Thursday, September 18, 2025

Fraud : गुडघेदुखीवरील उपचाराच्या बहाण्याने साडेसात लाख रुपयांची फसवणूक

Fraud : गुडघेदुखीवरील उपचाराच्या बहाण्याने साडेसात लाख रुपयांची फसवणूक
  • गोलमाल : महेश पांचाळ

७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी भगवान शंकराच्या दर्शनाला बाबुलनाथ मंदिरात चालली होती. पत्नीला गुडघेदुखीचा त्रास असल्याने तिला नीट चालता येत नव्हते. काठीचा आधार घेत ती पावले टाकत होती. इतक्यात मंदिराकडे जाणाऱ्या रांगेतून कुलदीप शर्मा नावाच्या व्यक्तींने त्या दोघांना थांबवले. तो त्यांच्याजवळ आला. या जोडप्याची त्याने विचारपूस केली. तिनेही चालण्यास खूप त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिला अशा आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा नंबर दिला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक पतीने त्या फोन नंबरवर कॉल केला आणि त्याला डॉ. आर. पटेल बोलत असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीला होत असलेल्या वेदनांबद्दलची माहिती संबंधिताला दिली. त्यानंतर डॉ. पटेल म्हणाले की, ते ३० सप्टेंबर रोजी माटुंगा येथे असतील आणि ज्येष्ठ नागरिकाच्या घरी येऊन ते रुग्ण महिलेची तपासणी करण्यात येईल, असे उत्तर मिळाले. त्यानुसार “सकाळी ८.३० च्या सुमारास डॉक्टर म्हणून भासवणारी व्यक्ती आणि त्याचा साथीदार पत्नीच्या गुडघ्याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेथे त्यांनी महिलेचा गुडघा ब्लेडने कापला आणि पतीला थोडे गरम पाणी आणण्यास सांगितले,” त्यानंतर पत्नीच्या गुडघ्यातून पू काढायचा आहे ज्यासाठी त्याला गरम पाण्याची गरज होती. त्या डॉक्टराने सांगितले की, पूच्या प्रत्येक बिंदूसाठी तो ७,५०० रुपये खर्च आकारला जाणार आहे. कथित डॉक्टरने एक लहान लोखंडी पाइप देखील वापरला आणि त्यात काही द्रव ओतले. ज्यावर त्याने पू असल्याचा दावा केला. त्यानंतर या कथित डॉक्टरने जोडप्याकडे साडेसात लाख रुपयांची मागणी केली. "माझ्या घरी एवढी रोकड नाही आहे, असे या ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. त्यानंतर त्या डॉक्टरचा साथीदार ज्येष्ठ नागरिकांसोबत पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता. त्याला रोख रक्कम दिली आणि दोघे निघून गेले. मात्र, वेदना कमी होत नसल्याने जोडप्याने १५ ऑक्टोबरच्या आसपास पुन्हा डॉ. पटेल यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी सांगितले की, ते २७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरी येणार आहेत. मात्र, पटेल फिरकले नाहीत तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या जोडप्याच्या लक्षात आले. त्यांचे फोन घेणेही बंद केले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. हे ज्येष्ठ नागरिक कोर्टात वकिली करत होते. आता वयोमानानुसार, प्रॅक्टिस करत नव्हते. आपल्यासारख्या वकिली व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तीची अशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घोटाळ्यात तीन लोक सामील आहेत, त्यापैकी एकाने दाम्पत्याची फसवणूक करण्यासाठी डॉक्टर असल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत, जिथे ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जात आहे, अशा घोटाळ्यांमध्ये राजस्थानस्थित टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्हेगाराचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

भगवान के घर मे देर है, अंधेर नही, असे बोलले जाते. बाबुलनाथचे दर्शन घेण्यासाठी जात असताना, एका अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून या जोडप्याला फसविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे पोलीस आरोपीला नक्कीच अटक करतील असा विश्वास त्या जोडप्यालाही वाटतो; परंतु विशेषत: अनोळखी व्यक्तीकडून अशा स्वरूपात ज्येष्ठ नागरिकांना फसविले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे, मदतीचा शब्द उच्चारणारा प्रत्येक जण देवदूत असेलच, याची खात्री देता येत नाही.

maheshom108@ gmail.com

Comments
Add Comment