Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वIndustry : उद्योगविश्व आणि महागाईची चढती कमान

Industry : उद्योगविश्व आणि महागाईची चढती कमान

  • अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

सरत्या आठवड्यातही उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये सकारात्मक बातम्यांची कमान चढती राहिली. कौतुक, दिलासा वाटावा अशा बातम्या येत राहिल्या पण खाद्यपदार्थांच्या वाढत्या दरांनी नाराजी कायम ठेवली. गेल्या काही काळात बाजारपेठेमध्ये साखर, गव्हाच्या भावात वाढ अनुभवायला मिळाली तर देशात लग्नसराईच्या काळात प्रचंड उलाढाल होत असल्याचे आणि ही एक सतत विस्तारणारी प्रचंड मोठी बाजारपेठ असल्याचे नव्याने अधोरेखीत झाले. याच सुमारास गुगल, फॉक्सकॉनसारख्या बड्या कंपन्या भारतात उत्पादन करणार असल्याची बातमी समोर आली.

सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. यामध्ये अनेक वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम दरांवर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये साखर आणि गव्हाच्या मागणीतही मोठी वाढ झाली. त्यामुळे गहू आणि साखरेच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात मागणी वाढू लागली आहे. जवळपास प्रत्येक विभागात मागणी वाढत आहे. विशेषत: खाद्यपदार्थांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम दरांवर होताना दिसू लागला आहे. सणासुदीच्या मागणीमुळे गहू आणि साखरेच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. सणासुदीच्या मागणीमुळे गव्हाच्या किमती वाढू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात दिल्लीत गव्हाच्या भावात पाच ते सहा टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. दिल्लीत गव्हाने २७ रुपये प्रति किलोची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गव्हाच्या आयातीला शून्य दराने परवानगी द्यावी किंवा बाजारपेठेत उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारी एजन्सी एफसीआयची विक्री वाढवावी, अशी मागणी उद्योगाशी संबंधित लोकांकडून सरकारकडे केली जात आहे. सणांआधी गव्हाच्या दरात मोठी उसळी पहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळातली मोठी मागणी पाहता देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीने आठ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत किमतीतील वाढ नियंत्रित करण्यासाठी सरकार खुल्या बाजारात आपल्या यादीतून अधिक गहू देऊ शकते, असे मानले जाते. तसेच आगामी विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता देशांतर्गत बाजारातील किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार गव्हाच्या आयातीवरील शुल्क काढून टाकू शकते; जेणेकरून आयात स्वस्त करता येईल.

१७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील गहू १.६ टक्क्यांनी वाढून २७ हजार ३९० रुपये प्रति टनावर पोहोचला. ही २०२३ मधली सर्वोच्च किंमत आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये गव्हाचे भाव २२ टक्क्यांनी वाढले आहेत. गव्हाच्या किमती वाढत राहिल्यास किरकोळ महागाई वाढू शकते आणि अन्नधान्य महागाईही वाढू शकते. आपण सरकारी आकडेवारी पाहिली तर १७ ऑक्टोबर २०२३ रोजी गव्हाची सरासरी किंमत ३०.२९ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली तर कमाल किंमत ५८ रुपये प्रति किलो आहे. १ मे २०२३ रोजी गव्हाचे नवीन पीक बाजारात आल्यानंतर त्याची सरासरी किंमत २८.७४ रुपये प्रति किलो तर कमाल किंमत ४९ रुपये प्रति किलो होती. साहजिकच गव्हाच्या दरात वाढ सुरूच आहे. गव्हाचे नवीन पीक १५ मार्च २०२४ नंतरच बाजारात येणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत, किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला आपल्या कोट्यातून खुल्या बाजारात गहू सोडावा लागेल. दुसरीकडे देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढत आहेत. भारतातील साखरेचे दर सात वर्षांमधील सर्वोच्च आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये यंदा कमी पावसामुळे ऊसपिकावर परिणाम झाला आहे. या कारणास्तव २०२३-२४ मध्ये उत्पादन अंदाज ३.३ टक्क्यांनी कमी होऊन ३१.७ दशलक्ष टन करण्यात आला आहे. वाढते दर पाहता सरकारने साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध घातले आहेत. परदेशी व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार, आता विविध प्रकारच्या साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध लागू राहतील.

देशभरातील व्यापारी आणि अर्थव्यवस्थेसाठी सणासुदीचा हंगाम चांगला असण्याची अपेक्षा आहे; मात्र सणासुदीचा हंगाम संपताच लग्नसराईचा हंगाम सुरू होईल. याचा फायदा व्यापारी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. २३ नोव्हेंबर २०२३ पासून लग्नाचा सीझन सुरू होणार असून १५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. एका अंदाजानुसार, या लग्नाच्या मोसमात देशभरात सुमारे ३५ लाख विवाह होण्याची अपेक्षा आहे. लग्नाच्या खरेदीपासून लग्नसमारंभातील अत्यावश्यक सेवांपर्यंत सर्वच गोष्टींवर या हंगामात ४.२५ लाख रुपयांचा व्यवसाय होईल, असा अंदाज आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट)ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. ‘कॅट’चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, ‘कॅट’ची संशोधन शाखा ‘कॅट रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटी’ने अलीकडेच देशातील २० प्रमुख शहरांमधील व्यापारी आणि सेवा पुरवठादारांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार राजधानी दिल्लीमध्ये या मोसमात साडेतीन लाखांहून अधिक लग्ने होतील. त्यामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ३२ लाख विवाह झाले आणि ३.७५ लाख कोटी रुपयांचा खर्च झाला. या विवाहांमध्ये सुमारे सहा लाख विवाहांमध्ये प्रति लग्न तीन लाख रुपये खर्च केले जातील, असा अंदाज आहे. दहा लाख लग्नांमध्ये प्रत्येक लग्नासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च केले जातील. १२ लाख लग्नांमध्ये एका लग्नासाठी सुमारे दहा लाख रुपये, सहा लाख लग्नांमध्ये सुमारे २५ लाख रुपये खर्च केले जातील. ५० हजार लग्नांमध्ये सुमारे ५० लाख रुपये खर्च केले जातील. ५० हजार विवाहांमध्ये एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केला जाईल. अशा परिस्थितीत एक महिन्याच्या लांब लग्नाच्या हंगामात लग्नाशी संबंधित वस्तू आणि सेवांच्या खरेदीद्वारे ४.२५ लाख कोटी रुपयांचा रोख प्रवाह दिसून येईल. खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या हंगामापूर्वी लोक आपल्या घरांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून घेतात. याशिवाय दागिने, कपडे, शूज, ग्रीटिंग कार्ड्स, ड्रायफ्रुट्स, मिठाई, फळे, पूजा साहित्य, किराणा, अन्नधान्य, सजावटीच्या वस्तू, गृहसजावटीच्या वस्तू, इलेक्ट्रिक- इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि भेटवस्तू इत्यादींना मागणी असते. हॉटेल उद्योगालाही लग्नसराईचा मोठा फायदा होणार आहे. वस्तू खरेदी करण्याव्यतिरिक्त, लग्नात तंबू सजावट, फुलांची व्यवस्था, क्रोकरी, केटरिंग सेवा, कॅब सेवा, व्यावसायिक गटांचे स्वागत समारंभ, भाजी विक्रेते, छायाचित्रकार, व्हिडीओग्राफर, बँड इत्यादी सेवांचाही समावेश असतो. यासोबतच इव्हेंट मॅनेजमेंट हीदेखील मोठी व्यवसायसंधी म्हणून समोर आली आहे.

आता एक नजर उद्योगविश्वातील घडामोडींवर… जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारत वेगाने उदयास येत आहे. अॅपल आणि गूगलसारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांची उत्पादने आता भारतात तयार केली जात आहेत. अॅपलच्या आयफोनची निर्मिती भारतात आधीच सुरू झाली आहे. आता ‘गूगल’ने ‘पिक्सेल’ या आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे उत्पादन भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे. फॉक्सकॉनने याबाबत एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. या उद्योगाच्या म्हणण्यानुसार जगात भारताचे युग सुरू झाले असून आता भारत उत्पादन क्षेत्रात जगावर वर्चस्व गाजवणार आहे.

स्मार्टफोनसारख्या उपकरणांनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टर आणि ईव्हीच्या निर्मितीची तयारी सुरू असल्याने ही टिप्पणीदेखील विशेष आहे. होनहाई ही तैवानमध्ये मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही फॉक्सकॉनची मूळ कंपनी आहे. फॉक्सकॉन अॅपलसाठी करारावर आयफोन आणि इतर उपकरणे तयार करते. आतापर्यंत कंपनीचे उत्पादन चीन केंद्रित होते; परंतु आता कंपनी उत्पादनाचा मोठा भाग भारतात हलवत आहे. ‘गुगल’ने ही घोषणा केली आहे. ‘अॅपल’चे इतर अनेक कंत्राटी उत्पादक भारतात आयफोन बनवत आहेत. नुकताच लाँच केलेला आयफोन १५ भारतात तयार केला जातो. फॉक्सकॉन तामिळनाडूमध्ये ईलेक्ट्रिक व्हेईकलचे उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय सेमीकंडक्टरसाठी पीएलआय योजनेचा लाभ घेऊन सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याची तयारीही कंपनी करत आहे. यापूर्वी फॉक्सकॉन आणि वेदांत संयुक्तपणे सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करत होते; परंतु आता दोघेही स्वतंत्र योजनांवर काम करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -