विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ याना घेराव तर जानोरी येथे उपोषण,मातेरेवाडी येथे सदावर्ते यांच्या प्रतिमेचे दहन. तालुक्यातील अनेक गावात पुढाऱ्यांना बंदी
दिंडोरी (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारने आश्वासनाची पूर्तता न केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. परिणामी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उगारून सरकारपुढे नवे आव्हान उभे केल्याची स्थिती आहे. त्यातच त्यांनी २५ ऑक्टोबरपासून पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेतल्याने त्याची ठिकठिकाणी अंमलबजावणी होत असल्याने तालुक्यात लोकप्रतिनिधींना रोष सहन करावा लागतोय. आज मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी दिंडोरी तहसील कार्यालयात चेन्नई सुरत महामार्ग भूसंपादन प्रश्र्नी बैठकीस आलेल्या विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ याना घेराव घालत आरक्षणाची मागणी केली.झिरवाळ यांनी आपण मराठा समाजाच्या मागणी सोबत असून वेळप्रसंगी राजीनामा देवू असे सांगत शासनाकडे पाठपुरावा करू असे सांगितले.
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, खडक सुकेणे, खेडगाव, वणी, कोराटे, आदी गावांसह 40 गावांमध्ये पुढार्यांना गांवबंदीचे फलक लावण्यात आले, तर जानोरी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.मातेरेवाडी येथे समाजाच्या आरक्षणास विरोध करणाऱ्या गुणवंत सदावर्ते यांचे प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
अनेक गावांत लोकप्रतिनिधींना गावबंदीचा निर्णय झाल्याने गाव करील ते राव काय करील’ या म्हणीचा प्रत्यय समाज बांधवांनी दाखवून दिला आला.
विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांना घेराव
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गेल्याकाही दिवसांपासून मराठा समाजाच्या माध्यमातून जोर लावण्यात येत आहे. यासाठी सातत्याने ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलन, उपोषण सुरू असून, मनोज जरांगे पाटील यांना ४० दिवसांत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण त्याची मुदत संपली असून, सरकारने आश्वासन पाळले नसल्यामुळे समाजाचा उद्रेक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उगारत सरकारला इशारा देत समाजाचे प्रश्न तीव्रतेने मांडत आहेत. त्यास पाठिंबा देत आज दिंडोरी येथे तहसील कार्यालयाच्या आवारात विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ आले असता त्यांना सोमनाथ जाधव, वलखेडचे सरपंच विनायक शिंदे, नितीन मोरे, संपतराव शिंदे, सुनील शिंदे, दत्तात्रय जाधव, मंगेश जाधव, नितीन पवार, गणेश कामाले, संदीप जाधव, गणेश आंबेकर, योगेश जाधव, सुनील पाटील, बापू जाधव, तुषार जाधव, सुदाम शिंदे, आदिसह मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नामदार झिरवळ यांना घेराव घालत मराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवावे अशी मागणी केली,
वेळप्रसंगी राजीनामा देईल – आमदार नरहरी झिरवळ विधानसभा उपाध्यक्ष
सरकारने त्वरित आरक्षणावर तोडगा काढला पाहिजे, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, आपण समाजासोबत असून समाजाची मागणी रास्त आहे, सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. जर प्रश्न सुटला नाही तर वेळप्रसंगी आमदारकीचा राजीनामा देवू.