
नाशिक (प्रतिनिधी) - नाशिक परीक्षेत्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासनातील लाचखोरीला चांगलाच पायबंध घालण्याची मोहीम छेडली आहे. साधारण वर्षभराच्या कालखंडात शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाच खोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकात वेसण घालताना तब्बल दिड शतक पुर्ण केले असल्याने मुघल सरदारांच्या घोडयांना पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचे तसे प्रशासनातील लाचखोरांना आणि त्यांच्या दलालांना शर्मिष्ठा वालावलकर आणि त्यांचे पथक दिसू लागले आहेत.
दीडशेच्या आसपास सापळे यशस्वी होऊन देखील आडमार्गाने लाच खोरी सुरूच असल्याची बाब वालावलकर यांच्या लक्षात आल्यानंतर जन जागृतीचा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी सोडला. समाजाचे मन परिवर्तन केल्या शिवाय ही लाचखोरी थांबणार नाही हे हेरून समाज ज्यांचे अनुकरण करतो, ज्यांना समाजात आदराचे स्थान आहे असे खेळाडू, कायदे तज्ज्ञ, कलाकारांची मदत घेऊन त्यांनी लाच देणे आणि घेणे कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने समाजाने त्यापासून परावृत्त व्हावे असे आवाहन केले आहे.
इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर आपोआप मार्ग सापडतो याचेच हे उदाहरण. अभिजित खांडकेकर, चिन्मय उदगिरकर, विद्या करंजीकर, किरण भालेराव, प्रार्थना बेहरे हे चित्रपट कलाकार, कब्बडी पटू आकाश शिंदे, विशेष सरकारी वकील अजय मिसर, ऍड नितीन ठाकरे, हिवरगावचे सरपंच पोपटराव पवार आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.