शेवगाव (प्रतिनिधी)– मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना गावबंदी केली जात असताना सालवडगाव ता. शेवगाव येथील सरपंच अण्णासाहेब रुईकर व उपसरपंच सौ. यमुनाबाई काकासाहेब भापकर यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आपला सरपंच व उपसरपंच पदाचा राजीनामा सालवडगाव येथील आंदोलनकर्त्यांकडे सुपूर्द केला.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सालवडगाव ता. शेवगाव येथील सकल मराठा समाजाबरोबरच सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थांनी सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली व यावेळी येथील सरपंच व महिला उपसरपंच यांनी तात्काळ राजीनाम्याची तयारी दर्शवत गावकऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा राजीनामा आंदोलनकर्त्याकडे सुपूर्द केला.
या राजीनाम्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज असून आरक्षणा अभावी आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा व नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमचा भाऊ मनोज जरांगे पाटील जीवन मरणाची लढाई लढत असताना मी या पदावर राहणे मला संयुक्तिक वाटत नसल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले आहे. यावेळी सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थांनी आरक्षणाला पाठिंबा देत एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या. यावेळी ग्रामस्थ ही उपस्थित होते.