Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGajanan Maharaj : शाश्वत स्वरूपाचे आले; सद्गुरू भक्तीचे राज्य घरा (भाग २)

Gajanan Maharaj : शाश्वत स्वरूपाचे आले; सद्गुरू भक्तीचे राज्य घरा (भाग २)

  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

गत भागात आपण पाहिले की, महाराजांना परत शेगावी आणावयासाठी हरी पाटील काही मंडळींना बरोबर घेऊन गाडीने नागपूर येथे येण्यास निघाले. महाराजांनी हे अंतर्ज्ञानाने जाणले व गोपाळ बुटी यांना त्याची कल्पना दिली व हरी पाटील येथे पोहोचण्यापूर्वी मला येथून जाऊ दे, असे म्हणाले. नंतर हरी पाटील बुटी सदनाला पोहोचल्यावर शिपायांनी त्यांना अटकाव केला. पण हरी पाटलांनी त्यांना न जुमानता सदनात प्रवेश केला. त्यावेळी तिथे भोजनाकरिता ब्राह्मण आले होते. गोपाळ बुटी यांना नागपूरचा कुबेर असे संबोधले जात असे.

त्यांच्या सदनमधील पंगतीचे वर्णन खालील ओव्यांमधून लक्षात येते :
ताटे चांदीची अवघ्यांस।
शिसमचे पाट बसण्यास।
होत्या पातळ पदर्थास।
वाट्या जवळ चांदीच्या ॥४४॥
नानाविध पक्वान्ने।
होती भोजनाकारणे।
मध्यभागा आसन त्याने।
मांडिले समर्थ बसण्यास ॥४५॥
यावरून बुटींची सधनता व संपन्नता लक्षात येते. हरी पाटील यांना पाहताच एखाद्या गाईने वासराला पाहून त्याच्या ओढीने पळत सुटावे, त्याप्रमाणे महाराज हरी पाटलाकरिता धावले आणि त्यांना म्हणाले, “हरी, बरे झाले तू मला न्यावयाला आलास. चल आपण शेगाव येथे जाऊ. मला येथे राहायचे नाही.” असे म्हणून समर्थ तेथून जाऊ लागले. ते गोपाळ बुटी यांनी पाहीले. त्यांनी अनन्यशरण भावाने महाराजांचे चरण धरले आणि महाराजांची प्रार्थना केली. बुटी महाराजांना म्हणाले “गुरूराया, या प्रसंगी माझा विक्षेप करू नका. दोन घास खाऊन मगच आपली इच्छा असेल तिकडे जावे.” तसेच गोपाळ बुटी हरी पाटील यांना विनयाने बोलले.

“आपण प्रसाद घेऊन जावे एवढेच मागणे आहे. मला हे उमजले की महाराज आता येथे राहत नाहीत. महाराज आताच निघून गेले तर सर्व लोक उपाशी उठतील आणि सर्व नागपूर नगरीमध्ये माझी नाचक्की होईल. आता तुम्हीच माझी लाज राखा.”

गोपाळ बुटींनी विनयाने केलेल्या विनंतीमुळे सर्वांची भोजने होईपर्यंत महाराज तिथेच राहिले. हरी पाटील यांच्या शबरोबर आलेली शेगावची मंडळी देखील पंगतीत जेवली.

भोजने झाल्यानंतर मंडळींची महाराजांसह निघण्याची तयारी सुरू झाली. महाराजांच्या दर्शनाकरिता बुटी सदनात गर्दी झाली. गोपाळ बुटी यांचे कुटुंब , जानकाबाई ह्या अत्यंत भाविक होत्या. त्यांनी “माझा हेतू पूर्ण करा” अशी महाराजांना विनंती केली. त्यांच्या कपाळी कुंकू लावून महाराजांनी त्यांना आशीर्वाद दीला की, “तुला आणखी एक सद्गुणी पुत्र होईल. श आणि अंत:काळी तू सौभाग्यवती जाशील.” महाराज सीताबर्डी वरून निघाले. आणि रघुजी राजे भोसले यांच्या घरी आले.

हे रघुजी भोसले हे राजे जरी होते, तरी त्यांचे वर्तन अतिशय शुद्ध आणि सात्त्विक स्वरूपाचे होते. ते प्रभू श्री रामाचे निस्सिम भक्त होते. त्यांच्याबद्दल संतकवी दासगणू लिहितात :
हा भोसला राजा रघुजी।
उदार मनाचा भक्त गाजी।
ज्याने ठेविला राम राजी।
आपल्या शुद्ध वर्तने ॥६२॥
त्याचे लौकिकी राज्य गेले।
जे अशाश्वत होते भले।
शाश्वत स्वरूपाचे आले।
सद्गुरू भक्तीचे राज्य घरा ॥ ६३॥

भोसले यांच्याकडे झालेले स्वागत-सत्कार आणि पाहुणचार यांचा स्वीकार करून तिथून मंडळी पुढे रामटेक येथे प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्याकरिता पोहोचली. रामाचे दर्शन घेऊन सर्व मंडळी
शेगावास परत आली. यापुढील वृत्तान्त पुढील लेखांकात येईलच.

क्रमशः

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -