पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभूत करायचेच, या उद्देश्याने २८ पक्षांनी एकत्र येऊन इंडिया ही आघाडी स्थापन केली. पण या आघाडीतच जोरदार धुसफूस सुरू आहे आणि चर्चा तर अशी आहे की, कदाचित ही आघाडी आताच फुटीच्या उंबरठ्यावर आहे. निवडणुकीनंतर तिचे विसर्जन केले जाण्याची शक्यता अधिक आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मोदी यांना पराभूत करण्यासाठी हे पक्ष एकत्र आले आहेत. पण त्यांच्यात एकजूट राखणे तारेवरची कसरत झाल्यासारखे दिसत आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी यांच्यातील मतभेद इतके चव्हाट्यावर आले आहेत की इंडिया आघाडीचे हे तारू मतभेदांच्या हिमनगाला आदळून विसर्जित होणार की काय, अशी भीती राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशात सात जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. पण काँग्रेसने त्याच ठिकाणी आपलेही उमेदवार जाहीर केले. त्यामुळे समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव भडकले आणि त्यांनी म्हटले आहे की, कदाचित काँग्रेसची इच्छा भाजपा पराभूत होऊ नये, अशी असावी.
आम आदमी पार्टी या पक्षाला तर महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटले आहेत. गुजरातेत त्याची जी अवस्था झाली त्यामुळे जराही विचलित न होता या पक्षाने पुन्हा इंडिया आघाडीत राहून काँग्रेस अडचणीत कशी येईल, हे पाहण्यास प्रारंभ केला आहे. आप पक्ष जितक्या जागा मिळवेल, तितके काँग्रेसचे त्या प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे या पक्षाला भाजपाची बी टीम म्हणण्यापर्यंत इंडिया आघाडीच्याच काही पक्षांची मजल गेली आहे. काँग्रेसच्या बी टीमच्या भूमिकेत कुणीही असले काय किंवा नसले काय, पंतप्रधान मोदी यांची जनमाणसावर भुरळ इतकी आहे की, त्यामुळे हे पक्ष एकत्रित येऊनही मोदी यांचा पराभव करू शकत नाहीत. शिवाय मोदी यांचा विकासाचा अजेंडा आहेच. काही झाले तरीही इंडिया आघाडीतील इतर पक्ष काँग्रेसला दुर्लक्षित करू शकत नाहीत. त्या पक्षाचीच आज पॅन इंडिया स्तरावर म्हणजे अखिल भारतीय स्तरावर उपस्थिती आहे.
आप पक्ष दिल्लीच्या बाहेर केवळ पंजाबपर्यंत गेला आहे. पण आपची मजबुरी ही आहे की, काँग्रेसला बाजूला सारूनच त्याला यश मिळाले आहे. हीच इंडिया आघाडीची राजकीय मजबुरी आहे. गुजरातेत आपला जागा मिळाल्या नाहीत. पण त्याने काँग्रेसचे जे नुकसान केले ते कधीही भरून न येणारे आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांत कशी धुसफूस सुरू आहे, याचे उदाहरण पाहण्यासाठी दिल्लीचा विचार करायला हवा. दिल्लीत सर्व सातही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे काँग्रेसने सांगितले. त्यावर आपच्या एका नेत्याने म्हटले की, जर काँग्रेस स्वबळावर तेथे निवडणूक लढवणार असेल तर मग इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना काहीच अर्थ उरत नाही. आप पक्षाचे दिल्लीतील यश पाहता दिल्लीतील लोकसभेची एकही जागा तो काँग्रेसला सोडेल, असे वाटत नाही. २०१९ ला काँग्रेसचा मतांचा वाटा केवळ १९.५ टक्के होता. ते पाहता दिल्लीत काँग्रेसला आप पक्ष जास्तीत जास्त दोन जागा सोडेल. दिल्ली लोकसभा निवडणुकीत आप पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. काँग्रेस आणि आप या पक्षांतील मतभेदांपुरताच हा मुद्दा मर्यादित नाही. शरद पवार यांचा राष्ट्रवादी गटही इंडिया आघाडीत आहे. पण पवार यांचे भाजपा गोटातील पुतणे अजित पवार यांच्यासमवेत सातत्याने बैठका होत असतात. त्यावर काँग्रेसला आक्षेप आहे. पण पवार यांचे आमच्या कौटुंबिक बैठकी आहेत, असे उत्तर आहे. पण हा मुद्दा मतभेदांना कारण ठरत आहे. पवार यांचे समर्थन लंगडे आहे, अशी काँग्रेसची भावना आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात असेच मतभेद आहेत. मध्य प्रदेशात सात जागांवर काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे अखिलेश यांचा पारा चढला आहे. पण त्यांच्या रागाची पर्वा करण्याचे काँग्रेसला काहीच कारण नाही. कारण समाजवादी पार्टीची ताकद नगण्य आहे. काही विश्लेषकांना वाटते की, काँग्रेस आणि आप या पक्षांतील मतभेद विकोपाला नेऊन दाखवण्याचे प्रयत्न झाले आहेत. हे किरकोळ मतभेद आहेत. अशी सावरासावर आघाडीकडून केली जात आहे. पण आप पक्षामुळे काँग्रेसला कसा फटका बसला हे मल्लिकार्जुन खरगे यांना चांगले माहीत आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि आप, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेदांची अशीच दरी आहे. हे पक्ष मोदी आणि शहा यांचा पराभत करण्याचे स्वप्न पाहत आहेत, असेच म्हणावे लागेल. एकास एक लढत झाली तर भाजपाचा पराभव होईल, याच समजुतीत इंडिया आघाडीचे नेते आहेत. पण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्या निवडणुकीत भाजपाचे सारे विरोधक एकत्र येऊनही विरोधकांचा पुरता बोऱ्या वाजला होता. तेव्हा या असल्या भ्रमात विरोधी पक्ष किती काळ राहणार, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कोणत्याही पक्षाचा दुसऱ्यावर विश्वास नाही, अशा अवस्थेत हे २८ पक्ष निवडणूक लढवणार तरी कशी, हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. प्रत्येक जण स्वतःचा स्वतंत्र अजेंडा घेऊन निवडणुकीत उतरला तर मोदींशी लढा देणे तर दूरच राहिले, पुरेशी मते सुद्धा मिळवू शकणार नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीचे तारू आता मतभेदांच्या फटीमुळे डळमळते आहे आणि त्याचा कपाळमोक्ष येत्या निवडणुकीत होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच मोदी निश्चिंत आहेत आणि मोदी यांच्यावर विश्वास असलेली जनताही निश्चिंत आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…