आंतरवाली सराटी, जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. तर, उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा किती अंत पाहता, असा उलट सवाल केला आहे. मी सरकारला चर्चेसाठी बोलावले पण कोणी आले नाही आणि आता उपोषणाला ८ दिवस झाल्यानंतर सरकार वेळ मागत आहे. सरकारला वेळ दिला तर आम्हाला आरक्षण देणार का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. यामुळे आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. ही लढाई आरपारची असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार
जरांगे यांनी सांगितले की, सरकारला किती वेळ द्यायचा. मला त्यांच्यासोबत बोलण्याची इच्छा नाही. सरकार गोर-गरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल करू लागले आहेत. सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असून आम्हाला अर्धवट आरक्षण नको, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
सगळे पक्ष एकसारखेच
सरकारने चर्चेसाठी आवाहन केले असल्याबाबत त्यांना विचारल्यानंतर तुम्ही इकडे येऊन बोला, तुम्हाला गरज असेल तर या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मराठ्यांना कोणताच पक्ष नाही. सगळे पक्ष एकसारखेच असल्याचे त्यांनी सांगितले.
नुसती कागदं देऊन फसवू नका
नुसती कागदं देऊन फसवू नका. आरक्षण कसं देणार हे आधी सांगा. मागच्या वेळी पण आरक्षण देणार, असे सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते. पण त्यावर कार्यवाही झाली नसल्याकडे जरांगे यांनी यावेळी लक्ष वेधले.