Sardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

Share
  • गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

“जगातली कोणतीच शक्ती राष्ट्रभावना नष्ट करू शकत नाही. देशातील सर्व जनता आणि सीमारेषा एकत्र आल्या तरच देशाची खरी प्रगती होऊ शकते”, असे वल्लभभाई म्हणत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यांतच पटेलांनी ५६५ संस्थानाचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध अखंड भारताची निर्मिती केली. भारताचा आवाका पाहता जगाच्या इतिहासात हिंसेशिवाय देशातील राज्यांना एकत्र आणणे हे आश्चर्य मानले गेले.

भारताच्या उभारणीत, भारत एकसंध करण्याचे अद्वितीय कार्य करणारे लोहपुरुष; मूलभूत हक्क, किमान वेतन, अस्पृश्यता निवारण, नागरी स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, याचा सतत पाठपुरावा करणारे; देशहितापुढे कोणतीही गोष्ट न येऊ देणारे; भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक ज्येष्ठ, नि:स्वार्थी नेते, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांच्याकडे माहिती व नभोवाणी खातेही होते. सरदार वल्लभभाई पटेलांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ या दिवशी गुजरात राज्यातील नाडियाड तालुक्यांत करमसांद गावात झाला. आई लाडाबाई, वडील झावेरभाई साधे शेतकरी, त्यांचा १८५७ च्या झाशीच्या राणीच्या युद्धात सहभाग होता.

बालपणापासून वल्लभभाई वृत्तीने बंडखोर, करारी, विशेषतः अन्यायाविरुद्ध आवाज उठवीत. खेड जिल्ह्याच्या शाळेतच विद्यार्थी संघटना उभारून एका कठोर शिक्षकाविरुद्ध तीन दिवसांचा संप यशस्वी केला होता. विद्यार्थीदशेतच लग्न झाले. पत्नीच्या अकाली निधनानंतर, दुसरे लग्न न करता वल्लभभाईंनी आपल्या दोन मुलांसहित कुटुंबाचा सांभाळ केला.

वल्लभभाई लहानपणापासूनच स्वकर्तृत्वावर शिकले. २२व्या वर्षी मॅट्रिक झाले. बॅरिस्टर होण्याच्या जबरदस्त महत्त्वाकांक्षेने पैसे साठविले. एका कंपनीच्या मदतीने इंग्लंडला प्रथम क्रमांकाने बॅरिस्टर होऊन मायदेशी परतले. अहमदाबादमध्ये पैशासह यशस्वी फौजदारी वकील म्हणून नावाजले.

गांधीजींची शेतकरी, कामकरी लोकांचे दुःख जाणून घेण्याची वृत्ती, त्यांचा निशस्त्र सत्याग्रह्यामुळे वल्लभभाईंना म. गांधीजी भावले. गांधीजींच्या असहकार आंदोलनात वल्लभभाईंनी सक्रिय भाग घेऊन, लोकांना सोबत घेऊन संपूर्ण देश पिंजून काढला. या चळवळीसोबत दारूबंदी, जातिभेद, अस्पृश्यता याविरुद्धही लढा दिला.

१९१७ मध्ये महात्मा गांधीजींच्या सहवासात आल्याने वल्लभभाईंचे आयुष्य पूर्णतः बदलले. त्यांचे प्रारंभीचे पाश्चात्त्य कपडे, विलासी जीवन, वकिलीही सोडून खादीचा स्वीकार करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय संग्रामात भाग घेतला. अहमदाबाद नगरपालिकेत निवडून आल्यानंतर तेथे सुधारणा करून अहमदाबाद शहर स्वच्छ नि सुंदर केले. गुजरातच्या जलप्रलयामुळे दुष्काळ पडला असताना गांधीजींच्या अनुपस्थितीत वल्लभभाईंनी स्वतः पुढाकार घेऊन सरकारला कर माफ करायला लावला. हे त्यांचे पहिले यश होय.

ब्रिटिश सरकारने जमिनीचे भाडे भरमसाट वाढविल्याने गुजरातच्या बार्डोलीची जनतेत प्रचंड असंतोष पसरला. स्वतः वल्लभभाई शेतकरी पुत्र. त्यांनी गावच्या खेडूतांना संघटित केले. इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवत सत्याग्रह केला. त्यांची भाषणे लोकप्रिय होत होती. ‘सरकार असेल भले मोठे सावकार, पण शेतकरी कधीपासून त्यांचा भाडेकरू झाला. सरकारने जमीन विलायतेतून आणली आहे का? माझा शेतकरी ऊन, वारा, पाऊस सहन करत, बैलजोडीनेही काम करतो. त्याला कोण घाबरवतो? बार्डोलीच्या सत्याग्रहात वल्लभभाईंनी एका सेनापतीसारखे सर्वांना मार्गदर्शन केल्याने लोकांनी वल्लभभाईंना ‘सरदार’ ही उपाधी बहाल केली. या यशस्वी नेतृत्वानंतर वल्लभभाईंची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये झाली.

१९३२ मध्ये गांधीजींबरोबर वल्लभभाई येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध असताना, विचारांच्या देवघेवीत ते दोघे एकमेकांचे जीवलग झाले. वल्लभभाई गांधीजींना गुरू मानीत. वल्लभभाई लोकांमध्ये, काँग्रेसमध्ये लोकप्रिय असूनही गांधीजींच्या शब्दाला मान देत सच्चा नेता या नात्याने पंतप्रधानपदापासून मागे राहिले.

मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन… अशा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत वल्लभभाईंचे योगदान चालूच होते. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री पदावर कार्यरत असताना निर्वासितांच्या मदतीसाठी, फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचाराला शांत करण्याचे मोठे कार्य केले. जातीय दंगलीत कणखर भूमिका घेऊन आटोक्यात आणल्या. व्यवहारवादी भूमिकेतून हिंदू-मुस्लिमांशी संवाद साधत शांतता निर्माण केली. या साऱ्यांत संस्थानिकांचा आणि विकसितांचा प्रश्न मोठा होता.

भारत स्वतंत्र होताना इंग्रजांनी संस्थानांना स्वायत्तता दिली. स्वतंत्र राहता येईल. यामुळे भारताच्या एकता, एकात्मता किंवा अखंडत्व यापुढे आव्हान निर्माण झाले असते. यासाठी सर्व संस्थानांना भारतात सामील होण्यासाठी सरदार पटेलांनी जे प्रयत्न केले ते सर्वात मोठे, महत्त्वाचे आणि ऐतिहासिक कार्य, त्याची जगात तोड नाही.

वल्लभभाईंचा प्रत्येकावर विश्वास होता. पटेलांनी आपल्या संघटन कौशल्याने आणि देशभक्तीच्या तीव्र भावनेने भारताच्या राजांना देशभक्त होण्याचे आणि देशाच्या स्वातंत्र्यात सामील होण्याचे आव्हान केले. वल्लभभाई म्हणतात, “जगातली कोणतीच शक्ती राष्ट्रभावना नष्ट करू शकत नाही.” देशातील सर्व जनता आणि सीमारेषा एकत्र आल्या, तरच देशाची खरी प्रगती होऊ शकते हे समजावले. अखंड भारतातील सर्व लोकांची नागरी मूल्ये, त्यांच्या सामाजिक, आर्थिक भावना समान आहेत. माणसा-माणसांत नाती जोडण्यासाठी पटेलांनी राजकीय घटकामध्ये विभागलेल्या लोकांना राज्यसत्तेतून मुक्त करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहाशी जोडले. थोडक्यात ‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यांतच पटेलांनी ५६५ संस्थानाचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध अखंड भारताची निर्मिती केली.’ त्यासाठी बुद्धिचातुर्य, मुत्सद्देगिरी, प्रसंगी सैन्यही वापरले. भारताचा आवाका, लोकसंख्या पाहता संपूर्ण जगाच्या इतिहासात हिंसेशिवाय, कोणताही रक्तपात न करता देशातील राज्यांना एकत्र आणणे हे जगाच्या इतिहासात आश्चर्य मानले गेले.

सरदारांचे सर्वात मोठे महत्त्वाचे काम राष्ट्रीय एकात्मतेचे, एकतेचे म्हणजेच संस्थानाच्या विलीनीकरणाचे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीने सरदार वल्लभभाई पटेलांची खऱ्या अर्थाने ‘भारताचे पोलादी पुरुष’ (आयर्न मॅन ) हे इतिहासात सिद्ध झाले. त्यांच्या या कार्यामुळे वल्लभभाईंचा वाढदिवस ३१ ऑक्टोबर हा २०१९ पासून ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाचे औचित्य साधून ‘रन ऑफ युनिटी’चे आयोजन केले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ मा. पंतप्रधान मोदीजींनी गुजरातमध्ये १८२ मीटर उंचीचा ‘स्टॅच्यू ॲाफ युनिटी’ हा सर्वात उंच पुतळा उभारला आहे.

सरदार पटेल मनाने कणखर आणि विचाराने पक्के होते. ‘अत्याचाराच्या नजरेला नजर भिडवून बोला,’ अशी पटेलांची शिकवण आहे. प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर सर्वांसाठी खुले केले. देश हे एकच कुटुंब आहे अशा भावनेने सरदार वागत. वयाच्या ७५व्या वाढदिवशी अहमदाबादमध्ये ते म्हणाले, “उत्पादन वाढावा, खर्च कमी करा.” आजही हा संदेश प्रत्येकासाठी सार्थ आहे. त्यानंतर प्रकृती खालावत ते १५ डिसेंबर १९५० ला निधन पावले.

साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि तत्काळ कृती यावर पटेलांचा भर होता. सरदार पटेलांमुळे देशाचे असंख्य तुकडे होण्याचे वाचले. अशा एकात्म भारताच्या शिल्पकाराला माझा नमस्कार!

mbk1801@gmail.com

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

26 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

56 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

1 hour ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

1 hour ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago