- टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
‘संगीत अवघा रंग एकचि झाला’ हे नवीन संगीत नाटक सध्या नव्या कलाकारांच्या संचात रसिकांना पाहायला मिळत आहे. त्यामधील सोपान वेलणकरची भूमिका साकारणारा कलावंताचे प्रेक्षकांकडून भरपूर कौतुक होत आहे. तो कलावंत आहे ॐकार प्रभुघाटे. शास्त्रीय गायक व अभिनेता या दोन्ही भूमिका त्याने लीलया पार पाडल्या आहेत.
डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. शाळेत असताना तो तबला वादन करायचा. समूहगीत, विज्ञान प्रदर्शनात व इतर सांस्कृतिक कार्यक्रमात तो भाग घ्यायचा. त्याचे वडील विनायक प्रभुघाटे संगीत नाटकात काम करायचे. त्यांनी त्यांचे गुरू पंडित एस. के. अभ्यंकर यांच्याकडे त्याला शास्त्रीय संगीत शिकण्यास पाठविले होते. त्यानंतर जवळजवळ १२ वर्षे त्याने गुरुजी मधुकरबुवा जोशी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.
केळकर महाविद्यालयातून त्याने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत त्याने भाग घेतला. मुंबई विद्यापीठाच्या ‘युथ फेस्टिव्हल’मध्ये देखील त्याने भाग घेतला. महाविद्यालयात असताना तो बाहेरचे संगीत कार्यक्रम देखील करीत होता. मराठी सारेगम पर्व पहिल्या रिॲलिटी शोमध्ये देखील त्याने भाग घेतला होता. पहिल्या टॉप पन्नासमध्ये त्याचा समावेश होता. आकाशवाणीतर्फे आयोजित अभंग व नाट्य संगीतामध्ये त्याचा संपूर्ण भारतामधून प्रथम क्रमांक आला.
एम. कॉम. झाल्यानंतर त्याला पहिलं संगीत नाटक मिळालं, ज्याच नाव होत ‘संगीत हाच मुलाचा बाप’ त्यानतंर अनेक स्पर्धेत त्याने भाग घेतला. सुश्राव्य शोध स्पर्धेत त्याचा ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिलेकडून सत्कार करण्यात आला. राम मराठे अभंग स्पर्धेत तो विजेता ठरला होता. पुण्याच्या भारती विद्यापीठातून क्लासिकल म्युझिकमधून ॐकारने एम. ए. केले.
त्यानंतर ॐकारच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. त्याला संगीत अवघा रंग एकचि झाला या नव्या रूपातल्या नाटकात सोपान वेलणकरची भूमिका साकारायची संधी मिळाली. डॉ. मीना नेरुरकर या नाटकाच्या लेखिका व दिग्दर्शिका आहेत. सोपान हा आधुनिक विचारांचा आहे. त्याचे वडील आप्पा वेलणकर हे प्रख्यात कीर्तनकार आहेत. त्याच्या वडिलांच्या गीतांना आधुनिक साज चढवून तो मार्केटमध्ये आणण्याचा त्याचा विचार आहे. त्या गीतांना वेस्टर्न संगीत देण्याचा त्याचा विचार आहे; परंतु त्याच्या वडिलांना म्हणजे आप्पा वेलणकरांना हे पटत नसत. ते त्याला घराबाहेर काढतात. अशा प्रकारची त्याची या नाटकामध्ये व्यक्तिरेखा आहे. या नाटकाच्या लेखिका व दिग्दर्शिका डॉ. मीना नेरुरकर यांच्या सोबतच्या कामाचा अनुभव विचारले असता ॐकार म्हणाला की, “त्या त्यांच्या मताबद्दल ठाम असायच्या. त्यांनी मला माझी भूमिका साकारायचे पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते.” या नाटकाच्या कोणाकडून, कशा प्रकारे प्रतिक्रिया मिळाल्या असे विचारले असता तो म्हणाला की, “हे नाटक माझ्या आई-बाबांना फार आवडले. या नाटकात जेव्हा मला घराबाहेर काढले जाते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते.”
माझे गुरुजी पंडित सुरेश बापट यांनी देखील माझ्या नाटकातील अभिनयाचे कौतुक केले. माझ्या पहिल्या. नाटकाचे दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर यांनी देखील माझ्या नाटकातील भूमिकेचे कौतुक केले. त्यांना माझे गाणे माहीत होते; परंतु आता या नाटकातील अभिनय पाहून ते देखील खूश झाले. “तू एक उत्तम अभिनेता म्हणून बाहेर वावरतोस” असे ते म्हणाले. या नाटकाला रिपीट प्रेक्षक वर्ग येतोय. ही या नाटकाची जमेची बाजू आहे.
गाणी, संगीत ऐकणे, क्रिकेट, चित्रकला त्याला आवडते. गोष्ट ऐकायला आवडते. शास्त्रीय गायनात तर तो पारंगत आहेच; परंतु आता अभिनयामध्ये देखील ॐकारने बाजी मारलेली आहे.