Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडाWorld Cup Cup 2023 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर; 'या'...

World Cup Cup 2023 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर; ‘या’ खेळाडूला दिला प्रवेश

मुंबई : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये (World Cup Cup 2023) भारतीय संघ (Team India) सध्या फॉर्ममध्ये असून सहा सामने जिंकत भारताने उपांत्य फेरीतील (Semi finals) आपला प्रवेश निश्चित केला आहे. भारताला ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ नोव्हेंबरला नेदरलँडशी असे अजून दोन सामने खेळावे लागणार आहेत. दरम्यान, भारताचा एक स्टार खेळाडू, उपकर्णधार आणि उत्तम गोलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) झालेल्या सामन्यात पांड्याला दुखापत झाली होती. त्यावर सध्या उपचार सुरु असून तो सामना खेळू शकणार नाही.

बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यात तो केवळ तीन चेंडू टाकू शकला होता. पुनर्वसनासाठी तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. त्यानंतर तीन सामने भारताने पांड्याशिवाय खेळले. पांड्याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, यंदाचा वर्ल्डकप भारताला पांड्याशिवायच खेळावा लागणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नाही.

भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यात हार्दिक पांड्याचा सिंहाचा वाटा होता. त्याच्यासारखा अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडूने पुढील सामन्यांमध्ये नसणं, हे भारतासाठी खूप धक्कादायक आहे. हार्दिकच्या जागी आता प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्धला बॅकअप म्हणून तयार राहण्यास सांगण्यात आले आणि तो एनसीए बंगळुरू येथे होता.

ICC ने हार्दिकला वर्ल्ड कपमधून वगळण्याची पुष्टी केली. त्यानंतर शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, प्रसिद्धला वर्ल्डकपचा अनुभव नाही. प्रथमच वर्ल्डकप संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याशिवाय भारताची उपांत्य फेरीतील खेळी किती दमदार असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -