- पाचवा वेद : भालचंद्र कुबल
२०१७ साली जेव्हा ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ नामक मालिका दिलीप प्रभावळकरांच्या मध्यवर्ती भूमिकेने गाजली, तेव्हा त्याचा सादरीकरणाचा पॅटर्न हेच विशेष सूत्र होतं. रिटायर्ड आयुष्यात बायकोपासून लपविलेल्या चुकांची प्रहसनात्मक कबुली जबाब हा यातील कथाबीजाचा जीव आहे. प्रभावळकरांनी स्वतःमधले अभिनययुक्त सूप्त गुण कसे अधोरेखित होतील, याचा विचार करून बेतलेली ही संहिता आहे. एखाद्या नटाची परफाॅरमन्स स्टाईल एकदा का प्रेक्षकांनी स्वीकारली की ती पुसून टाकायला फार अवधी लागतो. कारण चूक त्या नटाची नसते, त्याने लोकप्रिय केलेल्या त्या कॅरेक्टरची असते. प्रभावळकरांनी चिमणरावांपासून आत्मसात केलेली स्टाईल तोडायलाही बराच काळ गेला. त्यासाठी त्यानी रात्र आरंभ, द एन्काऊंटर, हसवा फसवीसारखे स्टायलाज्ड रोल मार्केट करावे लागले. चूकभूल मालिकेबाबत प्रेक्षकांच्या आग्रहास्तव तेच ते जुने प्रभावळकर सादर होत राहिल्याचे आपण सारेच साक्षीदार आहोत. मूळ नाट्यसंहिता मालिकारूपात सादर होत असताना त्यात झालेले बदल एपिसोडीक होतील का? आणि त्याचे उत्तर “हो” आले तर अर्ध्या तासासाठीची ती परफेक्ट करमणूक ठरते. आयुष्याच्या उत्तरार्धात बायकोपासून लपविलेल्या गोष्टींची कबुली अर्ध्यातासाच्या त्या मालिकेचा प्लस पॉइंट होता; परंतु अडीच तासांच्या नाटकाबाबतीत हा प्रयोग प्रचंड फसला आहे. त्यामुळे नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या नाट्य प्रयोगाबाबतची काही निरीक्षणे लक्षात आणून द्यावीत, यासाठीच हा लेखन प्रपंच…!
या अगोदरच्या लेखमालांमधून मी नमूद केल्याप्रमाणे पोस्ट कोविड नाटके चालण्यास ज्या घटकांची आवश्यकता आहे, ते सर्व घटक या नाटकात आहेत. मर्यादित पात्रसंख्या, मालिकांमधून गाजलेल्या भूमिकांमधलेच कलाकार, हलका फुलका विनोदीबाज आणि संहितेतील नावीन्य या गोष्टींचा विचार या नाट्यनिर्मितीच्या वेळी झाला असणार. अर्थात ही अपरिहार्यता सद्य काळातली व्यावसायिकता आहे, हे अनेक नाटकांवरून सिद्धही झाले आहे. महेश डोकफोडे दिग्दर्शित आणि अक्षय मुदवडकर व अक्षया नाईक अभिनित “चूकभूल द्यावी घ्यावी” हे नाटक पोस्ट कोविड नाटकांच्या फाॅर्म्युलास अपवाद नाही.
हल्ली नाटकातही पहिल्या पंधरा मिनिटांच्या कथानकात काहीतरी घडावे लागते जसे मालिकेमधे ते सातव्या किंवा आठव्या मिनिटाला घडवले जाते. नाटकाबाबत ‘घडणे’ ही प्रक्रिया दहाव्या ते बाराव्या मिनिटानंतर अपेक्षित असते. नाटकाचे कथासूत्र एस्टॅब्लिश व्हायला तेवढा वेळ हा जातोच. या बाबींचा विचार करता ‘चूकभूल’ इंट्रोडक्शनमध्येच रेंगाळायला सुरुवात होते… आणि तोपर्यंत अक्षय व अक्षयाचा चार्म निस्तेज झालेला असतो. दोघेही मालिकांमधले आघाडीचे फलंदाज असूनही तरुण आणि म्हातारपणीच्या भूमिकांची खांदेपालट करता करता दोघांचीही दमछाक होते. मग अशा वेळी दिग्दर्शकिय क्लृप्त्या वापरल्या जातात. महेश डोकेफोडेचं “गांधी हत्या आणि मी” हे राज्यनाट्य स्पर्धेतलं नाटक पाहण्याचा योग आला होता. नाशिक केंद्रातून अव्वल ठरलेल्या नाटकासाठी महेशच्या दिग्दर्शनातील अथांगता आपण अनुभवलेली आहे. आम्ही प्रेक्षक तीच विविधता शोधत राहातो. पण त्यातही निराशाच पदरी पडते. शेवटी शेवटी, तर कधी एकदा मध्यांतराचा पडदा पडतो असे होते. चार पात्रांचे नाटक त्यात चौघांचेही प्रामाणिक प्रयत्न असूनही नाटकाचा पहिला अंक लांबतो आणि लांबत जातो. अमृता तोडरमल ही देखील थिएटरचे प्रमाण ज्ञान असलेली कलाकार आहे. त्यामुळे सर्वांचे प्रयत्न आटोकाट असूनही पहिला अंक प्रभावहीन ठरतो. असे का झाले असावे?, प्रेक्षक म्हणून या प्रहसनात मी का गुंतू शकलो नाही?, याचा अभ्यासक म्हणून विचार केला असता दोन महत्त्वाची कारणे समोर येतात. पहिले म्हणजे नाटकाचा वेग वाढवायचा झाल्यास आजची प्रेक्षकांची मानसिकता विचारात घेऊन केले जावे असे ‘संहिता संकलन’. संहितेमधील अवाजवी संवादाना सरळ फाटा देऊन पहिला अंक काॅम्पॅक्ट बनवावाचं लागेल.
दुसरे कारण म्हणजे नाटकाचे नेपथ्य. साधारणपणे नाट्यसमीक्षक ते जर डोळ्यांस आल्हाददायक, विलोभनीय दिसत असेल, तरच त्याचा उल्लेख करत असतात; परंतु अवाजवी व कथासूत्राचा विचार न करता केलेले नेपथ्य, दिग्दर्शक व कलाकारांच्या परफाॅर्मन्ससाठी मारक आणि अकारण ठरते, याचा विचार संदेश बेंद्रेनी करावा.
संदेश बेंद्रे हे आजच्या काळातील आघाडीचे नेपथ्यकार आहेत. ९० टक्के (किंवा जास्तच) मराठी नाटके आज त्यांच्या नावावर रन होताहेत. अशा वेळी व्यस्ततेतून वेळ काढून एखाद्या नाटकावर विचार करावा, हे कदाचित शक्य झाले नसावे आणि कथासूत्राच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाले असावे. नेपथ्याच्या आराखड्यानुसार दोन तृतीयांश नाटक हे रंगमंचाच्या उजव्या बाजूस (प्रेक्षकांच्या दृष्टीने) घडते. किचनचा दरवाजा, कपाट आणि बेड हे नेपथ्यातील महत्त्वाचे घटक आहेत. यांची मांडणी उजव्या बाजूस केल्याने नाटक सतत तिरक्या मानेने बघावे लागते. पात्रांच्या एण्ट्री आणि एक्झिट याच उजव्या बाजूच्या मागील बाजूस आरेखित केल्याने तो वापरही विचारात घ्यावा लागतो. सुंदर सुंदर डिझाईन्सचे लाइट्स, भिंतींचा आल्हाददायक रंग, टेबल, खुर्च्या, सोफा, वाॅल पेंटिंग्ज, यांचे लेटेस्ट पॅटर्न्स म्हणजे नेपथ्य का? नेपथ्य रचनाशास्त्रानुसार जवळपास दोन तृतीयांश प्रतलिय वापर नेपथ्यकाराने टाळल्याने पूर्ण नाटकावर त्याचे पडसाद उमटले आहे. नेपथ्यशास्त्रात रंगमंच प्रतलाचे जे नऊ भाग पडतात, पैकी सहा भागांचा वापरच न केल्याने दिग्दर्शकही पात्रांच्या मुव्हमेंट्सच्या बाबतीत हतबल झालाय.
नेपथ्यातील प्राॅपर्टीच्या बाबतीत एक मूलभूत नियम सांगितला जातो, तो म्हणजे “तुम्ही जर भिंतीवर बंदूक टांगून ठेवलीत, तर तिचा वापर हा नाट्यमयता वाढवायला झालाच पाहिजे” (While using Gun as a property on the set, it must be fired) सेटवर अशी ‘उगाच प्रापर्टी’ वापर न केल्याने नजरेला बोचत राहते. उदाहरणच घ्यायचे झाले, तर लपाछपीसाठी वापरल्या गेलेल्या कपाटावरची डार्क निळ्या रंगाची डफल बॅग. बरं, वर म्हटल्याप्रमाणे प्रेक्षक सातत्याने उजवीकडचेच प्रसंग बघत असल्याने व फ्लॅशबॅकमधेही ती तिथेच असल्याने, सारखे वाटत राहाते यातून काहीतरी स्फोटक घटक बाहेर पडणार…! पण कसलं काय…! एकंदरीत काही बाबतीत नाटकाची पुनर्बांधणी ही अत्यावश्यक आहे. नेपथ्य हा त्यातील प्रमुख घटक आहे.
मराठी नाटकवेडा प्रेक्षक फार भोळा आहे. त्याला आपण खर्च केलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला मनोरंजनातून मिळाला की त्या आनंदावर तो सहा महिने काढतो. भक्तिमय साम्राज्यावर अधिराज्य गाजवणारे स्वामी समर्थांचे लाइव्ह दर्शन अथवा कमनीय बांधा नसलेली सर्वसाधारण मुलीचे प्रतिनिधित्व करणारी मनात भरलेली सुंदरा त्या प्रेक्षकवर्गाचे वीक पाॅइंट कॅश करताना ही तारेवरची कसरत आहे हे निर्मात्यानेही विसरू नये. म्हणूनच सुरुवातीला साचेबद्ध परफाॅर्मन्स स्टाईलबद्दल लिहिलंय.
दुसरा अंक मात्र आटोपशीर आणि खुसखुशीत झालाय. महेश डोकफोडे आणि अमृता तोडरमल, श्री. व सौ. वाडेकरांच्या भूमिकांमधून धमाल घडवतात. पण पुन्हा स्वामी समर्थांच्या भूमिकेला तडा जाणारा दारू पिण्याचा प्रसंग बघताना तमाम भक्तगण अस्वस्थ झालेला मी प्रयोगात पाहिला. यावर तोडगा काय काढावा? हा खरं तर संशोधनाचा भाग होईल; परंतु हे नाट्य निरीक्षण असल्याने मला ते नमूद करावेसे वाटते.
‘चूकभूल द्यावी घ्यावी’ हे नाटक हलक्या फुलक्या वृत्तीचे असल्याने रंजकतेच्या निकषांवर खरे उतरते; परंतु “कॅरेक्टर ईमेज”च्या वावटळीत सापडण्याची भीती वाटते. व्यावसायिकतेचे करेक्ट गणित मांडलेले हे नाटक स्वामी समर्थ ही मालिका संपल्यानंतर रंगमंचावर आले असते, तर त्यास अधिक यश मिळाले असते, असा माझा भाबडा अंदाज व निरीक्षण सांगते.