- ऐकलंत का! : दीपक परब
‘सेक्स्टॅार्शन’वरील ‘कांड’ येतेय मराठी ओटीटीवर
सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. सध्या समाजात खंडणीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावतोय. समाजातील विविध स्तरांतील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर सेक्स संदर्भातील व्हीडिओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्यूहात अडकतात. समाजाच्या भीतीपोटी, शरमेखातर या महाजालमध्ये अडकलेले अनेकजण योग्य पाऊल उचलत नाहीत. समाजातील याच भयाण वास्तवावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. भिमराव काशिनाथ मुडे दिग्दर्शित ‘कांड’ या वेबसीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच झळकले असून मनवा नाईक, हरीश दुधाडे, भिमराव काशिनाथ मुडे यांनी या सीरिजचे लेखन केले आहे. प्लॅनेट मराठी आणि मॅन्यूएला क्रिएशन्स निर्मित या वेबसीरिजचे अक्षय विलास बर्दापूरकर आणि मनवा नाईक हे निर्माते आहेत.
माधुरी दीक्षितचा ‘पंचक’ वर्षारंभी
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने दसऱ्यानिमित्ताने तिच्या आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’ची घोषणा केली आहे. माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी ‘पंचक’ या आगामी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक खास व्हीडिओ शेअर करून माधुरी आणि श्रीराम नेने यांनी त्यांच्या या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. हा चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी ‘१५ ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी निर्मित केलेला तो पहिला मराठी चित्रपट होता. आता त्यांच्या ‘पंचक’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. माधुरीची ‘द फेम गेम’ ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.