वसई/ ठाणे : विरारमध्ये एका इमारतीच्या बेडरूममधील छताचा स्लॅब अंगावर पडल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील सी. एम. नंगर येथे दादू प्लाझा इमारत आहे. ही इमारत १० वर्षे जुनी असून, या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील १०२ क्रमांकाच्या सदनिकेत पवार कुटुंबीय राहतात. बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरात बेडरूमधील छताच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत बेडरूममध्ये झोपलेली शितल पवार (३४) जखमी झाली. तिला उपचारासाठी पालिकेच्या चंदनसार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
तर दुसरीकडे कळव्यातील विटावा परिसरात प्लास्टर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत महिला ज्या इमारतीमध्ये राहत होती ती इमारत २३ वर्षे जुनी आहे. या इमारतीला जागोजागी तडे गेले असून इमारत धोकादायक अस्वस्थेत आहे. सूर्यानगर भागात असलेल्या भवानी चौकात एक मजल्याची साईनगर चाळ आहे. या चाळीतील नवनाथ गोळे यांच्या घरात लीलावती कुंजू या भाड्याने राहतात. त्यांच्या घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले. यामध्ये चंद्रिका जनार्दन (३३) यांचा मृत्यू झाला. तर लीलावती (६५) यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
तिसऱ्या घटनेत राबोडीतील जुम्मा मशिदीजवळ तीन मजली शेरदिल अपार्टमेंट या इमारतीच्या तळ मजल्यावरील स्लॅब गुरुवारी दुपारी कोसळल्याची घटना घडली. ही इमारत देखील २० वर्षे जुनी आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील सोहेल कुरेशी यांच्या रूमच्या स्लॅबचेही प्लास्टर कोसळले. या खोलीत इस्राईल खान नावाचा इसम भाड्याने राहत असून या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
याआधीही पाच महिन्यांपूर्वी कळव्यातील खारेगावात दुमजली ३५ ते ४० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब आणि टेरेसचा काही भाग कोसळला होता. यावेळी या इमारतीतील १२ कुटुंबांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. या घटनांमुळे शहरातील धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच अशा जीर्ण इमारती वेळीच खाली न केल्यास भविष्यात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.