Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Andolan : मराठा आंदोलनामुळे नांदगाव बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या बसेस बंद

Maratha Andolan : मराठा आंदोलनामुळे नांदगाव बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या बसेस बंद

नांदूर शिंगोटेसह सिन्नर तालुक्यात कडकडीत बंद

नांदगाव : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी प्रत्येक तालुक्याच्या गावी मराठा समाजाचे (Maratha Samaj) आमरण उपोषण सुरु आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ, बीड भागात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सतर्कता म्हणून राज्यातील बसस्थानकांतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसचा मार्ग बंद करण्यात आला आहे. याची झळ नांदगांव बस आगाराला देखील बसली आहे. नाशिक वगळता इतर जिल्हामार्गावर चालणाऱ्या नांदगांव डेपोच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

हिंसक वळण लागल्यास बसचे नुकसान नको या हेतूने हा निर्णय आगाराच्या वतीने घेण्यात आला आहे. हीच परिस्थिती राज्यातील व जिल्ह्यातील इतर बस स्थानकांची आहे. त्यामुळे आता सध्यातरी प्रवाशांना बाहेर प्रवास करण्यासाठी खाजगी वाहन किंवा भाडोत्री वाहनाचा वापर करावा लागेल. यासाठी पैसे देखील जास्त मोजावे लागतील.

मराठा समाजाच्या वतीने नांदगांव येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा १० वा दिवस व आमरण उपोषणाचा ४था दिवस आहे. आमरण उपोषणासाठी बसलेले मराठायोद्धा विष्णु चव्हाण यांनी तीन दिवसात अन्न घेतलेले नाही. त्यांचे वजन कमी झाले असून, प्रकृती काही प्रमाणात खालावलेली आहे. तर त्यांच्या सोबत इतर मराठा समाजाचे भास्कर झाल्टे जिल्हा उपाध्यक्ष, भीमराज लोखंडे तालुका अध्यक्ष, विशाल वडघूले हे साखळी उपोषणात सामील आहेत. त्यांना तालुक्यातील वाढता पाठिंबा मिळत आहे.

नांदूर शिंगोटेसह सिन्नर तालुक्यात कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पाठिंब्यासाठी सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील सर्व बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. सिन्नर तालुक्याच्या पांगरी गावातून गेल्या ४९ दिवसांपूर्वी या ठिकाणी छावा संघटनेचे विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली व सकल मराठा बांधवांच्या एकजूटीने साखळी उपोषण व आमरण उपोषण करण्यात आले होते. या ठिकाणी वेळोवेळी विविध प्रकारच्या मागण्या या ठिकाणच्या शेतकरी वर्गाने केल्या, मात्र त्याकडे प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा न करता लक्ष दिले नाही.

पूर्व भागातील पांगरी या ठिकाणी सर्व दुकानदारांनी आपापले दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून येथील संत हरीबाबा मैदानात सुरू असलेल्या साखळी उपोषणामध्ये सहभाग नोंदवला. आज झालेल्या साखळी उपोषणादरम्यान वावी येथील सरपंच विजय काटे, विलास पांगारकर यांनी आपले मत व्यक्त केले तर सिन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनीही त्वरित मुख्यमंत्री यांना पत्र देऊन बैठक बोलावली. त्यामुळे सिन्नर तालुक्याला चांगल्या प्रकारे मराठा समाज एकत्रित एकवटला असल्याचे पांगारकर व काटे यांनी व्यक्त केले.

साखळी उपोषण प्रसंगी विजय काटे, विलास पांगारकर, रमेश पांगारकर, संपत पगार, निखिल पांगारकर, भाऊसाहेब बैरागी, सोपान वारुळे, विश्वास पांगारकर, अतुल पांगारकर व समस्त पांगरीकर यावेळी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -