Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखUPI : युपीआय : अग्रगण्य डिजिटल पेमेंटप्रणाली

UPI : युपीआय : अग्रगण्य डिजिटल पेमेंटप्रणाली

अलीकडच्या वर्षांत जागतिक मथळ्याचा विषय बनलेला एक भारतीय नवोन्मेष कोणता? असा प्रश्न पडला तर निःसंशयपणे त्याचे उत्तर आहे ‘युपीआय’ (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) प्रणाली. आज, भारतात केल्या जाणाऱ्या सर्व पेमेंटपैकी ४०% पेक्षा जास्त पेमेंट हे डिजिटल आहेत. ज्यात ‘युपीआय’चा सिंहाचा वाटा आहे. त्याचा वापर ३० कोटींहून अधिक व्यक्ती आणि ५ कोटींहून अधिक व्यापारी करतात.

पदपथ विक्रेत्यांपासून ते मोठ्या शॉपिंग मॉल्सपर्यंत सर्व स्तरांवर ‘युपीआय’चा वापर होतो. २०२२च्या आकडेवारीनुसार, आज जगातील सर्व देशांमध्ये, भारत हा सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश आहे, ज्याचा वाटा जवळपास ४६ % आहे. भारतानंतर ब्राझील, चीन, थायलंड आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो. सन २०१६ मध्ये केवळ एक दशलक्ष व्यवहार करणाऱ्या ‘युपीआय’ने आता १०अब्ज (१,००० कोटी) व्यवहारांचा टप्पा पार केला आहे.

युपीआयने भारतीयांच्या व्यवहार पद्धतीत सर्वात मोठा बदल घडवला आहे. जागतिक डेटा संशोधनानुसार, २०१७ मध्ये एकूण व्यवहाराच्या ९० टक्के असलेले रोख व्यवहार हे आता ६० टक्क्यांहून कमी झाले आहेत. सन २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद केल्यानंतर सहा महिन्यांत, युपीआयद्वारे एकूण व्यवहाराचे प्रमाण २.९ दशलक्ष वरून ७२ दशलक्ष पर्यंत वाढले. वर्ष २०१७ सरताना, युपीआय व्यवहारात गत वर्षाच्या तुलनेत ९०० टक्क्यांनी वाढ झाली होती आणि तेव्हापासून त्याने त्याचा वाढीचा चढता आलेख कायम राखला आहे.

‘युपीआय’ हे अत्यंत वापरकर्ता – अनुकूल आहे. हे वापरकर्त्यांना गोपनीय बँक तपशील सामायिक करण्याची आवश्यकता दूर करून व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (व्हीपीए) वापरून देयक अदा करण्याची परवानगी देते. ही प्रक्रिया स्मार्ट फोनवर टेक्स्ट मेसेज पाठवण्याइतकीच सोपी आहे. केवळ सोय म्हणून नव्हे तर त्याचा प्रभाव आर्थिक समावेशन, पारदर्शकता आणि अनौपचारिक अर्थव्यवस्थेत घट होण्यास हातभार लावतो.

‘युपीआय’ व्यवहार वाढल्याने पेमेंटसाठी रोख रकमेची देवाण-घेवाणच केवळ थांबली नाही तर इतर डिजिटल पेमेंट पद्धती देखील बदलत चालल्या आहेत. उदाहरणार्थ, व्यापारी पेमेंटसाठी डेबिट कार्डचा वापर वर्षागणिक घटत चालला आहे आणि आज प्रीपेड वॉलेटचा वापर देखील युपीआयद्वारे बदलला आहे. ‘युपीआय’ जसजसे निरंतर विकसित होत आहे आणि नवोन्मेष घडवत आहे, तसतसे ते भारताच्या डिजिटल भविष्याला आकार देण्यामध्ये आणखी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

तथापि, डिजिटल पेमेंटप्रणालीचे यश केवळ डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधा बळकट होण्यात नाही तर वर्तणुकीशी निगडित आहे ज्याने लोकांना रोख रकमेकडून डिजिटलकडे वळण्यास प्रोत्साहित केले. कोणत्याही वर्तणुकीतील बदलाप्रमाणे, ते त्याच्या मुख्य गटाशी सुसंगतता सुनिश्चित करणाऱ्या दृष्टिकोनावर आधारित नवोन्मेषाद्वारे प्रणालीच्या विश्वासावर आणि सुलभतेवर आधारित आहे. यामध्ये पेमेंट अॅप्सद्वारे प्रदान केलेल्या छोट्या व्हॉईस बॉक्ससारख्या लहान आणि मनोरंजक नवकल्पनांचा समावेश आहे, जेथे सिरीसारखा आवाज QR कोडद्वारे प्रत्येक पेमेंटसह किती पैसे त्वरित प्राप्त झाले हे सूचित करतो. त्यामुळे रोखीच्या व्यवहारांची फार पूर्वीपासून सवय असणाऱ्या छोटे व्यापारी आणि फेरीवाल्यांमधील अविश्वास दूर होण्यास मदत झाली आहे.

याच्या संरचनेतील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राहकाचे खाते कोणत्याही बँकेत असले तरी ग्राहक युपीआयसाठी सेवा प्रदाता निवडू शकतो. निवडीच्या अधिकाराचा अर्थ असा आहे की ‘युपीआय’द्वारे देयक अदा करण्यासाठी ग्राहक त्यांच्या पसंतीचे पेमेंट अॅप्स निवडू शकतात.

‘युपीआय’सह रूपे क्रेडिट कार्डची संलग्नता म्हणजे डिजिटल पेमेंट पद्धतीतील एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड आणि युपीआय या दोन्हींचे एकत्र फायदे देते. युपीआय व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डद्वारे देऊ केलेल्या अल्प-मुदतीच्या पत पुरवठा सुविधेचा लाभ घेऊन, कार्डधारक आता त्यांच्या बचत खात्यातून पैसे काढण्याऐवजी त्यांच्या क्रेडिट लाइन वापरून देयक भरू शकतात.

भारताची बळकट डिजिटल पेमेंट परिसंस्था जगभरात लक्ष वेधून घेत आहे. युपीआयच्या स्थानिक यशानंतर, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने २०२०मध्ये देशाबाहेर पेमेंट प्रणाली नेण्यासाठी ‘एनआयपीएल’ (एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड) नावाची एक शाखा स्थापन केली. तेव्हापासून, एनआयपीएल आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांनी भारताबाहेर युपीआय-आधारित व्यवहारांचा विस्तार करण्यासाठी ३० हून अधिक देशांमधील वित्तीय संस्थांसोबत करार केले आहेत. अलीकडच्या काळात, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका युपीआयच्या लोकप्रिय लाटेत सामील झाले आहेत. युपीआयची फ्रान्समधील सुरुवात ही महत्वपूर्ण आहे, कारण यामुळे प्रथमच युरोपमध्ये पाय रोवण्यास मदत झाली. पंतप्रधान मोदींनी सहा नवीन सदस्य देशांचा समावेश झालेल्या ब्रिक्स समूहात युपीआयच्या विस्ताराचा मुद्दा मांडला आहे. वर्ष २०१६ मध्ये अगदी माफक सुरुवातीपासून, युपीआयचा अभूतपूर्व अवलंब आणि स्वीकृती आज एकप्रकारे यशोगाथा बनली आहे, जी त्याच्या व्याप्ती आणि प्रभावाच्या बाबतीत अतुलनीय आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -