मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये धमाल करत आहे. सध्या संघ विजयरथावर स्वार आहे. भारतीय संघाने आपले सुरूवातीचे ६ सामने जिंकले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमाल केली आहे.
मात्र या सगळ्यामागे एका व्यक्तीचे खूप कौतुक केले पाहिजे तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर ते गौतम गंभीरपर्यंत या सर्वांनी रोहितचे तोंडभरून कौतुक केले आहे. पाकिस्तानी दिग्गज आणि चाहतेही रोहितचे कौतुक करताना थकत नाहीत.
गंभीरसह अनेक दिग्गजांकडून रोहितचे कौतुक
कर्णधारपदाचा दबाव असतानाही रोहित जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याची कामगिरी पाहून असे वाटते की तो कर्णधारपदाच्या दबावाखाली नाहीये तर कर्णधारपद एन्जॉय करतोय. गोलंदाजीदरम्यानही रोहितची रणनिती काम करत आहे. इतकंच नव्हे तर रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ एका युनिटच्या रूपात पहिल्यापेक्षा चांगली कामगिरी करत आहे.
गौतम गंभीरने इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी रोहितला सेल्फलेस कर्णधार म्हटले होते. तो म्हणाला होता की, जर रोहितने आकड्यांबाबत विचार केला असता तर त्याने आतापर्यंत ४०-५० शतके ठोकली असती. मात्र तो आकड्यांच्या मागे धावत नाही तर आपल्या खेळीने खास संदेश देतो. एक लीडर आणि कर्णधार हेच करतो. कर्णधार खूप झाले आहेत मात्र रोहित एक लीडर आहे.
भारताचा पुढील सामना २ नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध आहे. आतापर्यंत भारताने विजयी षटकार मारला आहे. भारत हाच विजयरथ श्रीलंकेविरुद्ध कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.