कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील शिवकालिन दुर्गाडी किल्ला एका तरुणाने बनावट कागदपत्रे तयार करून नावावर केल्याची घटना घडली आहे. ऐतिहासिक किल्ल्याची जागा नावावर करणाऱ्या महाभागाच्या विरोधात विविध कलमानुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सुयश शिर्के (सातवाहन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला सुयश शिर्के याने 12 सप्टेंबर 2022 रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील 5 ते 7 कागदपत्रांवर शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले कागदपत्रे अर्जासोबत जोडले होते. सदरच्या जागेचे प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्याने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले होते.
कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच्या जागेचे वंशज असल्याचं दाखूवन बनावट कागदपत्रांच्या आधारे तो स्वतःच्या नावाने केला. मात्र जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी असलेल्या महिला अधिकारी प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला. घुडे यांनी 2 नोव्हेंबर रोजी सुयश शिर्के (सातवाहन) यांच्यावर भादंवि कलम 420, 465, 466, 468, 471, 773 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यानच्या काळात किल्ल्याची पडझड झाल्याने दुरुस्ती करावी म्हणून स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाशी पत्र व्यवहार करून किल्ल्या संदर्भात लेखी माहिती मागवली असता, सदरची जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी द्यावी असा उल्लेख करत पोलिसांना कळविण्यात आले. यावरुन या गुन्हेगाराचा सुगावा पोलिसांना लागला.