Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजPresent : वर्तमानात जगा

Present : वर्तमानात जगा

  • ओंजळ : पल्लवी अष्टेकर

वर्तमानात जगताना व्यक्तीचा त्याच्या विचारांवर ताबा असतो. वर्तमानात जगण्याच्या कलेमुळे आपण अधिकाधिक ज्ञान व कौशल्य आत्मसात करू शकतो. संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की, वर्तमानकाळात जगणाऱ्या व्यक्ती या अधिक आनंदी, आशावादी, कमीतकमी नैराश्यग्रस्त व आयुष्याबाबत बहुतांशी वेळा समाधानी असतात.

खरोखरच या विश्वात वर्तमानकाळात जगायला किती लोकांना जमते? कित्येक व्यक्ती भूतकाळातील कटू आठवणी मनात घोळवत दु:खी राहतात, तर कितीतरी व्यक्ती सतत भविष्याच्या चिंतांनी ग्रस्त असतात व अस्वस्थ राहतात. त्यामुळे वर्तमानकाळातील, त्या प्रसंगातील आनंदापासून ते वंचित रहातात.

विशाखा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक लाडकी लेक. त्यांचे कुटुंब खाऊन-पिऊन सुखी, मध्यमवर्गीय असे होते. एका प्रदीर्घ आजाराने विशाखाच्या आईचे निधन झाले आणि ते कुटुंब दु:खात बुडाले. गावाकडून कायमस्वरूपी त्यांच्याकडे आजी-आजोबा राहायला आले. आजी-आजोबांच्या मदतीने कशी-बशी विशाखाच्या कुटुंबाने उभारी धरली; परंतु नुकतीच पास होऊन अकरावीत गेलेल्या विशाखाच्या आईबद्दलच्या आठवणी कमी होत नव्हत्या. खरं तरं विशाखा मुळात अतिशय हुशार मुलगी. कायम नंबरात येणारी; परंतु आईच्या जाण्याने तिला दहावीला जेमतेम पंचावन्न टक्के गुण मिळाले. तिने कलाशाखेत प्रवेश घेतला. मात्र विशाखाचे काॅलेजमध्ये मन रमत नव्हते. आपल्या प्रेमळ आईच्या सहवासात घालविलेले दिवस तिच्या डोळ्यांसमोर येत असत आणि तिचे मन भूतकाळात निघून जाई. या सर्वाचा परिणाम म्हणजे तिचे अभ्यासातील लक्ष उडाले. विशाखा एवढी हुशार मुलगी; परंतु तिचे काॅलेजात लक्ष नाही हे पाहून प्राध्यापकांनाही तिची काळजी वाटू लागली. तिचे प्राध्यापक येता-जाता आपुलकीने तिची चौकशी करत. तिच्या मैत्रिणी तिचे दु:ख कमी करण्यासाठी तिला काॅलेजव्यतिरिक्त कार्यक्रमांत सामील करून घेण्याचा प्रयत्न करत. जसे की, मैत्रिणींचे वाढदिवस, छोट्या सहलींचे आयोजन. विशाखाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास दोन-तीन वर्षांचा अवधी जाऊ द्यावा लागला. सर्वांच्या प्रयत्नांनी ती हळूहळू वर्तमानात जगायला शिकू लागली. अभ्यासासोबत मन रमण्यासाठी तिने मेहंदीचा वर्ग सुरू केला. आता ती आपल्या मैत्रिणी, नातलग यांच्यात मिळून-मिसळून वागू लागली. यात तिचे आजी-आजोबा, वडील यांचा संयम पणास लागला. पण त्यामुळेच विशाखा वर्तमानात जगू लागली. आजी तिला अधे-मधे, माझ्यासमवेत प्रवचनाला देवळात चल म्हणायची, तेव्हा विशाखाला खूप शांत वाटायचे. हळूहळू ती समाजात, मैत्रिणीत मिळून-मिसळून वागू लागली. वर्तमानकाळातील घडणाऱ्या घटनांमधून आनंद वेचायला शिकू लागली. त्यामुळे तिच्या मैत्रिणी, कुटुंबीय अशा सर्वांना बरे वाटले. तिची अभ्यासात होणारी चांगली प्रगती पाहून प्राध्यापकही तिचे कौतुक करू लागले. सर्वांच्या प्रयत्नाने विशाखा दु:खातून बाहेर येऊन स्थिरतेने व वर्तमानात जगण्यास शिकली. मध्यंतरी ‘पाॅवर ऑफ नाऊ’ (वर्तमानातील शक्ती) हे ‘एखार्ट टोल’ या जगद्गुरूंचे एक सुंदर वैचारिक पुस्तक माझ्या वाचनात आले. प्रत्येकाला वर्तमानकाळात जगता यावे यासाठी त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे विविध उदाहरणांनी व प्रसंगांनी समजावून सांगितली आहेत. एखार्ट टोल सांगतात की, “जोपर्यंत आपण वर्तमानात शक्ती प्राप्त करीत नाही, तोपर्यंत आपण अनुभवत असलेली प्रत्येक भावनिक यातना आपल्यामागे यातनेचा एक अवशेष टिकवून ठेवते, जो आपल्या आतमध्ये कायम टिकून रहातो.”

एखार्ट टोल यांना वयाच्या २९व्या वर्षी नैराश्याने ग्रासले. यासाठी त्यांच्या कौटुंबिक जीवनातील विविध चढ-उतार कारणीभूत होते. अगदी आत्महत्या करण्यापर्यंत त्यांचे विचार येऊन ठेपले; परंतु त्यांच्या हृदयाच्या पोकळीतून त्यांना शब्दं ऐकू आले की, “कशालाच विरोध करू नकोस.” अशा जाणिवेतून एखार्ट यांना एवढी सजगता आली की, भोवतालच्या वसुंधरेबद्दल त्यांना खूप प्रेम वाटू लागले. पक्ष्यांचा किलबिलाट मधुर वाटला. सूर्यप्रकाशाचे सोनेरी किरण तेजोमय वाटू लागले. आजूबाजूच्या निसर्गातून त्यांना शुद्ध अवस्थेतील जाणीव झाली. वर्तमानकाळात जगण्याची एक सुंदर अनुभूती त्यांच्या लक्षात आली. आंतरिक शांतीचा प्रवाह त्यांच्यात वाहू लागला. भूतकाळातील साठत गेलेले दु:खं म्हणजे तुमचे शरीर व मन व्यापून राहिलेले नकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र असते. भूतकाळातील दुखदं अनुभव व सतत भविष्यकाळाबद्दल अनाठायी चिंता यातून मनावर होणारे नकारात्मक परिणाम म्हणजे अस्वस्थता, चिंता, काळजी, बैचेनी, ताण, जरब, दहशत, भयगंड. मनाचे चक्र सतत भूतकाळ व भविष्यकाळात फिरवत राहिलात, तर मनाची अवस्था चिंतेच्या भोवऱ्यासारखी होऊन जाते.

जर मनुष्य वर्तमानाच्या साधेपणाशी व सामर्थ्याशी संपर्क तोडून बसला, तर ही चिंतेची पोकळी त्याची कायमची सोबत करेल. सतत पैसा, यश, सत्ता, मान्यता किंवा खास नातेसंबंध प्राप्त करू इच्छिणारे लोक हे अखंड मानसिक संघर्षात व स्वत:चा अहंकार यातून कुरवाळून घेण्यात रमतात, यातून ते मानसिक शांतता, लहान गोष्टीतील वर्तमानकाळातील आनंद गमावून बसतात. काही लोकांना बागकामाची आवड असते, काहींना गिर्यारोहण, काहींना गायन-नृत्य कला. असे कला किंवा छंद व्यक्तीला वर्तमानकाळात राहायला भाग पाडतात. ही एक सुंदर, चैतन्यमय अवस्था असते, जेव्हा व्यक्तीला भोवतालच्या परिस्थितीचे भान व जाणीव असते.

एखार्ट टोल सर्वांना उद्देशून सांगतात की, तुमच्या जीवनातील सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा सगळे काही सापेक्षत: सुरळीत चाललेले असते, तेव्हा अधिक चेतना आणणे जरूरीचे आहे. अशा प्रकारे तुमची वर्तमानातील शक्ती वाढते आणि ती तुमच्या भोवती उच्च वारंवारितेची स्पंदने असलेले ऊर्जा क्षेत्र तयार करते. वर्तमानकाळात जगणाऱ्या मनुष्याला भोवतालच्या परिस्थितीचे नेहमी भान व सजगता असते. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांचे व भावनांचे साक्षी बनायला शिकता, हा साक्षीभाव वर्तमानात असण्याचा आवश्यक घटक असतो.

वर्तमानात जगणाऱ्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने आयुष्याचा आस्वाद घेता येतो. त्यांचे ताण-तणाव कमी होतात. वर्तमानकाळात जगताना व्यक्तीचा त्याच्या विचारांवर ताबा असतो. वर्तमानात जगण्याच्या कलेमुळे आपण अधिकाधिक ज्ञान व कौशल्य आत्मसात करू शकतो. संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की, वर्तमानकाळात जगणाऱ्या व्यक्ती या अधिक आनंदी, आशावादी, कमीतकमी नैराश्यग्रस्त व आयुष्याबाबत बहुतांशी वेळा समाधानी असतात. वर्तमानकाळात जगता येण्यासाठी काही आवश्यक गोष्टी तज्ज्ञांनी सांगितल्या आहेत. यात आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करणे, एकाच वेळी असंख्य कामे डोक्यावर न घेणे, चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करणे, तडजोडीची क्षमता असणे, लक्षपूर्वक ध्यान करणे.

एखार्ट टोल यांनी सुंदर वाक्यात वर्तमानाचा अर्थ स्पष्ट केला आहे. तो म्हणजे, “जिथे तुम्ही जीवनाच्या प्रवाहाला अनुभवू शकता असे एकमेव स्थळं म्हणजे वर्तमान. वर्तमानकाळातील क्षणाला बिनशर्त व हातचे राखून न ठेवता मोकळेपणाने स्वीकारणे. जे आहे त्याला आंतरिक प्रतिकार करण्याचे सोडून देणे. यात समर्पणाची ताकद खूप आहे. समर्पण म्हणजे जीवनाच्या प्रवाहाला, स्वत:ला त्याच्या ताब्यात देण्याचे साधे; परंतु गहन शहाणपण.” म्हणून तणावमुक्त, आनंदी जीवन जगायचे असेल, तर वर्तमानकाळात जगण्याचा प्रयत्न करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -