Sunday, May 11, 2025

महाराष्ट्र

Maratha Aarkshan : मराठा आरक्षणाबाबत होणार मोठा निर्णय; मुख्यमंत्री आज जाणार जरांगेंच्या भेटीला...

Maratha Aarkshan : मराठा आरक्षणाबाबत होणार मोठा निर्णय; मुख्यमंत्री आज जाणार जरांगेंच्या भेटीला...

सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु


मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Aarkshan) मुद्दा प्रचंड तापला असून ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांनी पाणी व उपचार घेणे टाळल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यामुळे सरकारच्या हालचालींनाही वेग आला आहे.


मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसिमितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण यानंतर मुख्यमंत्री जरांगेंची भेट घेण्याकरता थेट जालन्यात अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे. कुणबी नोंदणी आढळणाऱ्यांना आरक्षण देण्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच आरक्षण दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी नियोजित केलेल्या समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.


बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत, तर मुख्यमंत्री जरांगेंच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. बैठकीनंतर चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निर्णय नेमका काय असेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment