पुण्याच्या एस. एम. जोशी सभागृहात नुकतेच वसंत बापट आणि ग. प्र. प्रधान या सज्जनांच्या पुस्तक आणि गौरवानिमित्त कार्यक्रम होता. यावेळी साहित्यावर बोलणे अपेक्षित असताना काही तत्वशून्य विषारवंतांनी येथे आपला संघ द्वेषाचा, मोदी द्वेषाचा कंड थोडा शमवून घेण्याचा प्रयत्न केला.
पुणे येथे एस. एम. जोशी सभागृहात काही तथाकथित विचारवंत समजणारे निवडक डोकी जी वास्तवात विखार पसरविणारे विखारवंत आणि सामाजिक सद्भावना बिघडवण्यासाठी विष कालवणारे विषारवंत आहेत, असे सगळे जमले होते. स्वतःचा या प्रतिमेची खात्री असल्याने विनय हर्डीकर, विश्वास पाटील अशी मंडळी पण बोलावली होती. निदान या नावांमुळे थोडीफार श्रोत्यांमध्ये गर्दी जमेल. अर्थात निमित्त वसंत बापट आणि ग. प्र. प्रधान या सज्जन लोकांच्या पुस्तकांचा आणि गौरवाचा असल्याने त्यांची पुण्याई कामाला आली असावी. पण या थोड्याफार गर्दीचा फायदा घेऊन काही जणांनी आपला संघ द्वेषाचा, मोदी द्वेषाचा कंड थोडा शमवून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात जुन्या सवयीप्रमाणे बातमी आणि फोटोवरूनच कार्यक्रमाच्या भव्यतेचा खोटा भास निर्माण करण्यात यांचा हातखंडा कुणी धरणार नाही. त्यामुळे सगळीकडे तसे मथळे आले.
त्यातील लक्ष्मीकांत देशमुख एक! साहित्य संमेलनाचा माननीय अध्यक्ष असलेला हा माणूस! साहित्यावर बोलणे अपेक्षित होते. वसंत बापट यांच्या प्रतिभेवर, त्यांच्या कवितांवर बोलणे अभिप्रेत होते, पण ते बोलले मोदींवर. हिंदू राष्ट्रावर आणि २०२४ च्या निवडणुकीवर. या सगळ्या विघ्नसंतोषी लोकांना हल्ली कुठला ही प्लॅटफॉर्म मिळाला की, त्यावरून हिंदुत्ववादी लोकांना, विचारांना आणि मोदींना शिव्या देणे हा एकमेव कार्यक्रम यांनी स्वीकारला आहे.
काही वर्षांपूर्वी म्हणजे साधनाच्या कुठल्या तरी महोत्सवात कै. मंगेश पाडगावकर प्रमुख पाहुणे होते. त्यांनी त्यांच्या समाजवादी मित्रांना थोडा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांनी ‘नो more संघ द्वेष’ अशी एक सूचना करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंगेशजी म्हणाले होते, “आम्ही आमच्या, म्हणजे समाजवादी विचाराच्या प्रवासात एकमेव काम केले म्हणजे संघाचा द्वेष आणि द्वेष. यात संघाचे काहीच नुकसान झाले नाही. संघ वाढला. संघ सर्व क्षेत्रांत, सर्व दूर पसरला. जितका संघ वाढला तितके आपण (समाजवादी) छोटे होत गेलो. संघ एकसंध राहिला आणि आपण मात्र वेगवेगळ्या गटांत विखुरले गेलो. आपण याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.” अर्थात आमच्या साथींना ते मान्य होण्यासारखे नव्हतेच. पुढे पूजनीय गोळवलकर गुरुजी शताब्दी कार्यक्रमात उद्घाटनाला कविवर्य आले आणि मग काय विचारता? समाजवादी मंडळींकडून जवळ-जवळ ते बहिष्कृतच झाले.
आज मोदी द्वेषाने पछाडलेले समाजवादी हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. ज्या राम मनोहर लोहिया यांनी काँग्रेस आणि नेहरू धोरणाला शेवटपर्यंत विरोध केला, ज्या जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस विरुद्ध संपूर्ण क्रांतीच्या रूपाने देश उभा केला त्या दोघा कुळपुरुषांचा उधार करायला निघालेले हे ढोंगी, तत्त्वशून्य समाजवादी आहेत. जो मोदी, संघ यांना विरोध करेल तो यांच्या कळपात घुसतो आणि ते त्याचे स्वागत करतात. त्यामुळे यांची राजकीय आणि वैचारिक दिवाळखोरी अधोरेखित झाली आहे. याच मालिकेतील एक तत्त्वशून्य माणूस म्हणजे रावसाहेब कसबे. “झोत” नावाचे एक पुस्तकवजा टिपण. काय त्याने लिहिले तो समाजवादी लोकांच्या गळ्यातील ताईत बनला. संघ, पूजनीय गुरुजी यांना शिव्या देतो ना मग घ्या याला कळपात, द्या त्याला पुरस्कार, घोषित करा महान विचारवंत म्हणून, द्या अनुदानाचे मलिदे आणि द्या त्याला शासकीय, विद्यापीठ समिती. असे दिले की, मग तो निष्ठेने भुंकत राहील हे यांचे धोरण.
पण रावसाहेब कसबे थोडे जास्त हुशार. मध्यंतरी अटलजी सरकार आले. इकडे महाराष्ट्रात युतीचे शासन आले. हे साहेब लगेच त्यावेळी शिवसेनेत जाऊन मंत्रिपद मिळवणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांच्या जवळ गेले आणि बघता बघता त्यांनी LIC या संस्थेची सल्लागार समिती बळकावली की. त्यावेळी काही जणांनी अगदी ‘ब्रुटस यू टू!’ असे पण उद्गार काढले असणार. पण काय करता, त्यावेळी भाजपा, शिवसेना हे सर्व त्यांच्या दृष्टीने अगदी धर्मनिरपेक्ष झाले होते.
पुण्यातील कार्यक्रमात विशिष्ट जातींबद्दल जळजळ आणि मळमळ व्यक्त करताना आपण त्या पायी इंग्रजांची भलावण करत आहोत, हजारो, लाखो स्वातंत्र्य सैनिकांचा आपण अपमान करत आहोत, हे ते विसरले. इंग्रजांनी भारताला जगाशी जोडले हा जावईशोध त्यांनी लावला, तेव्हा खरे तर हर्डीकर आणि विश्वास पाटील यांनी कपाळाला हात मारून घेतला असता पण त्यांच्याही संयमाला दाद दिली पाहिजे.
वास्तविक “कृण्वंतो विश्वम् आर्यम!” किंवा “वसुधैव कुटुंबकम्” ही धारणा घेऊन जो भारतीय किंवा हिंदू समाज जगत होता, येथील मसाल्याचे पदार्थ, कापूस जगातील व्यापारी सोन्याच्या मोबदल्यात नेत होता, त्या देशाला इंग्रजांनी जगाशी जोडले म्हणणे म्हणजे खरोखर यांच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचेच द्योतक आहे. तक्षशीला, नालंदा विद्यापीठ येथे जगभरातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला येत असत. येथील संस्कृती, समाजजीवन अभ्यास करण्यासाठी परदेशातून लोक येत होते आणि हा बाबा इंग्रजांनी भारताला जगाशी जोडले, असे धादांत खोटे बोलतो. विश्वास पाटील यांनी संभाजी महाराज आणि सुभाषचंद्र बोस, पानिपत अशा कादंबऱ्या लिहिल्या याचा पश्चाताप व्हावा म्हणून रावसाहेब असे बोलले की काय? असे वाटावे लागते. कार्यक्रम कुठला? प्रसंग काय? काही नाही तर प्रधान मास्तर यांच्याकडून काही नितीमूल्ये, तर शिकायची पण मग ते रावसाहेब नावाचे ‘विखारवंत’ कसले? त्यात परत उदयन हे राजे झाले असते आणि फडणवीस हे पेशवे ही टिप्पणी पण त्यांचे थेट बारामती कुळाशी नाते स्पष्ट करणारी ठरली. श्रीपाल, लक्ष्मीकांत, रावसाहेब हे सगळे नावं बदलले तरी यांची साहित्यिक जातकुळी एकच म्हणावी लागेल.
लक्ष्मीकांत देशमुख यांनी हिंदूराष्ट्र हेच लक्ष केले. वास्तविक संघाने रूढ केलेला आणि आता समाजाने स्वीकारलेला हिंदू हा शब्द आणि हिंदू राष्ट्र ही संकल्पना याबद्दल देशमुखांना काही बोलण्याचे अधिकार नाही. यांना सरकारी अनुदानातून मिळणारे मालिदे आणि पुरस्कार बंद झाल्याने या सगळ्यांची चीडचीड होते आहे आणि त्यातून ही विखारी, विषारी अभिव्यक्ती ही सगळी मंडळी करत आहे. देशमुख, प्रधान यांचे उदाहरण देऊन त्यांनी कधी विचाराची तडजोड केली नाही सांगतात. देशमुखांनी हे जरा मोदीद्वेष या रोगाने पछाडलेल्या आणि समाजवादी विचाराचे आम्हीच वारसदार असा दावा करणाऱ्या लोकांनी कशा तडजोडी चालवल्या आहेत हे बघून लोहियांच्या तत्त्वांना तिलांजली देण्याचे जे काम चालू आहे ते पण स्पष्ट करायला हवे होते. असो.
कुठलीही कल्पना स्पष्ट नसताना अधिकारवाणीने बोलणे हे या मंडळींनाच जमो असे दिसते. कुठे दुर्गा भगवत यांच्यासारख्या रणरागिणी, पु. भा. भावे यांच्यासारखे निर्भिड, निस्पृह अध्यक्ष आणि कुठे देशमुख नामक एक तडजोडवादी. मराठी साहित्य परिषद हा या लोकांनी बळकवलेला एक अड्डा झाला आहे. साहित्यिकांच्या प्रेरणा ही डावी, समाजवादीच असली पाहिजे हा यांचा एक प्रकारचा वैचारिक वंशवाद आहे. त्यामुळे यांच्या मंडळींनी निर्मित केलेली आणि कुठलेही साहित्यिक मूल्य नसलेली पुस्तके, साहित्य याचा ते गौरव करत राहतात आणि दुसऱ्या वैचारिक वंशातील लोकांना कस्पटासमान मानायला लागतात.
आता अमळनेर येथे साहित्य संमेलनाचे जे मानचिन्ह नक्की झाले, त्यावरून ही यांची चिडचिड चालू आहे. हे निर्माण करणारा कुणी संघ कार्यकर्ता नाही. पण या निधर्मी मेंदूच्या मंडळींना केळीची पाने सत्यनारायणाच्या प्रतीकं वाटतात. ज्या पवित्र सखाराम महाराजांच्या वास्तू परिसरात हे संमेलन होत आहे त्याचे मंदिर या मंडळींना खटकले, तर आपल्या आद्य समाजवादी पूर्वज साने गुरुजी यांनी बलसागर भारत होवो हे गीत लिहिले होते, हे पण ते विसरले. या निर्बुद्ध आणि विद्वेषी मंडळींना आता काय म्हणायचे? केळीची पाने तेथील परिसरातील केळीची शेती करणाऱ्या आम शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व म्हणून आहे हे यांच्या सडक्या मेंदूत शिरणे केवळ अशक्य आहे.
एकूणच सर्वदूर एका आर्थिक समाज व्यवस्थेसाठी निर्माण झालेल्या विचाराचे रूपांतर हळू हळू कसे हिंदूद्वेष, व्यक्ती विद्वेष यात झाले आणि त्यातून जी शोकांतिका जन्माला आली, त्यातून जो विखार आणि विष पेरणाऱ्या जंतांची निर्मिती झाली याची अभिव्यक्ती म्हणजे पुण्यात झालेला कार्यक्रम होता. आम्हाला खंत एव्हढीच वाटते की, हे सगळे वसंत बापट, प्रधान मास्तर यांच्यासारख्या सज्जन लोकांच्या स्मृती जागवत असताना विश्वास पाटील, विनय हर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये घडले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…