माझे कोकण: संतोष वायंगणकर
महाराष्ट्रातील कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची चर्चा, राजकीय वक्तव्य आणि भाषण चाळीस वर्षांपूर्वी सतत होत असायची. त्यावेळी शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सतत एक प्रश्न पडलेला असायचा. या कॅलिफोर्निया म्हणतत ता आसा तरी कसा? याचे कारण त्याकाळचा राज्यातून कोकणात येणारा प्रत्येक नेता आमचे काँग्रेसचे सरकार कोकणचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही, असे नेहमीच भाषणातून सांगण्याचा प्रयत्न करायचे. कोकणवासीयांना ही भूलथाप आहे, हे नंतरच्या काळात कळून आले. सृष्टीसौंदर्याने नटलेलं कोकण हे किती सौंदर्यवान आहे, याचीही चर्चा होऊ लागली. कोकणातील समाजवादी विचारवंत बॅ.नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांनी संसदेतील भाषणांतून एक वेगळा विचार दिला. या विचारांचे गारूड कोकणच्या जनतेवर तब्बल पंचवीस वर्षे राहिले.
कोकणच्या जनतेला कोकण रेल्वेचे प्रा. मधू दंडवते यांनी दाखवलेलं स्वप्न त्यांच्याच प्रयत्नातून देशाचे अर्थमंत्री असताना सत्यात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. नंतर कोकणच्या डोंगर-दऱ्या पार करीत अशक्य वाटणारी रेल्वे धावू लागली; परंतु कोकणातील मूलभूत प्रश्न, समस्या यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न मात्र खऱ्या अर्थाने १९९० नंतरच सुरू झाला. १९९५ साली महाराष्ट्रात अनेक वर्षांनंतर सत्तापालट झाला. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले आणि कोकणातील ना. नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला गती प्राप्त झाली. विकास प्रक्रियेत चाचपडणारं कोकण विकासात गती घेऊ लागलं. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजाही लोकांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. कोकणातील रस्त्यांचं जाळं तयार झालं. वाडी-वस्तीवर कंदिलांच्या उजेडाऐवजी विजेच्या प्रकाशाने वाड्या उजळल्या. मैल-दोन मैल पाण्यासाठी होणारी वणवण थांबली.
काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील मंत्री राहिलेल्या स्व.बाळासाहेब सावंत, कै. भाई सावंत, ॲड. एस. एन. देसाई या मंत्र्यांनी त्यांना शक्य होईल, त्याप्रमाणे विकासप्रक्रिया राबविण्याचा जरूर प्रयत्न केला; परंतु राज्य मंत्रिमंडळात पूर्वीपासून पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर भरणा होता. मेजॉरिटी पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांची होती. यामुळे कोकणासाठी काही देताना मंत्रिमंडळाचा हात आखडताच होता. मोठा निधी तर कधीच आला नाही.
बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकण विकासासाठी प्रयत्न केले; परंतु त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांनी त्यांच्यासमोर अडचणीच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सागरी महामार्ग हा बॅ. अंतुले यांचाच प्रयत्न; परंतु हा महामार्ग अपूर्णच राहिला आहे. १९९५ साली महाराष्ट्र मंत्रिमंडळात राहिलेल्या ना. नारायण राणे यांनी चौकटीपलीकडे जाऊन कोकण विकासाचा विचार केला. इंग्रजी माध्यमांच्या शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय की, ज्यामुळे कोकणातील असंख्य तरुण-तरुणी इंजिनीअर होऊ शकले. सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांसाठी केवळ स्वप्न वाटणारे अभियांत्रिकीचे शिक्षण कोकणातील विद्यार्थ्यांना मिळू शकले. कोकणातील असंख्य तरुण मुलं इंजिनीअर होऊन जॉब करताना दिसतात. विकास म्हणजे फक्त गावातले रस्ते, एवढ्यापुरताच विषय पूर्वी असायचा. ते विकासाचे वेगळे चित्र ना. नारायण राणे यांनी रेखाटले आणि सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला.
