- कथा : रमेश तांबे
अवी आता भाषणाच्या शेवटाकडे आला अन् हा मैत्रीचा समुद्र, अथांगता ज्याच्यामुळे मी अनुभवली तो माझा जीवाभावाचा सखा, त्याचे नाव म्हणजे सुजय, होय सुजय महाजन! सारी सभा अवाक् झाली. कारण साऱ्यांना माहीत होतं, अवीचा खास मित्र सुजय नसून रवीच आहे. मग असे काय झाले?
अवी आणि रवी ही जोडगळी शाळेत प्रसिद्ध होती. इयत्ता पहिलीपासून आत्ता इयत्ता सातवीपर्यंत ते दोघे नेहमीच सोबत होते. दोघेही अभ्यासात हुशार. खेळ असो वा सांस्कृतिक कार्यक्रम दोघांचा सहभाग हा ठरलेलाच. शालेय शैक्षणिक स्पर्धांमधून दोघांची बक्षिसे ठरलेलीच असायची. नृत्य वक्तृत्व, वादविवादात या दोघांचा सर्वत्र संचार असायचा. वर्गातले पहिले दोन क्रमांक त्या दोघांनी कधीच सोडले नाहीत. वर्गात बसताना दोघेही एकाच बाकड्यावर बसायचे. दोघांचे स्वभाव, दिसणे यात इतके साम्य होते, की ते दोघे जुळे भाऊच वाटायचे. कोणालाही हेवा वाटावा अशीच दोघांची मैत्री होती. कारण या दोघांत कधीच बेबनाव झाला नव्हता की कधी भांडणे! अशी मैत्री, अशी दोस्ती साऱ्या शाळेत चर्चेची गोष्ट होती!
पण या मैत्रीला, या दोस्तीला एक दिवस चांगलेच ग्रहण लागले. त्यासाठीचे निमित्तही अगदी साधेच होते. शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. अवीने-रवीने या दोघांनीही त्यात भाग घ्यायचे ठरवले. स्पर्धेसाठी विषय होता मैत्री! तो विषय इतका साधा, सोपा होता की अनेक वक्ते या स्पर्धेत भाग घ्यायला उत्सुक होते. पण अवी आणि रवीचा दबदबाच इतका प्रचंड होता की, साऱ्यांना वाटले या दोघांनाच बक्षीसं मिळणार. कारण मैत्री या विषयावर या दोघांपेक्षा अधिक चांगले कोण बोलणार. कारण या साऱ्या शाळेने या दोघांची प्रगाढ मैत्री बघितली होती. मैत्रीचे अनेक मापदंड त्यांनी उभे केले होते. साधारण दहा-बारा मुला-मुलींनी स्पर्धेसाठी नावे दिली होती. स्पर्धेचा दिवस उजाडला. हॉलमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी फक्त एकच क्रमांक काढण्यात येणार होता. म्हणून अवी आणि रवीने दोघांत असे ठरवले की कुणीतरी एकानेच भाग घ्यायचा, कारण बक्षीस आपल्यालाच मिळणार, याची त्यांना खात्री होती. म्हणून अवीने भाग घ्यायचा असे ठरले. स्पर्धेला सुरुवात झाली. एका मागोमाग एक वक्ते आपल्या तयारीनुसार बोलत होते.
आता अवीची वेळ झाली. पुढील स्पर्धक “अविनाश सागवेकर” असे नाव पुकारताच श्रोतृवर्गांमधून एकच उत्साहाचा सूर उमटला. कारण प्रत्येकाला ठाऊक होते; हाच तो बक्षीस मिळवणारा विद्यार्थी आणि मैत्री या विषयावर खऱ्या अर्थाने बोलू शकणारा! तीन मिनिटांत आपले विचार मांडायचे होते. मैत्री विषयावर अवीचे भाषण सुरू झाले. मित्रप्रेम, मदतीची निरलस भावना, निरपेक्ष दृष्टीने केलेली एकमेकांना साथ. कितीतरी उदाहरणे देत, मराठी भाषेचा अप्रतिम नमुना सादर करीत अवीने मैत्री या विषयावर आपले विचार मांडले. रवी या आपल्या हुशार मित्रावर खूप खूश होता. कारण अलंकारिक मराठीचे उत्कृष्ट दर्शन तो घडवत होता. अवी आता भाषणाच्या शेवटाकडे आला. अन् हा मैत्रीचा समुद्र, ही मैत्रीची सखोलता, अथांगता ज्याच्यामुळे मी अनुभवली तो माझा जीवाभावाचा सखा, माझा मित्र; त्याचे नाव म्हणजे सुजय, होय सुजय महाजन!
सारी सभा अवाक् झाली. कारण साऱ्यांना माहीत होतं, अवीचा खास मित्र सुजय नसून रवीच आहे. मग असे काय झाले? त्यांनी सुजयचे नाव का घेतले? तसा सुजय हा वर्गावर ओवाळून टाकलेला मुलगा. भांडणं, मारामाऱ्या, मुलांना त्रास देणं यात त्याचा हातखंडा. या सुजयचं नाव अवीने घ्यावं याचं साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. माझा खरा मित्र सुजय हे नाव ऐकताच खरा धक्का बसला तो रवीला. गेले दहा वर्षे ते सोबत होते. जीवाला जीव देत होते. पण अवीने आपले नाव न घेता सुजयचे नाव घेतले म्हणूून रवीचा चेहरा पार पडला होता. कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्याने डोळे पुसले. हे सारे आजूबाजूची मुले दुरून पाहतच होती. यथावकाश स्पर्धेचा निकाल लागला. बक्षीस अपेक्षेप्रमाणे अवीला मिळाले. टाळ्यांच्या गजरात अवीने बक्षीस घेतले. सुजय महाजनला मानाने व्यासपीठावर बोलून घेतले आणि त्याच्यासोबत फोटोदेखील काढले गळ्यात हात घालून! त्या दोघांनी अभिनंदनचा स्वीकार केला. या साऱ्या गदारोळात सुजयला कळेला की, अवीने माझे नाव का घ्यावे? त्याचा खरा मित्र मी कधीपासून झालो? स्पर्धा संपली. अवी-रवीचे काहीतरी बिनसले यावर साऱ्या शाळेचेच एकमत झाले होते.
पण काय आश्चर्य! दोन दिवसांनी शाळा भरली तेव्हा अवी-रवी पुन्हा एकत्र हास्यविनोद करत शाळेत आले. एकाच बाकावर बसले. असे वागले की जणू काही घडलेच नाही. मुलांना काहीच कळेना. पण चार दिवसांनी सारा उलगडा होऊ लागला. वर्गातल्या उनाड, टवाळ मुलाला म्हणजेच सुजयला पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी या दोघांनी संगनमताने, अगदी ठरवून सुजयला व्यासपीठावर बोलावलं. सर्वांसमोर त्याचं कौतुक केलं. त्यामुळे सुजय पूर्णपणे अंतर्बाह्य बदलून गेला. त्यानंतर भांडणं, मारामाऱ्या यापासून सुजय एकदम दूर गेला. अभ्यासात लक्ष घालू लागला. सर्वांशी आदराने प्रेमाने बोलू लागला. खरेच मैत्री या शब्दाने सुजयवर अशी काही जादू केली होती की बस! सुजय एक चांगला मुलगा बनला आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा अवी आणि रवीची जोडी शाळेत चर्चेचा विषय बनली.