Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनऋतू बदलला; आता वातावरण बहरू दे!

ऋतू बदलला; आता वातावरण बहरू दे!

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

“सचेतनांचा हुरूप शीतल,
अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही
पितात सारे गोड हिवाळा”

हिवाळ्याचे चपखल वर्णन करणाऱ्या या बा. सी. मर्ढेकरांच्या ओळी आता आठवू लागल्या आहेत. कारण बघता-बघता ऋतू बदलतो आहे. पावसाळा संपून आपल्या सर्वांनाच आवडणाऱ्या हिवाळा ऋतूचा आगमन होत आहे. हिवाळा ऋतू हा ऋतूंचा राजा म्हटला पाहिजे. पाऊस पडून गेल्यानंतर सौंदर्याने नटलेला निसर्ग, सूर्याची कमी झालेली धग, आजूबाजूला जणू जमिनीवरच धुक्याच्या रूपाने उतरलेले ढग… एकूणच संपूर्ण वातावरण आल्हाददायक झालेलं!

भारतात प्रत्येक भागात आणि प्रत्येक ठिकाणी या हिवाळ्याची रूपे वेगवेगळी पाहायला मिळतात. या ऋतूत काश्मीरमध्ये सुन्न करणारा बर्फ पडत असतो, तर दक्षिणेत उन्हाळा थोडाफार निवळतो. तसंही भारतातील प्रत्येक भागांत ऋतू त्याच्या वेगवेगळ्या रूपाने येत असतो. कोकणात हिवाळा ऋतू आला की चाहूल लागते ते आंब्याला फुटणाऱ्या पालवीची. आंबा हे पीक कोकणाचं वैशिष्ट्य आहे. इथल्या प्रत्येक मातीत पिकणारा आंबा स्वतःची वेगळी चव घेऊन येतो. तरीही देवगडचा हापूस आणि रत्नागिरीचा हापूस याची चव जगविख्यात आहे. हिवाळ्यात हे चित्र तसं पारंपरिक आहे. पण आता काळ बदलतोय. हवामान बदलते आहे. ग्लोबल वॉर्मिंगने त्याचे हात-पाय जगभरात पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच ऋतूंचं वेळापत्रक सुद्धा बदलले आहे. उशिरा येणारा पावसाळा, एकाच वेळी एकाच ठिकाणी ढगफुटीसारखा भरपूर पडणारा पाऊस असे चित्र कोकणात पाहायला मिळू लागले आहे. खरं तर कोकण हा भरपूर पर्जन्य असलेला प्रदेश! मात्र सरलेल्या पावसाळी ऋतूने भविष्यात कोकणात सुद्धा पाण्याअभावी दुष्काळ होऊ शकतो, याची चाहूल दिली आहे. यंदा पाऊस कोकणात पडलाच नाही. परतीच्या पावसावरची आशा सुद्धा संपुष्टात आली, तर मागच्या हंगामात थंडी सुद्धा म्हणावी तशी पडलीच नव्हती. एकूणच गेल्या वर्षीचा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हा ऋतूंचा पॅटर्न समाधानकारक नव्हता. ना थंडी पुरेशी पडली, ना पुरेसा पाऊस पडला… अनुभव काय तो आला शरीर भाजून काढणाऱ्या उन्हाळ्याचा.

अशा परिस्थितीत कोकणामध्ये सर्वच परिस्थितीवर, जीवनमानावर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला. गत वर्षी थंडी पुरेशी न पडल्याने जानेवारीपासूनच झाडावर दिसणारा आंबा यंदा पुरेसा दिसलाच नाही… एकीकडे कडक उन्हाने सर्वसामान्यांची लाहीलाही होत असताना यंदाचा उन्हाळा जून महिन्याच्या शेवटपर्यंत लांबला. त्यानंतर पाऊस मुसळधार पडेल ही शक्यता पूर्णपणे खोटी ठरली. जुलैचे केवळ दोन ते तीन आठवडे पडलेल्या पावसानं संपूर्ण ऑगस्ट महिना हा कोरडा ठेवला. सप्टेंबर महिन्यात काही सरी कोसळल्या होत्या. पण परतीच्या पावसाकडे अनेकांनी डोळे लावून धरले होते, त्यानेही निराशा केली. त्यामुळे सप्टेंबर महिना सुद्धा तसा कोरडाच गेला. न पडलेल्या पावसाची ही भीषणता जानेवारीपासून कोकणकरांना पाण्याच्या टंचाईच्या रूपाने दिसू लागणार आहे.

आजही कोकण हा या ऋतूंवर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या स्त्रोतांवर अवलंबून आहे. मुसळधार पाऊस पडतो, मुबलक पाणी मिळतं, त्यातून कोकणकरांची तहान भागते. उत्तम थंडी पडते, आंब्याच्या झाडांना चांगला मोहर येतो आणि त्यातून आंब्याचा चांगलं पीक निर्माण होतं. उबदार वातावरणामुळे, समुद्रात चांगले मासे तयार होतात आणि मच्छीमारी व्यवसायाला पोषक वातावरण मिळते. या आंबा आणि मच्छीवरच कोकणी माणूस स्वतःचा उदरनिर्वाह करतो. पावसाळ्यात होणारी भातशेती ही त्याला स्वतःच्या कुटुंबासाठी अधिक पुरते. त्यामुळेच आंबा, काजू आणि मच्छी या तीन गोष्टींवर कोकणची आर्थिक उलाढाल चालते. मात्र ज्या निसर्गावर हा कोकणी माणूस अवलंबून आहे, त्या निसर्गाने स्वतःच रूप बदलायला सुरुवात केली आहे. ना पुरेसा पाऊस ना पुरेशी थंडी, असं चित्र सन २०२२-२३ मध्ये कोकणी माणसाला पाहायला मिळाले आहे. ही आगामी संकटाची एक चाहूल आहे.

खरं तर कोकण हा मुबलक वृक्षराजांचा, जंगलाचा भाग! पण आज तिथे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होताना दिसते आहे. अर्थातच त्याचा परिणाम हा इथल्या पडणाऱ्या पावसावर होणार हे अपेक्षित आहे. त्याच वेळेला ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही जागतिक समस्या असली तरीही त्याचा परिणाम हा भारतात केरळानंतर कोकणातच पाहायला मिळणार आहे. पश्चिमी दरवाजातून भारतात येणाऱ्या मान्सूनच प्रवेशद्वार हे केरळ आहे. त्यानंतर मान्सूनचा दुसरा प्रवासातला टप्पा हा कोकण असतो. त्यामुळेच हवामानावरचा, पावसावरचा सर्वात मोठा परिणाम हा या कोकणावर होताना दिसतो. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या कोकणकरांसाठी बदललेल्या ऋतू ही एक मोठी गोष्ट ठरत आहे. यांच्या परिणामाचे चित्र सरलेल्या वर्षात कोकणात पाहिले. यंदा थंडी पडून अवघे दोनच दिवस झालेत. पोषक वातावरण हळूहळू निर्माण होते आहे. मात्र ही थंडी टिकली पाहिजे. बराच वेळ राहिली पाहिजे, तरच आंब्याच्या झाडांना पालवी फुटेल. त्या पालवीचे रूपांतर आंब्यासाठी पोषक असणाऱ्या मोहरामध्ये होईल आणि उन्हाळ्यात कोकणकरांच्या हातात आंब्याचं चांगलं पीक येईल; परंतु या सगळ्याच गोष्टी हे जर-तरवर म्हणजेच निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. निसर्गाने न कोपता त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कोकणकरांना यंदा तरी चांगलं दान द्यावं, अशी अपेक्षा आता कोकणकर नागरिक व्यक्त करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -