आदित्य ठाकरे कोणकोणत्या ड्रग माफिया सोबत पार्टी करतो हे तू सांगतोस की मी सांगू?
आमदार नितेश राणे यांचे संजय राऊतांना ओपन चॅलेंज
ड्रग मुक्त महाराष्ट्राची सुरुवात मातोश्री पासून करा
मुंबई : आज सकाळी संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) अंमली पदार्थांबद्दल गृहमंत्री साहेबांनी तोंड उघडावं, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्या घरात कोणीतरी पूजा केली आणि तो ड्रग्जच्या प्रकरणात सापडला, असा काहीतरी विषय बाहेर आला आहे. पण मी संजय राऊतला विचारतो की, तुझ्या मालकाचा मुलगा दिनोच्या घरी आयुर्वेदिक उपचारासाठी जायचा का? की सत्यनारायणाच्या पूजेला जायचा? जुना महापौर बंगला जिथे आता बाळासाहेबांचं स्मारक उभं राहणार आहे, तिथे अमली पदार्थांचं सेवन कसं आणि कधी व्हायचं? कोण तिथे यायचं? कुठली बॉलिवूडची अभिनेत्री तिथे यायची? याचंही प्रदर्शन आम्हाला द्यावं लागेल, असे एकावर एक खडे सवाल उपस्थित करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला. आदित्य ठाकरेंच्या एकेका कारनाम्याची आठवण करुन देत नितेश राणे यांनी ड्रग्जमाफियांचा भागीदार नेमका कोण होता, हे उघड केलं आहे.
नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पूजा करायला गेले होते. त्यावेळी पूजा सुरु असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पूजेच्या मध्येच उठून गाडीमध्ये जाऊन बसला होता. तिथे अशी चर्चा सुरु होती की तो शुद्धीत नव्हता. नेमकं काय केलं होतं? कुठल्या नशेत होता? हे त्यालाच माहित. कोणत्या नशेने त्याचा श्वास कोंडल्यामुळे त्याला गाडीत जाऊन बसावं लागलं? त्यामुळे तुझ्या मालकाचा मुलगा किती शुद्ध आहे, कोणकोणत्या ड्रग माफिया सोबत पार्टी करतो याचंही टॉवर लोकेशन आम्हाला महाराष्ट्राला दाखवावं लागेल, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.
सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियनच्या (Disha Salian) ८ जून आणि १३ जूनच्या पार्टीमध्ये तुझ्या मालकाचा मुलगा शुद्धीत होता का? याचं आधी आम्हाला सर्टिफिकेट दे आणि मग दुसर्यांवर अमली पदार्थ आणि ड्रग्जमुक्त महाराष्ट्राची भाषा कर. तुझ्या मालकाच्या मुलाचं प्रकरण बाहेर आलं तर देश सोडून जावं लागेल, त्यामुळे त्याच्या अवघड जागेच्या दुखण्यावर बोट ठेवू नकोस, नाहीतर तुला दिवाळीचा बोनस पण नाही मिळणार. ड्रग मुक्त महाराष्ट्राची सुरुवात मातोश्री पासून करा आणि मग उर्वरित महाराष्ट्रावर लक्ष द्या, असा सल्ला नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला.
तू आणि तुझ्या मालकाने शिवसेनेचं अवमूल्यन केलं
कोरोना नंतर सर्वात गतीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये असेल. पण ह्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या अनाडी कामगाराला कधीच कळणार नाहीत. शिवसेना नावाच्या संघटनेचं त्याने अवमूल्यन करुन टाकलं आहे. ज्या बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा चढता आलेख होता, तेच आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाजारात उद्धव ठाकरेच्या कारकिर्दीत उबाठा नावाचं छोटं मित्रमंडळ झालं आहे. म्हणून देशाच्या आणि रुपयाच्या अवमूल्यनाबाबत बोलण्याअगोदर तू आणि तुझ्या मालकाने शिवसेनेचं अवमूल्यन कसं केलं त्याबद्दल एक अग्रलेख लिही. तुझ्यासारख्या चवन्नीएवढी किंमत असणार्या लोकांमुळे आज शिवसेनेसारख्या बलाढ्य संघटनेची काय अवस्था झाली आहे, हे तुझ्या अग्रलेखातून कळू दे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
पैसे घेऊन जागोजागी तमाशा करणारा संजय राऊत
संजय राऊतांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, दुसऱ्यांना नौटंकी बोलण्याअगोदर संजय राऊतचं स्वतःचं आयुष्य हे कुठल्या तमाशावाल्यांपेक्षा कमी नाही. पैसे घेऊन जागोजागी तमाशा करणार्या लोकांपैकी हा संजय राऊत आहे. तमाशा करणार्या लोकांना तरी मानसन्मान असतो, ते प्रामाणिक असतात. पण संजय राऊत जे लोक त्याला तमाशासाठी पैसे देतात त्यांच्याशीच गद्दारी करतो, त्यामुळे त्याने दुसर्यांच्या नौटंकीबद्दल बोलू नये.
सचिन वाझेंना नितेश राणे यांचं चोख प्रत्युत्तर
सचिन वाझे यांनी ड्रग्जमाफियांना राज्यात संरक्षण दिलं जातं, असा आरोप केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षावर दोन तीन आठवडे येऊन राहायचा. सचिन वाझे कोण होता मग? प्रदीप शर्मा कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता होता? दिनो वगैरेची गँग वर्षाच्या कुठल्या खोलीमध्ये जाऊन डिस्को लाईट लावायची? दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा, असं नितेश राणे म्हणाले.
मनोज जरांगेंनी व्यवस्थित काळजी घ्यावी…
मनोज जरांगे पाटील हे माझे समाज बांधव आहेत. माझी अपेक्षा आहे की, त्यांनी मुंबईतल्या एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तर ते लवकर बरे होतील. समाजासाठी ते खूप मोठं काम करत आहेत. म्हणून राजकारण आणि समाजकारण एका बाजूला ठेवून एक समाजबांधव म्हणून त्यांची चिंता काल होती, आज आहे, उद्या ही राहील. म्हणूनच मी सरकारला पत्र लिहिलं आहे की, त्यांना ताबडतोब सुरक्षा देण्यात यावी. जरांगेंना धोका आहे असं जी टवाळकी बोलत आहेत, त्यांचाच काही हात असेल का? म्हणून मनोज जरांगेना व्यवस्थित औषधपाणी करण्याची मी विनंती करेन.
हल्ले करणारे बिगर मराठा
घरफोडी जाळपोळ करणारे मराठे नाहीत. शिवरायांच्या विचारांवर चालणारे निरपराध लोकांना गालबोट लागू देणार नाहीत. हल्ले करणारे बिगर मराठा आहेत. हिशोब चूकता करण्यासाठी ते करत आहेत. लोकशाही मध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मराठा आरक्षण आपल्याला मिळणार आहे. संयम ठेवला तर कोणालाही आंदोलन करण्याची गरज नाही. सरकार आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये सातत्याने चर्चा होत राहील. त्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार अॅक्शन मोडवर काम करत आहे. जरांगे पाटलांची दिवाळी जशी आम्ही गोड केली तशी नवीन वर्षात त्यांना गोड बातमी देऊ, असं नितेश राणे म्हणाले.