विजयनगरम: आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात रविवारी रेल्वे अपघात झाला. या अपघातात कमीत कमी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली. मृत व्यक्तींना सरकारकडून भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघाता प्रकरणी शोक व्यक्त केला.
रेल्वेच्या माहितीनुसार, या रेल्वे अपघातात सामील रेल्वेची नावे ०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि ०८५०५ विशाखापट्टणम -रायगडा पॅसेंजर स्पेशल होते. या अपघातामुळे अनेक रेल्वेंचे मार्ग बदलाावे लागले. ज्या मार्गावर हा अपघात झाला तो मार्ग हावडा-चेन्नई मार्ग म्हणून ओळखला जातो. सध्या रेल्वे मार्गावरील घसरलेले डबे दूर करण्याचे काम सुर आहे.
कसा झाला हा अपघात?
रेल्वेच्या माहितीनुसार, विजयनगरम जिल्ह्यात कांतकपल्लेमध्ये विशाखापट्टण-रायगडा पॅसेंजर स्पेशल रेल्वेने संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विशाखापट्ट्णम-पलासा पॅसेंजर रेल्वेला मागून धडक दिली. यामुळे या रेल्वेचे चार डबे रूळावरून घसरले.
#WATCH | Drone visuals of the train collision in Vizianagaram, Andhra Pradesh. Rescue operations underway pic.twitter.com/ou24l03HP1
— ANI (@ANI) October 30, 2023
रेल्वे मंत्र्यांकडून मदतीची घोषणा
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले रेल्वे अपघातातील पिडीतांना सरकारने मदतीची घोषणा केली आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाख रूपये, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना २ लाख रूपये तर किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.