
नवी दिल्ली: भारताची राजधानी दिल्ली आणि जवळील राज्यातील शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे लोकांना श्वास घेणेही कठीण होत चालले आहे. सगळीकडे स्मॉग दिसत आहे. आरोग्य तज्ञांनी सकाळी फिरण्यासही मनाई केली आहे. आज सकाळी दिल्लीमध्ये धुराची चादर पसरलेली दिसली. एकूण AQI ३४६ सोबत दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खूपच खराब श्रेणीमध्ये आहे.
तर गुरूवारी दिल्लीच्या १२ ठिकाणांवरील हवेची गुणवत्ता पातळी ४०० पार म्हणजेच गंभीर स्थितीत पोहचली आहे. रेस्पिरर रिपोर्टनुसार ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत पीएम २.५चा स्तर देशात सर्वाधिक होता आणि २०२१नंतर यात सातत्याने वाढ होत आहे.
रिपोर्टनुसार, गेल्या पाच वर्षातील हवेच्या गुणवत्तेबाबत विश्लेषण रिपोर्टमध्ये सांगितले गेले की येथील देशातील चार प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. तर लखनऊ आणि पाटणासारख्या राज्याच्या राजधांनीमध्ये घसरण झाली आहे.
दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकातामध्ये ऑक्टोबर २०२३मध्ये पीएम २.५चा स्तार एक वर्षाआधी तुलनेत अधिक होता. तर चेन्नईत एक वर्ष आधी तुलनेत २३ टक्के घसरण झाली होती. राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सगळीकडे धुके तसेच वातावरण थंड होते. तेथील कमीत कमी तापमान १६.३ डिग्री सेल्सियस होते.