
आमदार नितेश राणे यांचा थेट सवाल
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanavis) यांनी हिंसात्मक घटनांशी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. त्यावरुन, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarane Patil) यांनी टीका केली. या टीकेवर भाजपा आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. मात्र, हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावले आहे. गृहमंत्र्यांच्या या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया देत टीका केली. तर, मोदींवरही निशाणा साधला. त्यानंतर, भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट व्हिडिओच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील आता राजकीय बोलू लागले
पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील आता राजकीय बोलू लागले आहेत. ज्या समाजकंटकांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, लोकांची घरं जाळली, आमदारांची घरं पेटवली, तोडफोड केली. त्याविरुद्ध उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक भूमिका घेतली. त्या भूमिकेचे समर्थन करण्यापेक्षा जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. याचा असा अर्थ होतो का, जरांगे पाटील या हिंसेचे समर्थन करत आहेत. त्यांची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येत आहे का? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. तसेच, जर, असे होत असेल तर राज्य सरकार म्हणून याबाबत आम्हाला विचार करावाच लागेल, असेही त्यांनी जरांगे पाटील यांना सुनावले आहे.
यावेळी सुरुवातीलाच नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राभत यांच्यावर हल्लाबोल केला. आज सकाळी संजय राजाराम राऊत आजच्या सर्व पक्षीय बैठकीवर थयथयाट करताना दिसला. एका बाजूला घटनाबाह्य सरकार म्हणायचं आणि दुसऱ्या बाजुला सरकारच्या बैठकीसाठी नाक रगडत फोटोसाठी याला आणि मालकाला यावं लागतं. आजच्या बैठकीला ह्यांना बोलावलं नाही त्याबद्धल मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.
आधी तुम्ही राजीनामे द्या मग दुसऱ्यांचे राजीनामा मागा
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ठाकरे आहेत. ह्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा नैतिकता पाळून राजीनामा का दिला नाही. आधी तुमच्या घरातून सुरवात करा. तुम्ही राजीनामे द्या मग दुसऱ्यांचे राजीनामा मागा. राजीनामा देतो असे बोलण्याची हिम्मत ठाकरे करतील का? असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.
बाळासाहेबांचे वारस असाल तर आजच्या बैठकीत आर्थिक निकषावर आरक्षण द्या हे तुम्ही बोलाल का? सर्वपक्षीय बैठकीत हाऊस किपिंगची माणसं आहेत. त्यामुळे राऊत, अनिल परब यांचे काम नाही, यांची गरज नाही. आमचं सरकार टिकणारं आरक्षण देणार, याची खात्री आहे.
जरांगे पाटीलांनी राजकीय भाषा सुरू केली आहे. त्यांना जे कोण स्क्रिप्ट लिहून देतोय त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गाल बोट लावू नका. जे निरपराध आहेत त्यांनी घाबरू नये. हिंसेला समर्थन करू नये, जाळपोळ करत असेल तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये. कोणावर चुकीची कारवाई होत असेल तर आम्ही त्यांना मदत करू, असेही नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वतःचं चिन्हं, नाव आहे का? म्हणून चिरीमिरी लोकांना दंगल भडकवणाऱ्यांना सर्वपक्षीय बैठकीला बोलवले नाही, अशी उपहासात्मक टीका नितेश राणे यांनी केली.
अंबादास दानवे तुमच्या पक्षाचे नाहीत का?
अंबादास दानवेना बोलवलं आहे. ते तुमच्या पक्षाचे नाहीत का? ९० कमी मारावी मग समजेल, अशा बोच-या शैलीत नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना फटकारले.
समाज विघातक शक्ती मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर
संजय राऊतला त्याच्या घरात राहायची पण लायकी नाही. काड्या लावण्यात ज्याची पीएचडी झाली आहे त्याने दुसऱ्याला काडेखोर म्हणू नये. त्याने काड्या लावण्याचे क्लास सुरू करावे. शांतता ठेवण्यासाठी इंटरनेट बंद करावं लागतं. सरपंच पदाची निवडणूक लढविली नाही त्याला राज्य कसं चालवावं हे समजणार नाही. मीरा बोरवणकर ह्यांची केस रिओपन करावी, समाज विघातक शक्ती मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसली आहे, पाहिले त्याला अटक करा. मातोश्रीचे पण इंटरनेट बंद करा, तिथूनच दंगली भडकविल्या जातात, असा गंभीर आरोपही नितेश राणे यांनी केला आहे.
साळुंखे व बनसोडे हे कोणाचे पिल्लू आहेत?
तसेच जरांगे यांना प्रत्युत्तर देताना, माझी किंमत भाजपला माहीत आहे. तुमची किंमत जर ठेवायची असेल तर राजकीय बोलायचं बंद करा. हा तुम्हाला मैत्रीचा सल्ला आहे. उद्या बनसोडे आणि साळुंखे हे कोण हे समजेल. ज्या ज्या आमदारांची घरे, गाड्या फोडणारे हे मराठा समाजाचे नाहीत. ते ठाकरे व पवारांचे आहेत. प्रदीप साळुंखे व बनसोडे हे कोणाचे पिल्लू आहेत याचे उत्तर विनायक राऊत यांनी द्यावे, असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.
सरकार वडापावची गाडी नाही. आमचं सरकार कायम ठिकणार, दोन्ही राऊतांना डबलबारीसाठी बोलवा, असा कोकणी टोमणाही नितेश राणे यांनी लगावला आहे.