मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
पावसाळा संपत आलेला असतो. हिवाळ्याची चाहूल लागायला अजून वेळ असतो. धरतीच्या सळसळीने मन मोहोरत असते. तिच्या सर्जनशक्तीच्या हिरव्या खुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात. शेते नि शिवारे आनंदात डुलत असतात. हिरवाईचा हा सोहळा नवरात्रात सर्वांगाने साकार होतो. नुकतेच हे आनंदपर्व आपण अनुभवले. या दिवसांमध्ये घराघरांत प्रसन्नता असते. स्त्रियांच्या उत्साहाला पारावार नसतो. स्त्रीशक्तीचे गौरव सोहळे, गरब्याचे फेरे, घटपूजा या सर्वांसह नवरात्रीच्या दिवसांचे वातावरण चैतन्यशील होते. या सर्व आनंदाचा उद्गार भोंडला व भुलाईगीतांतून साकार होताे.
साध्या-भोळ्या पार्वतीला,
आणू फुले पूजेला…
मनोमनी प्रेम ठेवू,
तिचे काही गुण घेऊ….
तेच दागिने मोलाचे,
भुलाबाईच्या तोलाचे…
अशा तऱ्हेने घरोघरीची संसारचित्रे भुलाबाईंच्या गीतांतून व्यक्त झाली आहेत.
आपे दूध तापे त्यावर पिवळी साय,
लेकी भुलाबाई तोडे लेवून जाय…
कशी लेवू दादा घरी नणंदा जावा,
करतील माझा हेवा….
किंवा
कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने,
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई,
आता तरी जाऊ का माहेरा… सुनेने माहेरी जाण्याकरिता हट्ट करणे नि सासूने अडवण्याकरिता विविध कारणे शोधणे… या आशयाचे हे गाणे…!
नवरात्रासारख्या सणाचे निमित्त शोधून आपल्या दैनंदिन कामाच्या चक्रातून स्त्रियांनी स्वत:करता वेळ काढणे, खेलांतून आपली सुख-दु:खे मोकळी करणे ही गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण ठरते. भोंडला, भुलाबाईचे फेर, खेळ गाणी, त्यातून आकारणारा ताल-लयीचा मेळ याचे स्त्रियांना वाटणारे अप्रूप समजू शकते. पण वाचनासाठी आपल्या दैनंदिन चक्रातून वेळ काढणे हे अविस्मरणीय! १४ व १५ ऑक्टोबर रोजी योगेश जोशी यांनी अक्षरमंचच्या माध्यमातून आयोजित केलेल्या सलग ३६ तासांच्या वाचनयज्ञात सहभागी होता आले. ज्या सत्राकरिता मी आमंत्रित होते, ते स्त्रियांसाठीचे सत्र होते.
‘शांताबाई शेळके कट्टा’ असे नाव असलेल्या अडीच तासांच्या सत्रात विविध वयोगटांतील स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. काही महाविद्यालयीन, काही मध्यमवयीन, तर काही साठीच्या पलीकडच्या!मानिनी महाजन या माझ्या उत्साही मैत्रिणीने या सत्राचे निवेदन, तर केलेच पण आपल्या विविध सख्यांना या वाचनयज्ञात सहभागी व्हायला लावले. कविता, ललितलेख, नाटक, माहितीपर लेख, भावगीत असे विविध साहित्यप्रकार अभिवाचनातून सादर करणाऱ्या मैत्रिणी विविध ठिकाणांहून कल्याणला पोहोचल्या होत्या. डॉक्टर अपर्णा अष्टेकरांनी ‘कविता हे माझे बाल…’ अशी सुंदर उपमा देत कवितेचे वर्णन केले नि सत्र रंगतच गेले.
कथ्थक नृत्यविशारद तरुण मैत्रीण तिच्या सादरीकरणाने जिंकून गेली, तर स्वतः ग्रंथपाल असलेली मैत्रीण कवितेच्या ओढीने आली. ऐंशीच्या टप्प्यावरील भारती मेहता हाडाच्या कवयित्री. आधुनिक घरांमध्ये माणसे एकमेकांपासून किती दुरावली आहेत, हे वास्तव मांडणारी त्यांची कविता चांगलीच दाद मिळवून गेली. चार-पाच जणींच्या एका गटाने राम गणेश गडकरींच्या एकच प्यालाचे बहारदार वाचन केले. वाचनसंस्कृती टिकवण्याकरिता योगेश जोशी व अक्षरमंचने हा अभिनव प्रयोग केला नि मुख्य म्हणजे पुस्तकांशी मैत्री करणाऱ्या स्त्रीवाचकांनी तो यशस्वी करण्यात मोठे योगदान दिले. वाचनाची असोशी असणारा स्त्री वाचकवर्ग समाजात टिकून आहे, यावर शिक्कामोर्तब केले. छापील कवितेपासून फेसबुकवरील लेखांपर्यंत विविध माध्यमांतून स्त्री वाचकवर्गाचा संचार आहे, हे सिद्ध केले. यातल्या अनेक स्त्रिया लिहित्या होत्या. भोंडला असो वा वाचनयज्ञ, स्त्रियांचा उत्साह तोच! कारण त्यांना व्यक्त होण्याची ओढ आहे. अभिव्यक्तीच्या विविध आविष्कारांमध्ये समरस होणे ही त्यांची निकड आहे. मुख्य म्हणजे त्यांचा त्यांचा अवकाश शोधण्याइतक्या त्या खंबीर आहेत.