१९९८ साली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून समारंभपूर्वक घोषित केला. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील घोषित झालेला पहिला पर्यटन जिल्हा आहे. खरंतर कोकणात सर्वकाही असूनही आपल्याकडे काहीच नाही, याच भावनेत वावरणाऱ्या कोकणवासीयांना पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची एक वेगळी वाट ना. राणे यांनीच दाखवली, हे कुणालाच नाकारता येणार नाही. चिपीचे विमानतळ उभारण्याचे खरे श्रेय ना. नारायण राणे यांच्याकडेच जाते. जेव्हा चिपी विमानतळाचा प्रकल्प मर्यादित कालावधीत पूर्ण करण्याचा विषय होता, तेव्हा गोव्यात वेगळे विमानतळही प्रस्तावित नव्हते. त्यामुळे कोकणातच आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जाणार होते; परंतु कोकण विकासाचे मारेकरी असणारे तिथेही काळेझेंडे दाखवायला सर्वात पुढे होते आणि तेच विमानतळ पूर्ण झाल्यावरही होते. विकास आणि राजकारण हे समानतेने चालत असले तरीही त्याची गल्लत कधीच होता कामा नये. आज कोकण पर्यटन विकासात किती बदलले आहे, हे आपण पाहातोच आहोत. विकासाचा विचार आणि प्रत्यक्ष कृतिशिलतेने विकास दाखवण्याचे काम निश्चितच ना. नारायण राणे यांनी केले; परंतु फक्त राणेंना विरोध एवढाच ज्यांचा राजकीय अजेंडा असलेल्यांनी कधीच विकासाचा विचार केलाच नाही.
कोकणातील प्रकल्प आणण्याचे प्रयत्न राणेंनी केले; परंतु त्याला विरोध करत राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न राणेद्वेषाने पछाडलेल्यांकडून झाले. विकासाचा विचार करता आला पाहिजे. हा विकासाचा विचार करण्यासाठी आणि प्रत्यक्षात साकारण्यासाठी विकासाचे ‘व्हीजन’ असावे लागते. हे विकासाचे व्हीजन निश्चितच ना. नारायण राणेंमध्ये आहे. जाता-जाता एकच बाब निदर्शनाला आणून देतो, कोकणातील पडवे येथे लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची उभारणी यामागेही ना. राणेंची एक भावनिकता आहे. त्यात व्यवहारीकपणा तर निश्चितच कुठेच नाही. कोकणात केवळ विरोधकांशी संघर्ष करत राहणाऱ्या ना. राणे यांनी तरीही भव्य-दिव्य हॉस्पिटलची उभारणी केली. जेव्हा लाईफटाईम हॉस्पिटल परिसरात कोणीही जातो, तेव्हा त्याला आपण एका स्वप्नवत वाटणाऱ्या वास्तू परिसरात आहोत असे समजून येते. जर पैसा कमावणे हाच या हॉस्पिटल उभारणी मागे हेतू असता तर या हॉस्पिटलचा प्रकल्प पुणे, मुंबईत उभारला गेला असता हेही समजून घेण्याची आवश्यकता आहे. ही भव्य-दिव्यता फक्त राणेच उभारू शकतात, ही वस्तुस्थिती कुणालाही नाकारता येत नाही.
राणेंचा द्वेष करणाऱ्यांनी स्वत: कोकणात आणि कोकणासाठी काय केलंय? हा खरंतर गहन ठरणारा प्रश्न आहे; परंतु विरोधी मानसिकतेत वाढलेल्या आणि वावरणाऱ्या कोकणवासीयांनी सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. निवडणूक, राजकारण हे त्या-त्या पातळीवर होत राहील; परंतु कोकणाला समाजवादाचा विचार जसा समाजवादी नेते बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांनी दिला, तर कोकणच्या विकासाचा मार्ग कोकणाला ना. नारायण राणे यांनीच दाखवला,हे कुणालाही मान्य करावेच लागेल.