श्रेयस अय्यर, शुभमन गिलही मैदानाबाहेर… इंग्लंडची दमदार खेळी
लखनऊ : आपल्या दमदार खेळीने जगभरात चाहते निर्माण केलेला भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीयांना प्रचंड निराश केले आहे. विश्वचषकातील (World cup 2023) आज भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) सामना लखनऊमध्ये सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या निर्णयावर खूश झाला. भारतालाही प्रथम फलंदाजीच करायची होती, असं त्याने म्हटलं. मात्र, इंग्लंडचा निर्णय त्यांना फायदेशीरच ठरल्याचे सध्याचे चित्र आहे. दमदार खेळी करत त्यांनी भारताच्या तीन अव्वल फलंदाजांना मैदानाबाहेर पाठवले आहे.
भारतीय फलंदाज मैदानावर उतरले आणि इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने चौथ्या षटकात अप्रतिम चेंडूवर शुभमन गिलचा (Shubhman Gill) त्रिफळा उडवला. गिलला ९ धावांवर तंबूत पाठवण्यात आले. विराट कोहली मैदानावर येताच एकच जल्लोष झाला, परंतु त्याला ८ चेंडूंत एकही धाव इंग्लंडच्या गोलंदाजांनी करू दिली नाही. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम कामगिरी करून विराटवरील दडपण वाढवले. त्यामुळे विराटकडून चुकीचा फटका खेळला गेला आणि डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सने सहज झेल घेतला. विराट भोपळ्यावर माघारी परतला.
विराट कोहली आणि शुभमन गिल बाद झाल्यामुळे श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर मोठी जबाबदारी होती. मात्र, श्रेयस अय्यर एका शॉर्ट बॉलवर ४ धावांवर बाद झाला. त्यामुळे १९ षटकांतच भारताच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवण्यात इंग्लंडला यश आले आहे.
इंग्लंडने या स्पर्धेतील शेवटच्या पाच सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. बांगलादेशचा १३७ धावांनी पराभव करत एकदाच इंग्लंडला यश आले. मात्र, इंग्लंडचा संघ न्यूझीलंडकडून ९ विकेट्सने, अफगाणिस्तानकडून ६९ धावांनी, दक्षिण आफ्रिकेकडून २२९ धावांनी आणि श्रीलंकेकडून ८ विकेट्सने पराभूत झाला. याउलट भारत हा आतापर्यंत झालेल्या सामन्यांतील अपराजित संघ आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण आपली जादू दाखवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.