- जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै
ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे.
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ
बापरखुमादेवीवरू विठ्ठलु सकळ।
अकळ व सकळ या दोन्ही शब्दांचे अर्थ कळले पाहिजेत. आपण म्हणतो ते हे सकळ नव्हे. सकळ म्हणजे कळणारा, कळण्यात येणारा हा त्याचा अर्थ आहे. शून्य म्हणजे आपल्याला जे दिसत नाही ते. आकळता येते त्यापलीकडचे म्हणजे मन, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ते शून्य. स्थावर म्हणजे Material. जंगम म्हणजे living गोष्टी. हलते चालते ते जंगम. “व्यापूनी राहिला अकळ.” सर्व व्यापून राहिला म्हणजे उरला, तो अकळ आहे म्हणजे कळण्यात येणार नाही. “बापरखुमादेवीवरू विठ्ठलु सकळ.”
रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी
देही असोनिया देव,वृथा फिरतो निदैव।
देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी
नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी।
दुधी असता नवनीत, नेणे तयाचे मथित
तुका सांगे मूढजना, देव देही का पाहाना।
इथेसुद्धा एकेक दृष्टांत दिलेले आहेत. पण परफेक्ट कुठलाच नाही. “नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी.” “दुधी असता नवनीत,नेणे तयाचे मथित” हा दृष्टांत जरा जवळ जाणारा आहे. “तुका सांगे मूढजना, देव देही का पहाना.” देवाला पाहण्यासाठी कुठे शोधत जाता? चारधाम. घाम गाळतात, दाम खर्च करतात व शेवटी दमून जातात, आता आपल्या घरी जाऊया. कितीही फिरलात, तरी घरी आल्याशिवाय बरे वाटत नाही. घारापुरीला जा नाही, तर पाणीपुरी खायला जा शेवटी घर ते घर.
सांगायचा मुद्दा परमेश्वराबद्दल कितीही बोलले, तरी ते limited बोलता येते. अकळ व सकळ हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या ठिकाणी तो सकळ आहे. ईश्वररूपाने आपण त्याचा बोध घेऊ शकतो. किंबहुना होतो निरनिराळ्या प्रकारे. हा बोध कसा घ्यायचा, त्याला पाहायचे कसे? त्याला अनुभवायचे कसे हे सद्गुरू शिकवितात. म्हणून,
सद्गुरूवाचोनी
सापडेना सोय,
धरावे ते पाय आधी आधी।
आपणासारिखे करिती तत्काळ,
नाही काळवेळ तयालागी।
लोह परिसाची न साहे उपमा,
सद्गुरू महिमा अगाध।
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन,
गेले विसरोनी खऱ्या देवा।
सद्गुरूंना शरण जायचे की जायचे नाही, हे तू ठरव. म्हणून ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’