Tuesday, July 9, 2024

तथास्तू

  • संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

दृढभाव मनात सदैव जागृत ठेवून कार्य केलं की, सगळेच संकल्प सिद्धीस जातात. म्हणूनच चित्तात सदैव शुभ संकल्पच धारण करावेत. असे म्हणतात, आपण जे विचार मनात आणतो, जे बोलतो, जे वागतो त्याला वास्तू नेहमी “तथास्तू” म्हणत असते. त्यामुळे नेहमी चांगलं वागावं, चांगलं बोलावं. चांगलेच विचार मनात आणावेत. इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल देखील…!

रिपोर्ट वाचणाऱ्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून समोर बसलेला पंचाहत्तर वर्षांचा सॅम धास्तावला होता.

काय झालंय आपल्याला? सहा महिन्यांपूर्वी तर आपलं फूल बॉडी चेकअप करून डॉक्टरांनी आपल्याला “यू आर ऑल राईट” असं सांगितलं होतं. पण गेल्या पंधरा दिवसांत ही पोटदुखी अचानक उद्भवली. काय झालं असेल आपल्याला?

“डॉक्टर, प्लीज सांगा. मला नेमकं काय झालंय?” सॅमने कळवळून विचारलं.

“तुमच्यासोबत कुणी घरचे आले आहेत का?” डॉक्टरांनी प्रतिप्रश्न केला.

“नाही डॉक्टर, घरी मी एकटाच असतो. माझी पत्नी मार्था चार वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेज होऊन गेली. मोठा मुलगा जॅक त्याच्या कुटुंबासह लंडनला असतो. धाकटी मुलगी लिंडा तिच्या नवऱ्या-मुलांबरोबर कॅनडात राहाते. इथे न्यूयॉर्कमधे मी एकटाच राहातो. घरातली थोडीफार कामं करायला सकाळ संध्याकाळ एक नोकर येतो. बस्स.”

ओह. डॉक्टरांनी एक सुस्कारा सोडला आणि म्हणाले, “मिस्टर सॅम, तुम्हाला लिव्हरचा कॅन्सर झालाय. तो आजूबाजूलासुद्धा बराच पसरलाय. किडनी, पॅन्क्रियाजला देखील लागण झालीय.”
“ओह गॉड. मग आता…” सॅम हडबडला.

“खरं सांगायचं तर ऑपरेशन किंवा किमो देऊनही फारसा उपयोग होईल असं वाटत नाहीये. उलट वेदना वाढतील. थोडंफार आयुष्य वाढेल इतकंच. पण ते भयानक असेल.” डॉक्टर मऊ पण स्पष्ट शब्दांत म्हणाले.

“नको डॉक्टर, मी मरणाला घाबरत नाही. पण… पण मला अजून थोडं जगायचं आहे. किमान आठ महिने तरी. यंदाच्या ख्रिसमसला माझी दोन्ही मुलं, सून, जावई, नातवंडं मला भेटायला इथे न्यूयॉर्कला येणार आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत आमची प्रत्यक्ष भेट झालेली नाही… प्लीज किमान ख्रिसमसपर्यंत तरी…”

आपण प्रयत्न करूया. मी औषधं लिहून देतो. ती नियमित घ्या. वेदना वाढल्या, तर पेनकिलरचं इंजेक्शन घ्या. ते तुम्ही डायाबिटीसच्या इंजेक्शनसारखं हे स्वतःच टोचून घेऊ शकता.

“ठीक आहे. पण डॉक्टर एक विनंती करतो. माझ्या या आजाराबाबत कुठेही बोलू नका. माझ्या मुलांना, नातेवाइकांना, मित्रांना कुणालाही हे कळता कामा नये.” बोलता बोलता सॅमने हात जोडले.

त्यादिवशी घरी आल्यापासून सॅम एकदम बदलला. प्रत्येक क्षणाला मृत्यू आपल्या जवळ जवळ सरकत आहे या भावनेनं मन भर पसरलेली भीती आणि त्याबरोबरच आपल्याला मृत्यूची आगाऊ सूचना मिळाल्यामुळे आवराआवर करायला वेळ मिळालाय याबद्दल दिलासा अशा परस्परविरोधी भावना त्याच्या मनात दाटून आल्या होत्या.

मार्थाला तर वेळ मिळाला नव्हता. बाथरूममध्ये पडली. डोक्याला मार लागला. अखेरपर्यंत ती कोमातच होती. ना कुणाशी बोलली ना काही सांगितलं.

आपल्याबाबतीत असं झालेलं नाहीये. मृत्यूने चांगली आगाऊ सूचना दिलीये. चांगले आठ महिने आपल्या हातात आहेत… सॅम तयारीला लागला.

मार्था ब्रेनडेड झाल्यानंतर आपण तिचे अवयवदान केले होते. आपल्याबाबतीत हे शक्य नसलं तरी निदान देहदान तरी… जवळच्या हॉस्पिटलमधे जाऊन सॅमने देहदानाचा फॉर्म भरला. वकिलाला गाठून मृत्यूपत्र तयार केलं. उरलेल्या दिवसांत काय काय करायचं आणि काय करायचं नाही याची यादी केली.
सॅम एक एक दिवस जगत होता. औषधं, पथ्यपाणी नीट सांभाळत होता. मित्रांना नियमित फोन करत होता. मनात धास्ती असूनही आनंदात जगण्याचा प्रयत्न करीत होता.

ठरल्याप्रमाणे सॅमचा मुलगा, सून, मुनगी जावई आणि सर्व नातवंडं ख्रिसमसच्या सणासाठी सॅमच्या घरी आली. सॅमने सगळ्यांसोबत सण साजरा केला. नातवंडांशी खेळला. सुनेचं, जावयाचं कौतुक केलं. सगळ्यांना भेटवस्तू दिल्या.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री छान पार्टी ठेवली होती. त्या पार्टीत तो मनसोक्त वावरला. उंची वाईन प्यायला, चांगलं चवदार जेवला. सगळ्यांना हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा देऊन झोपला आणि… आणि सकाळी उठलाच नाही. झोपेतच तो गेला.

सॅमच्या अंतिम इच्छेनुसार त्याचं कलेवर मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटलला दान करण्यात आलं. नियमानुसार त्याच्या आजारपणाची फाइलदेखील हॉस्पिटलच्या ताब्यात देण्यात आली. लिव्हरच्या कॅन्सरची केस कशी असते ते विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी सॅमचं कलेवर जेव्हा उघडलं त्यावेळी सगळ्या प्रोफेसर डॉक्टरांना धक्काच बसला. सॅमचं लिव्हर एकदम ठणठणीत होतं. त्यात कॅन्सरचा लवलेशही नव्हता.

चौकशी सुरू झाली. त्यात समजलं की, केवळ नावातल्या साधर्म्यामुळे दुसऱ्याच कुणा सॅमचे रिपोर्ट या सॅमच्या नावावर प्रिंट झाले होते.

सर्वजण हळहळले. त्यानंतर पुढे मृत्यूची आणखीही चौकशी झाली. सॅमच्या डायऱ्या तपासल्या गेल्या, त्यावेळी आढळलं की, दररोज रात्री झोपण्यापूर्वी सॅम आपल्या डायरीत उरलेल्या दिवसांतला एक एक दिवस वजा करून आकडा लिहीत होता. सॅमने स्वतःच्या आयुष्याचं स्वतःच काऊंटडाऊन सुरू केलं होतं. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री झोपण्यापूर्वी त्याने डायरीत शून्याचा आकडा लिहिला आणि त्याच रात्री तो मेला.

कोणताही मोठा रोग नसून देखील सॅम मेला. त्याच्या मृत्यूचं एकमेव कारण म्हणजे त्याला स्वतःला मरायचं होतं. आपण नेमके किती दिवस जगणार आहोत आणि कधी मरणार आहोत, हे त्याने स्वतःचं स्वतःच ठरवलं होतं. तो दररोज दर क्षणाला आपल्या मृत्यूचं चिंतन करत जगत होता. म्हणूनच तो त्यानं ठरवलेल्या दिवसापर्यंत जगला आणि ठरवलेल्या दिवशीच मेला.

याला आकर्षणाचा सिद्धांत (लॉ ऑफ अट्रॅक्शन) असंही म्हणतात. या सिद्धांताचा एक नियम असा आहे की, आपल्याला जे हवं आहे ते मनालासा सांगून सतत त्याचा विचार करीत राहिलं, त्यानुसार वागत राहिलं, तर ती गोष्ट नक्कीच साध्य होते.

संस्कृतमधे एक वचन आहे.
‘यद् भावो तद् भवति।’
अर्थ ः जसा आपला भाव असतो तसंच घडतं.

इथे भाव या शब्दाचा नेमका अर्थ ध्यानात घ्यायला हवा. भाव म्हणजे केवळ इच्छा नव्हे, तर ती इच्छा नक्की प्रत्यक्षात येणारच आहे, नव्हे आलीच आहे अशी कल्पना करणं. त्यावर दृढ विश्वास ठेवून कार्य करणं म्हणजे भाव. हा दृढभाव चित्तात सदैव जागृत ठेवून कार्य केलं की, सगळेच संकल्प सिद्धीस जातात. म्हणूनच चित्तात सदैव शुभसंकल्पच धारण करावेत.

नेहमी चांगलं वागावं, चांगलं बोलावं. चांगलेच विचार मनात आणावेत. इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल देखील. कारण आपण जे विचार मनात आणतो, जे बोलतो, जे वागतो त्याला आपल्या आजूबाजूचं विश्व म्हणजेच वास्तू नेहमी “तथास्तू” म्हणत असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -