Wednesday, August 6, 2025

Manoj Jarange Patil : चर्चेसाठी सरकारला दोन दिवस देतो, त्यानंतर माझी बोलती बंद होईल...

Manoj Jarange Patil : चर्चेसाठी सरकारला दोन दिवस देतो, त्यानंतर माझी बोलती बंद होईल...

जरांगेंनी काळजी घेण्याचं फडणवीसांचं आवाहन 


मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी पाणी घेणंही बंद केलं आहे. रोज डॉक्टर तपासणीकरता येतात, मात्र जरांगे उपचारही करु देत नसल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. दरम्यान, त्यांनी सरकारला चर्चेसाठी दारं खुली केली आहेत. दोन दिवस मी बोलू शकतो त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचंय ते बोला, असं जरांगे म्हणाले आहेत.


आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. माझ्या हृदयाला काहीही होणार नाही. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल. मला काहीही झालं तरी मराठा समाज आंदोलन करणारच आहे.


पुढे जरांगे म्हणाले की, गावागावात प्रवेशबंदी केल्यामुळे आम्हाला चर्चेला येऊ देत नाहीत असं कारण देत सरकार आम्हाला आरक्षण देणार नाही. यासाठी दोन दिवस मी चर्चेकरता तयार आहे. त्यानंतर मला बोलता येणार नाही. माझी बोलती बंद झाल्यावर रट्टे खाण्यासाठी येणार का? तुमचे कोण मातब्बर आहेत, त्यांना घेऊन या. मराठा समाज तुम्हाला काहीच बोलणार नाही. उलट तुम्हाला संरक्षण देईल, असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम तेथे हजर आहे. शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचा आहे. जरांगेंच्या सोबतच्या लोकांनी देखील त्यांची काळजी घ्यावी. स्वत: मुख्यमंत्री या विषयात लक्ष घालून आहेत. जे योग्य निर्णय आहेत ते झाले पाहिजे असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >