Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिककोलाजSQ3R Study technique : अभ्यासाची एक महत्त्वपूर्ण पद्धत

SQ3R Study technique : अभ्यासाची एक महत्त्वपूर्ण पद्धत

 • प्रासंगिक : डॉ. स्वाती गानू

SQ3R ही सर्वेक्षण, प्रश्न, वाचा, वाचन आणि पुनरावलोकन या पाच चरणांनी मिळून बनलेली अभ्यासाची एक महत्त्वपूर्ण वाचन आकलन पद्धत आहे. कोणताही पाठातील आवश्यक अशी माहिती कशी गोळा करावी हे जाणून घेण्यासाठी या पाच चरणांचा उपयोग होतो. वाचनातून मिळणारी माहिती महत्त्वाची असते. जर अभ्यास करताना विद्यार्थी काही न समजून घेता फक्त ते सरधोपटपणे करायचे म्हणून करतात, तर यात मुले त्यांचा बराच वेळ वाया घालवतात. SQ3R पद्धतीने अभ्यास करताना विद्यार्थी त्यांच्या मनाला शिकण्यासाठी प्रशिक्षित करू शकतात. जेणेकरून विद्यार्थी एका वाचनातच घोकंपट्टी करून नाही, तर विषय समजून घेत अभ्यास करू शकतात. त्यामुळे SQ3R ही अभ्यासाची एक महत्त्वपूर्ण पद्धत मानली जात आहे.

मुलांसाठी शैक्षणिक आयुष्य खरोखरच सोपं नाही. एक ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणं, परीक्षा देऊन स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणं म्हणजेच चांगले गुण मिळवणं हे मुलांसाठी आणि आजकाल तर पालकांसाठीही एक आव्हानच असतं. पालकांच्या अपेक्षा, वाढती स्पर्धा तर असतातच. पण याबरोबरच मुलांच्याही स्वतःच्या स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा मात्र बहुतेक वेळा याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. अभ्यास कसा करावा हे नीटसं माहीत नसल्याने, कोणी सांगितलं नसल्याने मुलं अभ्यासक्रमातील कठीण भाग समजून न घेता नुसते लेखन आणि पाठांतर यावरच अवलंबून आहेत. मग फक्त स्मरणशक्तीचीच परीक्षा होते आणि स्मरणशक्तीने दगा दिला, तर मुलाची बुद्धिमत्ता कमी समजली जाते. म्हणूनच अभ्यास करण्याची ही सर्वसमावेशक पद्धत खूप उपयुक्त ठरते.

मुलांनी अभ्यास विषय समजून घेऊन त्यावर प्रभुत्व प्राप्त करावं यासाठी ही अभ्यास पद्धती खूप उपयुक्त ठरू शकते. कोणती आहे ही अभ्यास पद्धत तर – ‘SQ3R Study technique’

ही शिक्षण पद्धत फ्रान्सिस रॉबिनसन या अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ याने शोधून काढली.

याच्या महत्त्वपूर्ण पाच पायऱ्या :

१) सर्व्हे – Survey
२) प्रश्न – Question
३) वाचन – Read
४) पाठ करणे – Recite
५) पुनर्विलोकन, पुनर्परीक्षण – Review

 • धडा वाचायला सुरुवात करताना : धड्याचं नाव, धड्याचा विषय, त्यातील आकृत्या, त्याचा सारांश (summary), या धड्यातून मी काय शिकणार आहे ते मुद्दे, व्याख्या, सूत्रे, नियम लिहून काढणं.
 • धड्याखालचे प्रश्न प्रथम वाचून मग धडा वाचायला सुरुवात करायची. त्यामुळे मुलं धडा वाचताना सजग राहतात. वाचतानाच प्रश्नांची उत्तरं शोधण्यामुळे एकाग्रता राहते.
 • एक परिच्छेद वाचला की डोळे मिटून आपण काय वाचलं ते आठवा, मनावर बिंबवा. काही विसरलं असेल, तर परत वाचा.
 • यानंतर आपण काय शिकलो आणि त्यातील कोणते मुद्दे पुढच्या चॅप्टरसाठी कोणते मुद्दे उपयोगी पडतील ते पाहा.

comprehensive reading केल्याने समजण्यात एक प्रकारे सर्वसमावेशकता येते. ही पद्धत प्रभावी वाचन करायला, महत्त्वपूर्ण मुद्दे रिटेन करायला अतिशय उपयुक्त साधन आहे. अवघड संकल्पना समजून घ्यायला ही पद्धत मदत करते.

आता या पाच टप्प्यांचा सविस्तर विचार करू या.

१) Survey अर्थात सर्वेक्षण :

अभ्यासाच्या धड्यातील माहितीचे सर्वेक्षण मुलांनी कसं करायचं, तर धड्याची आऊटलाइन जाॅट डाऊन करणं. म्हणजे काय तर

 • त्या धड्यातील मुद्दे, उपमुद्दे, चित्रे, फॅक्ट बॉक्सेस पाहणं.आकृत्या, चार्ट, दृकसाधने, ग्लोसरी, शीर्षक उपशीर्षक वाचणं.
 • समरी, ॲबस्ट्रॅक्ट, प्रश्न, मुद्द्यांवर चर्चा करणं.
 • संदर्भ कुठले घेतलेत ते वाचणं.
 • किती पाने एकूण आहेत ते पाहणं
 • बोल्ड टाइपमधील टर्म्स वाचणं.
 • नोट्स काढणं.

सोय म्हणजे पालकांनी नीट पाहिलं, तर आजकाल पाठ्यपुस्तकात धड्यांची रचना अशीच छापलेली असते. शाळेत शिकवत असताना मी अशीच पद्धत धडा शिकवण्यापूर्वी वापरत असे. एक तास फक्त धड्याची तोंडओळख करण्यास वापरायला काहीच हरकत नाही. यातून मुलांना तो टाॅपिक समजायला दिशा मिळते.

कदाचित काही पालकांना मुलांनी हे करणं कठीण वाटेल. पण एखाद्या विषयाचा अभ्यास कसा करायचा असतो ही दृष्टी लहानपणापासून मुलांना दिली, तर एक सर्वसमावेशक अभ्यास करण्याची सवय मेंदूला आणि अर्थातच मनालाही लागते. मुलांचा आत्मविश्वास वाढतो.

२) Questions प्रश्न :
या परिच्छेदात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत?

 • मला आधीपासून जे ठाऊक आहे त्याच्याशी संबंधित (related) ही माहिती आहे का?
 • धड्यातील संकल्पना concepts कशा राबवता येतील. प्रत्यक्षात त्या इम्प्लिमेंट कशा करता येतील?
 • दिलेली माहिती, नवीन कल्पना या मला समजत नसतील, तर त्याचा खोलवर अभ्यास मार्गदर्शन घेऊन करायला हवाय का?

३) Read वाचन :

 • वाचन करतानाच धड्याखालील प्रश्नांची उत्तरं शोधणे.
 • महत्त्वाचे मुद्दे मार्क करणे. highlight or underline.
 • संकल्पना समजून घेण्यावर लक्ष एकाग्र करणे.
 • नवीन माहितीचा जुन्या माहितीशी कनेक्ट करणे.
 • अभ्यासात सातत्य ठेवणे. active reading म्हणजेच सजग वाचन करणे. अभ्यास झाल्यावर review पुनरावलोकन करणे.

४) Recite पाठ करणे :

 • एकदा का टाॅपिक वाचला की तयारी छान होते पण तरी काही भाग विसरू शकण्याची शक्यता असते म्हणून recall करायचे म्हणजे डोळे मिटून मनातल्या मनात किंवा तोंडी मोठ्याने किंवा पाॅइंट्स लिहून किंवा आपण मैत्रिणीला शिकवतोय असं समजून हे करता येतं.
 • मनात काही शंका असल्यास ती नोट्स, पझल्स, डिस्कशनद्वारे दूर करून घ्या.

५)Review पुनरावलोकन :
आपण जे शिकलो त्याचे संपूर्ण पण पुन्हा एकदा अवलोकन अर्थात Review करा.

 • किती लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
 • महत्त्वाच्या मुद्द्यांचे क्यूज
 • किती समजलंय ते चेक करा.
 • गोल अचिव्ह करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन द्या.
 • ग्रुप स्टडीज, फ्लॅश कार्ड, ऑनलाइन व्हीडिओ, ट्यूटोरियलची मदत घ्या.

अशा या SQ3R अभ्यास पद्धतीचे फायदे काय आहेत?

 • नेमकं काय वाचायचं? हे कळते. तसेच विचार प्रकियेला चालना मिळते
 • अभ्यास मटेरियल तर चांगलं समजतच पण ती माहितीही बराच काळ टिकते. मुलं आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जाऊ शकतात.
 • प्रत्येक टाॅपिकला कमी वेळात, कमी प्रयत्न करूनही पोर्शन कव्हर होतो.
 • रिव्हिजन करताना नोट्स की पाॅइंट्स, समरी याचा खूप उपयोग होतो.
 • चॅलेंजिंग असलं तरी लक्षात ठेवायला सोपं जातं.
 • प्रश्न विचारणं, आठवणं, नियमितपणे रिव्हिजन करणं हे या पद्धतीतून होते.
 • मुलांना त्यांची आवड आणि क्षमता समजून घेता येते.

अशी ही संपूर्ण, समावेशक अभ्यास पद्धत मुलांना, शिक्षकांना सगळ्यांनाच उपयोगी ठरते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -