- करिअर : सुरेश वांदिले
कोणत्याही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तशी पहिलीपासूनची सगळीच वर्षे महत्त्वाची असतात. मात्र मुलगा/मुलगी दहावीमध्ये गेल्या गेल्या पालकांना, मुलाच्या भविष्याविषयी काळजी वाटू लागते. या काळजीपोटी मग ते, आता मुलाने काय करायला हवे, म्हणजे त्याचे भविष्य सुरक्षित होईल असे ज्याला-त्याला विचारायला लागतात. त्यासाठी वेगवेगळ्या समुपदेशकांकडे जातात. मुलांची कलचाचणी, मानसशास्त्रीय चाचणी करून घेतात. इतकं सगळं केल्यावरही, मुलाने पुढे काय करावे? ही चिंता काही जात नाही.
व्यावसायिक म्हणजे शास्त्रीय पद्धतीने केलेल्या या चाचण्यांचे निकाल, त्यावरून समुपदेशकांनी काढलेले निष्कर्ष, त्यांच्यासोबत झालेली चर्चा इतक्या बाबी हाताशी असूनही पालकांना काळजी कां वाटावी? हा प्रश्नच आहे.
या कलचाचण्या अनेक कसोट्या, प्रश्न आदींचा वापर करून केलेल्या असतात. त्याचे काही ठोकताळे असतात. त्यानुसार मुलांच्या बुद्धिमत्तेला काय पेलवेल याविषयी एक सर्वसाधारण मत व्यक्त केले जाते. दोन – पाच विषयांपर्यंत पर्याय सुचवले जातात. याचा अर्थ या पाचपैकी कोणताही एक पर्याय निवडला तरी पुढे करिअर घडणे अवघड जाऊ नये, अशा प्रकाराचा तो दिलासा असतो. आता, समुपदेशक हा काही जादूगार किंवा भविष्यवेत्ता नाही की तो त्याच्या समोर आलेल्या निष्कर्षानुसार, अमूक मुलाने फक्त हाच विषय घ्यावा म्हणजे तो यशस्वी होणारच, असे सांगू शकत नाही. ते शक्यही नाही. समुपदेशाकडे गेलेल्या पालकांना मात्र आपल्या पाल्यासाठी अशा एका करिअर (हमखास यश देणाऱ्या) पर्यायाची अपेक्षा असते. ती अपेक्षा समुपदेशाकडून पूर्ण होताना दिसली नाही की मग ते आणखी कुणा दुसऱ्या समुपदेशाकडे जातात किंवा आणखी एखादा मार्गदर्शक निवडतात.
गोंधळात वाढ –
या सर्वांमुळे अधिक गोंधळ होऊ शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. एकदा का समुपदेशकाकडे जाण्याचा निर्णय घेतल्यावर, त्याने दिलेल्या पर्यायांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. तीन-चार पर्याय दिल्यावर, त्यातल्या कोणत्या पर्यायामध्ये म्हणजे विषय घटकांमध्ये आपल्या पाल्याला अधिक गती- आवड-रुची आहे हे पालकांना कळायला हवे. पाल्य सुद्धा याबाबात पालकांना स्पष्टपणे सांगू शकतो. त्या पद्धतीने त्याला बोलते करायला हवे. चित्रकला किंवा नृत्य कला असे दोन पर्याय दिले असतील, तर आपला पाल्य कशात अधिक रमतो, हे तर एव्हाना पालकांना कळलेच असेल. किंबहुना ते कळायला हवे. समुपदेशकाच्या सेवा घेण्यापूर्वी सर्वच पालकांनी आपल्या मुलात असणाऱ्या गुणांच्या सक्षम बाजूंची उजळणी करायला हवी.
प्रत्येक मुलातच काही ना काही वैशिष्ट्यं असतेच असते, हे शास्त्रीय तथ्य आहे. तुमच्या मुलाला गणितात अधिक गती आहे की मैदानात त्याचा जीव अधिक रमतो किंवा दोन्ही गोष्टी त्याला चांगल्या जमतात, हे तर पालकांना कळायलाच हवे. मुलाला गणितात गती आहे पण पालकांना मात्र त्याने स्पोर्ट्स पर्सन (क्रीडापटू म्हणणे जरा गावठी वाटू शकते.) तेही क्रिकेटर व्हावे असे वाटत असेल, तर त्याची विकेट जाणार हे पक्कं. मुलगा विविध चित्र, आकृत्या, पेंटिग यात मस्त रंगतो हे दिसत असूनही त्याने पुढे सीए (चार्टर्ड अकाउंटंन्ट) व्हावे असा आग्रह धरणे किंवा अपेक्षा करणे म्हणजे ताळेबंद चुकलाच म्हणून समजा. मुलांचे प्रत्येक गुण-अवगुण हे तो दहावीपर्यंत पालकांच्या डोळ्यादेखत विकसित होत असतात. या गुण अवगुणांमध्ये त्याच्या करिअरची बिजं दडली असतात.
गुण-अवगुणांचे विश्लेषण –
कोणता गुण अधिक चांगला आणि कोणता अवगुण अधिक वाईट याचे विश्लेषण आई-बाबांनी करायलाच हवे. अभ्यासापेक्षा बॉडीबिल्डिंसाठी सतत व्यायाम शाळेत किंवा जिममध्ये पळणाऱ्या मुलांचा हा अवगुण असल्याचं काही पालकांना वाटू शकतो. मात्र अशी मुलं फिटनेस-योग-मॉडेलिंग- सैन्यदल-कुस्ती-ज्युदो-शरीरशौष्ठव – सुरक्षा सेवा-पोलीस दल अशा सारख्या क्षेत्रात उज्वल करिअर करू शकतात. तेव्हा समुपदेशकाकडे जाताना या सर्व बाबी लक्षात ठेऊन त्यांच्यासोबत चर्चा विनियम करायला हवे. मुलाच्या गुण-अवगुणांशी सुसंगत, समुपदेशकांचे निष्कर्ष येत असतील तर प्रश्नच मिटला. पण येत नसतील तेव्हा, त्यांना अशा गुण- अवगुणांची स्पष्ट आणि पारदर्शक कल्पना देणे गरजेचे आहे. त्यानुसार समोरचे निष्कर्ष आणि त्यांचा अनुभव व या क्षेत्रातील ज्ञान यांचा मेळ घालून समुपदेशक आणखी सुयोग्य मार्गदर्शकन करू शकतात.
पालकच खरे समुपदेशक –
समुपदेशकापेक्षाही आपल्या पाल्याला सर्वार्थाने ओळखण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षांपर्यंत आपल्या डोळ्यासमोर असणाऱ्या पाल्याचे गुण-अवगुण- दुर्गुण जर ओळखता येत नसतील, तर मग मात्र कितीही उच्च दर्जाचा आणि भरपूर शुल्क घेणारा व भरपूर अनुभव असणारा समुपदेशक असला तरी मुलांच्या करिअरचे गणित चुकू शकते, हे लक्षात ठेवलेले बरे.