्तनकार), १५-फुलांचे हार बनवणारे कारागीर, १६-परीट (धोबी), १७-शिंपी आणि१८-मासेमारचे जाळे विणणारे.
खरं तर मायबाप सरकारने आणखीही काही कला प्रकारांचा सदर योजनेत अंतर्भाव करावयास हवा. अर्थात सदर योजना गठीत करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशा अप्रसिद्ध किंवा सहज लक्षात न येणाऱ्या पारंपरिक कलांची माहिती अवगत नसावी. म्हणूनच अशी काही नावे मुद्दाम उद्धृक्त करीत आहे. जसे की “रांगोळी”, “नंदीबैल सजवून गावोगांव फिरविणारे”, ”हातावरील-पायावरील मेंधी”, “गोंधण (आत्ताच्या भाषेत टॅटू), “काचेच्या वस्तू बनविणार”, “कागदी कलाकाम करणारे” (ज्याला जपानी भाषेत ओरइगआमई म्हणतात), “साईनबोर्ड पेंटर”, “वृंदावनची सांझी आर्ट” असे कांही पारंपरिक कला प्रकार आहेत ज्यांच्यावर उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंब भारतात इतरत्र आहेत. या व अशा अनेकांना या योजनेचा लाभ व्हावा, असे जरी असले तरी मूळ या साऱ्या कला जिवंत राहतील. अशी आशा या योजनेमुळे वाढली आहे. खरं तर अशा प्रकारच्या योजना यशस्वीपणे राबवायच्या असतील, तर त्या विषयांच्या जाणकार व्यक्तींना अशा योजनाची प्रमुख जबाबदारी द्यायला हवी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने नुकतीच १३,००० कोटी रुपये खर्चाच्या “पीएम विश्वकर्मा” या नवीन केंद्र सरकारी योजनेला, पाच वर्षांच्या कालावधीसाठी (आर्थिक वर्ष २०२३-२४ ते आर्थिक वर्ष २०२७-२८) मंजुरी दिली. हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त-कलाकार आणि कारागिरांची गुरू-शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हस्त-कलाकार आणि कारागिरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवून, विश्वकर्मा, स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील, हे सुनिश्चित करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, हस्त-कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल, तसेच ५% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यात रु. १ लाखपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रु. २ लाखपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. त्याशिवाय, ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य, डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल. ही योजना देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिरांना मदत करेल. पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात वरील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाईल, असा निर्णय केंद्र सरकारने अंमलबजावणी साठी देशा लागु केला आहे. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान सर जेजेच्या परिसराला खास भेट द्यायला आले तेव्हा बोलत होते. त्यांच्या भाषणात कुठेही घोषणाबाजी दिसली नाही. ते तळमळीने आणि आत्मियतेने बोलत होते. आम्ही सर जेजेत जे कलाध्यापन करतो, त्या जवळपास साऱ्याच विषयांमध्ये वरील अठराच काय त्याहूनही अधिक विषयांवर अध्यापन करीत असल्यामुळे या साऱ्या पारंपरिक कलांना कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वच ठिकाणी उपयोगात कसे आणता येईल, हे आम्ही आमच्या उपयोजित कलेमार्फत समर्थपणे सांगू शकतो. हे धर्मेंद्र प्रधान यांनी ताडले असावे.
कुठल्याही प्रकारच्या कारागिरांना जर अधिकृतपणे प्रशिक्षण मिळाले, तर त्यांची मेहनत, अनुभव आणि चिकाटी या त्रिगुणांना जेजे व आणखी काही कला महाविद्यालयांचा सहभाग अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुंफला गेला, तर मला खात्री आहे “पंतप्रधान विश्वकर्मा योजना” ही वैश्विक रूप धारण करण्यास विलंब लागणार नाही. (लेखक सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई येथे प्राध्यापक आहेत.)
gajanansitaramshepal@gmail. com
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…