मुख्यमंत्री व जरांगे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी जावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांनी पाणी व उपचार त्यागल्यामुळे मराठा आंदोलक काल प्रचंड आक्रमक झाले. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. थेट आमदार प्रकाश सोळंकेंचेही घर जाळण्यात आले. शिवाय जालन्यात उपस्थित असलेले मराठा बांधव मनोज जरांगेंनी पाणी प्याव या हट्टाला पेटले होते. त्यांच्या विनंतीचा मान राखत काल जरांगेंनी तीन ते चार घोट पाणी प्राशन केलं. परंतु जगांगेंची प्रकृती अधिकच खालावत चालल्यामुळे त्यांनी उपोषणादरम्यान पाणी प्यावं असा आग्रह मराठा बांधवांनी केला. त्यांच्या आग्रहाचा मान राखत मनोज जरांगेंनी आजपासून पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगेंच्या पाणी पिण्यामागे आणखी एक कारण असल्याची चर्चा आहे. आज सकाळी मनोज जरांगे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात फोनवर तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यात जरांगेंनी पुन्हा एकदा आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची चिन्हे आहेत. या संभाषणातर जरांगे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य सरकार आरक्षणासाठी प्रयत्नशील
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारच्या हालचाली सुरू होत्या. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे हेही सागर बंगल्यावर दाखल झाले. पाऊण तासाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले. वर्षावरील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बैठकीनंतर शिंदे व फडणवीस यांच्यात बंदद्वार चर्चा झाली. तर आज शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या देखील मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी वेगाने हालचाली सुरु आहेत.