Thursday, August 14, 2025

Maratha Reservation : 'मराठा आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही'

Maratha Reservation : 'मराठा आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल


मुंबई : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) खरे मारेकरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच आहेत. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत, हे त्यांनाही माहित आहे आणि मराठा समाजालाही माहित आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण न टिकण्यासाठी ठाकरेच जबाबदार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.


उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का? असा संतप्त सवाल सरकारला केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.


'आम्ही करु शकलो नाही, पण हे करत आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. ज्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. उच्च न्यायालयामध्ये त्या आरक्षणाला चॅलेंज देण्यात आलं, तिथेही ते आरक्षण टिकलं. ते टिकवण्याचं काम मी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते टिकवलं नाही', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.


दरम्यान, टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लावू नका असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलं आहे. तसेच मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.


दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सध्या राज्यात चांगलाच पेटला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन अधिक आक्रमक होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसागणिक खालावत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाब निर्माण होत आहे. तर आरक्षणासाठी सरकारकडून देखील हालचालींना वेग आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >