
गोळ्या घालण्याची दिली धमकी
मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. म्हणूनच की काय त्यांना धमकी देणारा पैशांची मागणी दुपटी तिपटीने वाढवतच चालला आहे. चार दिवसांपूर्वी धमकी देणार्या व्यक्तीकडूनच मुकेश अंबानींना पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल (Threat mail) आला आहे. यावेळेस तब्बल ४०० कोटी रुपयांची (400 crores) मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर गोळ्या घालू, असंही या मेलमध्ये म्हटलं आहे.
मुकेश अंबानींना २७ ऑक्टोबरला त्यांच्या ई-मेल अकाऊंटवरुन एका अज्ञात व्यक्तीचा मेल आला होता. या मेलमध्ये त्याने २० कोटी रुपयांची मागणी करत पैसे दिले नाही तर जीवेमारण्याची धमकी दिली होती. शिवाय मारण्यासाठी आमच्याकडे उत्तम नेमबाज आहेत, असंही त्याने म्हटलं होतं. यासंबंधी अंबानींच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, तपास सुरु असताना दुसर्याच दिवशी पुन्हा एकदा त्याच व्यक्तीकडून धमकीचा मेल आला, ज्यात २०० कोटींची मागणी केली होती. आधीच्या मेलला उत्तर न दिल्याने हा मेल केला असल्याचे त्याने म्हटले होते.
यानंतर पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांनी त्याच व्यक्तीचा धमकीचा मेल आला आहे. पुन्हा एकदा रिप्लाय न दिल्याने हा मेल करण्यात आला आहे. ४०० कोटी रुपये द्या नाहीतर गोळ्या घालू, असं त्या व्यक्तीने म्हटलं आहे. 'तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत ४०० कोटी रुपये आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक करू शकत नाहीत', असंही या मेलमध्ये म्हटलं आहे. या धमकीचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कालपासून अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलियाची) सुरक्षा वाढवली आहे.