Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखभारत विश्वचषकाच्या एक पाऊल नजीक

भारत विश्वचषकाच्या एक पाऊल नजीक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अत्यंत तेजस्वी कामगिरी करत आहे. भारताची सुरुवात अत्यंत स्वप्नवत झाली आहे. आतापर्यंत भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिले सहा सामने सलग जिंकले आहेत. त्यात रविवारी म्हणजे सुपरसंडेला गतविजेत्या इंग्लंडला हरवताना भारतीय गोलंदाजांनी अभूतपूर्व कमाल केली. हा सामना निःसंशय गोलंदाजांनीच जिंकून दिला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण भारताची एखाद्या मजबूत किल्ल्यासारखी असलेली फलंदाजी कोसळली. रोहित शर्माने मात्र आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवताना शानदार ८६ धावा केल्या, तर त्याला सूर्यकुमार यादवने ४९ धाव करून छान साथ दिली. या दोघांच्या जोरावरच भारताने २२९ धावा अशा माफक धावांचे आव्हान दिले.

आजच्या जमान्यात कोणत्याही मैदानावर हे आव्हान सहज पार करता येण्यासारखे आहे. पण गोलदाजांनी ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असा पवित्रा घेतला आणि इंग्लंडला १०० धावांनी हरवले. भारताचे गोलंदाज मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि जसप्रित बुमराह यांनी जबरदस्त गोलंदाजी करून इंग्लंडला हे माफक आव्हानही पार करू दिले नाही. खरे तर या सामन्यात असे दिसत होते की, इंग्लंडचा संघ फार तयारी करून आलेलाच नाही. त्यांच्याकडे उत्तमोत्तम फलंदाज आहेत. पण त्यांची कसलीही मात्रा आज चालू दिली नाही ती बुमराह आणि शमी यांनी. बुमराहचे चेंडू, तर इंग्लिश फलंदाजांना कळतच नव्हते. बुमराह आणि शमीचे चेंडू म्हणजे जणू बाॅम्ब आहेत अशा थाटात इंग्लिश फलंदाज खेळत होते. भारताची फलंदाजी अगोदर कोसळली आणि ती २२९ धावात आटोपली. पण इंग्लंड भारतीय फलंदाजांपेक्षाही खराब खेळ करेल, असे मात्र वाटत नव्हते. लखनऊची खेळपट्टी मंद आहे. या मंद खेळपट्टीवर बुमराह आणि शमीची द्रुतगती गोलंदाजी खेळताना फारच अवघड जात होते. इंग्लंडने त्यांच्या आतापर्यंतच्या सामन्यात फक्त बांगलादेशच्या संघाला हरवले आहे आणि तो संघ काही बलाढ्य म्हणता येणार नाही. त्यामुळे गतविजेत्या इंग्लंड संघाचा खेळ पाहून यंदा तो तयारीनिशी आलेला नाही, असे जाणवले. याच सामन्यात पाचवे षटक भारतासाठी निर्णायक ठरले. कारण याच षटकात भारताचा गोलंदाज बुमराह याने आतापर्यंत धडाकेबाज खेळत असलेला इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलान याला एका भन्नाट चेंडूवर बाद केले. बुमराहचा हा चेंडू मलानला कळलाच नसल्याचे स्पष्ट दिसत होते. नंतर मग इंग्लंडच्या संघाला फार प्रतिकार करू न देण्यास भारतीय गोलंदाज सज्ज होते. त्यामुळे इंग्लंडचा संघ अवघ्या १२९ धावांत गुंडाळला गेला.

भारताने गतविजेत्या इंग्लंडचा नक्षा उतरवला असला तरीही भारतापुढे अजूनही दोन मोठे पल्ले पार करायचे आहेत. भारताची आव्हानेही मोठी आहेत. इंग्लंडचे आव्हान भारताने सहज पार केले असले तरीही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ असे आहेत की, ज्यांना हरवणे भारतासाठी अवघड जाऊ शकते. या दोन्ही संघांना जेव्हा भारत हरवेल, तेव्हाच भारताचा विश्वचषकाचा मार्ग मोकळा होईल, असे म्हणता येईल. सौरभ गांगुलीनेही ही भीती बोलून दाखवली आहे. इंग्लंडचा संघ तसा फार तयारी करून आला नव्हता. पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याबाबतीत तसे स्वप्नातही म्हणता येणार नाही. या दोन संघांचा मुकाबला करताना भारताला कमालीचे सावध राहावे लागेल. भारतीय संघात काही प्रश्न आहेत. आज भारत जिंकत चालला आहे म्हणून त्याबाबतीत कुणी काही शंका उपस्थित करू इच्छित नाहीत. पण एखाद्या महत्त्वाच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला, तर मात्र याच त्रुटी अत्यंत मोठ्या स्वरूपात समोर मांडण्यात येतील. सर्वात मोठा प्रश्न इशान किशन आणि सूर्यकुमार यादवचा आहे.

एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद द्विशतक काढणाऱ्या इशान किशनचे स्थान निश्चित नाही. त्याच्याऐवजी भारताने प्रतिभाशाली आणि आजचा तडाखेबंद फलंदाज शुभमन गिल याला पाठिंबा दिला आहे. तो किशनइतकाच प्रतिभाशाली आणि फटकेबाज आहे. पण किशनला मधल्या फळीत फिट करायचे म्हटले, तर काढायचे कुणाला, हा पेच भारतीय निवड समितीसमोर राहील. सूर्यकुमार यादव याच्यावर भारताचा भरोसा आहे. त्याने सुरुवात जोरदार केली होती. पण त्याला किती काळ भारत संधी देत राहणार, हाही प्रश्न आहे. त्याचा फॉर्म गेला आहे. पुढील सामन्यात त्याला आपली कामगिरी सुधारावी लागेल. पण या दोन आव्हानांपेक्षा सर्वात मोठे आव्हान आहे ते खेळाडू जखमी होण्याचे. भारतासाठी हे सर्वात व्यापक आव्हान आहे. आपला विकेट टेकर आणि मुख्य गोलंदाज बुमराह हा दुखापतीतून नुकताच सावरला आहे. पण त्याला किती काळ दुखापती सतावत राहतील, हे कुणीच सांगू शकणार नाही.

द्रुतगती गोलंदाजांमध्ये बुमराहची दुखापत ही चिंताजनक बाब आहे, तर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या तुफान गोलंदाजीमुळे अक्षर पटेलला संघाबाहेर बसावे लागत आहे. उत्तम बेंच स्ट्रेंथ असावी, ही कोणत्याही संघासाठी चांगली बाब आहे. पण जडेजा संघात आल्यामुळे पटेलची पंचाईत झाली आहे. दोघेही उत्तम फिरकीपटू असूनही दोघेही तडाखेबंद फलंदाज आहेत. अर्थात जडेजा अधिक गुणवान आहे. भारतात आता फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असले तरीही द्रुतगती गोलंदाजही चांगले आणि प्रतिभाशाली आहेत. मोहम्मद शमी, बुमराह यांच्यानंतर तिसरा मुख्य द्रुतगती गोलंदाज कोण? हा प्रश्न आहे. मोहम्मद सिराज याकडे ही तिसरी जागा भरून काढण्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे. मग द्रुतगती गोलंदाज म्हणून कुणाला निवडायचे? हा अवघड प्रश्न टीम व्यवस्थापनाकडे असेल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधातील सामन्यात तर संघ निवड हीच मोठी कसोटी ठरणार आहे. त्या आव्हानावर भारत कसा काय मात करतो, हे आता पाहायचे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -