Saturday, July 20, 2024

काव्यरंग

कोजागिरी

पिंपळाखाली जमली
जंगलातील प्राणी सारी
सर्वानुमते ठरविले
साजरी करायची कोजागिरी

सायंकाळ होताच
माकड दूध घेऊन आला
रागावून हत्ती म्हणाला
किती उशीर केला?

मोठे भगोने घेऊन
गाढव धावत आले
साखर आणण्याचे काम
अखेर सशानेच केले

मॅह मॅह करीत
आली धावत शेळी
तिने पण आणली
दूध घोटायला पळी

नुसत्या दुधाकडे पाहूनच
सारे प्राणी जिभल्या चाटे
सर्व दूध आपल्यालाच मिळावे
असे प्रत्येकाला वाटे

कोल्ह्याने केली चूल
तीन दगड मांडून
पण गाढवाच्या धक्क्याने
दूध गेले सांडून

भीतीने गाढव
पळाले आपल्या घरी
कोजागिरी न झाल्याने
सर्वांना दुःख झाले भारी

– रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ

बंदिस्त सारे

तो स्वयंप्रकाशित
दानशूर अभिमानी
दिवसाचा दूत तो
फकीर असा निर्मोही
गुरुत्वाकर्षण तिच्यातलं
आसाभोवती फिरत राही

दरवळलेली सांज
त्या दोघांनाही मोहीत करते
कळ्या फुलांचा साज
मिठीत त्याच्या उधळून देते

निर्मोहीच तो…
वळून कुठे मागे पाहतो
हुरहुर तिच्या काळजाची
शशी दुरून न्याहाळतो

अंगोपांगी चंद्रबिंब मग
पांघरुनी ती घेते
श्वासात गुंफता श्वास
रातराणी दरवळून येते

तटस्थ उभी किनाऱ्यावर
तेजोवलय न्याहाळते
सोन पावलांचे ठसे
गोंदवून हृदयी घेते

स्वयंप्रकाशी जरी तो
प्रियेविना अधुरा
जाणतो तोही अंतर्मनी
कर्मयोगाचा पसारा

विधात्याच्या आधीन सारे
सुटका कोणाचीच नाही
युगानुयुगाच्या चक्रामध्ये
बंदिस्त ते तिघंही राही

– लता गुठे, मुंबई

स्केल पट्टी

कंपासमधली स्केल पट्टी
म्हणे मुलांनो झाली सुट्टी…

रबर, पेन्शील झाले खूश
घेऊ म्हणाले मधुर ज्यूस…

कोनमापक बसले रुतून
करकटकचा पाय गुंतून…

तेवढ्यात वर्गात आले सर
म्हणती भूमिती काढा वर…

भूमितीचा पहिलाच धडा
आदेश आला रेषा ओढा…

रेषा ओढायला घेतली पट्टी
तेव्हा तिने काढली थुट्टी…

कंपासमध्ये बसली जाऊन
आतून कुलूप घेतले लावून…
– भानुदास धोत्रे, परभणी

पहिल्या प्रेमाचे ‘माझे गुपित’!

पहिल्या ‘भेटीचा’ पहिला ‘आनंद’.
लुटायला आधार झालो होतो!
कधी येईल ‘ती’ मी,
तिची ‘आतुरतेने वाट’ पाहात होतो!

‘हृदय’ माझे ‘धड‌धडत’ होते!
श्वास ‘रोखून रोखून’ घेत होतो!
एकदा ‘या’ एकदा ‘त्या’ अशा
पायांवर मी नाच करीत होतो!

‘येत जात’ बरेच होते पण
‘ती माझीच’ फक्त येत नव्हती!
मनांत ‘विसरल्याची’ धास्ती,
‘सारखी’ मला वाटत होती!

‘वेळ’ जसजसा जात होता,
‘उत्सुकता’ शिगेवर पोहोचली होती!
इतक्यात एक ‘मर्सिडीज’ गाडी,
माझ्यासमोर येऊन उभी राहिली!

हळूच ‘काच’ वर ‘सरकली’
‘ड्रायव्हर’ने मला पाहिले!
सदर ‘Hello’ देशपांडे म्हणून मला
‘प्रेमाने’ आपल्याजवळ बोलविले!

‘Sorry’ देशपांडे म्हणून त्याने,
मला ‘जे काही’ सांगितले!
‘गुपित’ माझ्या ‘पहिल्या प्रेमाचे’
मी न ‘अजून’ कोणा ‘सांगितले!’

– अनिलकुमार विष्णू जोशी, नौपाडा, ठाणे (पश्चिम)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -