मुंबई: मराठीतील आघाडीची अभिनेत्री स्पृहा जोशी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. हिंदी सिनेमात स्पृहा जोशी बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीसह दिसणार आहे. स्पृहा आणि शर्मन जोशी ‘सब मोह माया है’ या सिनेमात दिसणार आहे. येत्या १८ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
स्पृहाने या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या सिनेमात स्पृहा जोशीने शर्मन जोशीच्या बायकोची भूमिका साकारली आहे. यात शर्मन जोशीला आपल्या वडिलांसारखीच सरकारी आरामाची नोकरी करायची आहे. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात मात्र त्याला यश मिळत नसते.
View this post on Instagram
अशातच वडिलांचा मृत्यू झाला तर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळते. मात्र वडील जिवंत असताना हे करायचे कसे असा प्रश्न शर्मन जोशीला पडतो. ती नोकरी मिळवण्यासाठी तो काय खटपट करतो हे अतिशय रंजक पद्धतीने या सिनेमात दाखवले आहे. शर्मनच्या वडिलांची भूमिका अन्नू कपूर यांनी साकारली आहे.
बाप के बदली नौकरी, नौकरी के बदले बाप’, कितना भारी पडेगा ये सौदा फॉर मिश्रा परिवार असं तिने हा ट्रेलर शेअर करत म्हटले आहे.
स्पृहा जोशीने अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक ऐतिहासिक मालिकांमधील तिच्या भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. इतकंच नव्हे तर स्पृहा उत्तम निवेदक तसेच लेखिका आहे.