Saturday, July 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजBird of paradise : पृथ्वीवरील स्वर्गीय पक्षी

Bird of paradise : पृथ्वीवरील स्वर्गीय पक्षी

  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

स्वर्गीय पक्ष्याच्या पंखांचे आकार वाटेल तसे वळू शकतात. कधी लांब तर कधी गोल वळलेले, कातरलेले वाटेल तसे वळणारे, फिरणारे असे पंख. नृत्य करताना त्यांचे पंख झालर लावल्यासारखे किंवा स्कर्ट घातल्यासारखे वाटतात. हा पक्षी पूर्णपणे चमकदार काळ्या रंगाचा असतो.

“बर्ड ऑफ पॅराडाईज” म्हणजेच स्वर्गीय पक्षी किंवा नंदनवनातील पक्षी असे या पक्ष्यांना म्हटले जाते, कारण हे अवर्णनीय सुंदर असतात. हे पक्षी अतिशय सुंदर असल्यामुळे युरोपियन लोक यांना स्वर्गातून आलेले पक्षी म्हणतात. हे पक्षी जास्तीत जास्त इंडोनेशिया, पापुआ, न्युगिनी आणि पूर्व ऑस्ट्रेलिया येथे आढळतात. तसेच भारत, कोस्टारिका, ब्राझील, एक्वाडोर येथेही अनेक प्रजाती आढळतात. हे पक्षी वर्षावन आणि दाट जंगलात आढळतात. जंगलामध्ये या पक्ष्यांना शोधणे फार कठीण असते. सिकल-टेल्स, जीनस सीसीनुरूस, लांब शेपटाचे, सिकलबिल्स, रायफल बर्ड्स, जीन्स पिलोरीस, लोफोरिनास, लाल स्वर्गीय पक्षी अशा अनेक प्रजाती आहेत. यांच्या जवळजवळ ४५ प्रजाती आहेत. हे पक्षी प्रौढ होण्यासाठी कधी कधी सात वर्षे सुद्धा लागतात. पण जेव्हा प्रौढ होतात, तेव्हा त्यांच्या पंखांची वाढ पूर्ण होत असते. या प्रजातीमध्ये १५ सेंटिमीटरपासून ते ४४ सेंटिमीटरपर्यंत पक्षी आढळतात. यांचे आयुष्य पाच ते आठ वर्षांचे असते.

भारतात आढळणारी यातीलच एक उपजाती आहे. एशियन “पॅराडाईज फ्लाय कॅचर” म्हणजेच स्वर्गीय नर्तक. हे पक्षी खूप दुर्मीळ आहेत आणि घनदाट जंगलात राहतात. तसं पाहिलं, तर शहरातही दिसतात. पॅराडाईज फ्लाय कॅचरचे डोके काळ्या रंगाचा चमकदार मुकुट घातल्यासारखा दिसतो. लाल, तपकिरी, राखाडी आणि पांढरा अशा चमकदार रंगांचा संगम असतो. खूप लांब शेपूट असते. हवेत उडणारे कीटक हे खूप सहज पकडतात आणि खूप सुंदर नृत्य करतात म्हणून यांना पॅराडाईज फ्लाय कॅचर किंवा स्वर्गीय नर्तक असे म्हणतात. त्यांना दहा विविध प्रकारचे पंख असतात. त्यांच्या शेपटीमध्ये १२ पीस असतात. हे अजिबात स्थिर नसतात, त्यामुळे सतत नृत्य करत आहेत की काय असे वाटते. याचा आवाज खूप गोड असतो. हा मध्य प्रदेश राज्याचा राज्यपक्षी आहे.

या स्वर्गीय पक्ष्याच्या पंखांचे आकार वाटेल तसे वळू शकतात. कधी लांब तर कधी गोल वळलेले, कातरलेले वाटेल तसे वळणारे, फिरणारे असे पंख. कधी डोक्यावरील लांब पंख, तर कधी तुरे, तर कधी मुकुट, लांब शेपूट किंवा पूर्ण गोलाकार शेपूट अशा विविध आकारांनी, रंगांनी सजलेला हा पक्षी. नरांना परिपक्व होण्यासाठी बराच वेळ लागतो. मादीपेक्षा नर अतिशय सुंदर असतो.

या पॅराडाईज पक्ष्यांमधील एका प्रजातीमधील नर आपल्या मादीला बोलावण्यासाठी जंगलातील जागा स्वच्छ करतो. वेगवेगळे आवाज काढत, वेगवेगळ्या प्रकारे पंख फडफडवत आणि चमकवत नृत्य करतो, मादीला साद घालतो. तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. नृत्य करताना त्यांचे पंख झालर लावल्यासारखे किंवा स्कर्ट घातल्यासारखे वाटतात. हा पक्षी पूर्णपणे चमकदार काळ्या रंगाचा असतो. नर नृत्य करताना गळ्याखालील इंद्रधनुषी झालर छातीवर फुगवून तालबद्धपणे नृत्य करतो. गंमत म्हणजे मादी उत्तम नृत्य करणाऱ्या नरालाच निवडते. काही प्रजातींमध्ये नर एक पत्नी असणारा असतो. हे पक्षी तसे प्रेमळ असतात. मादी वेगवेगळ्या नरांची निवड करते. घरटे साधारणपणे मादीच बनवते. जास्तीत जास्त एक किंवा दोन पिल्ले देते आणि पिल्लांचा सांभाळ फक्त मादीच करते.

९० बाय ९० आकाराच्या या फोटोतील कलाकृतीमध्ये मी एकूण चार पक्षी दाखविले आहेत. ग्रेटर सुपर बर्ड ऑफ पॅराडाईज आणि रेड बर्ड ऑफ पॅराडाईज यांची जोडी नृत्य करताना दिसत आहे. या पक्ष्यांमधील ग्रेटर सुपर बर्ड ऑफ पॅराडाईज हा पक्षी नृत्य करताना गुडघ्यातून वाकून उड्या मारत असतात, आपल्या पायांवर गोल गोल फिरतात आणि एका विशिष्ट पद्धतीने एकमेकांच्या समोर पायांवर घसरून जवळ येत असतात, अगदी मायकल जॅक्सनसारखे. या पक्ष्यांसारखे नृत्य कोणीही करू शकत नाहीत. मादीला आकर्षित करण्यासाठी असलेले हे नृत्य कमीत कमी एक तास तरी चालते.

जेव्हा हा पक्षी मी बनवण्यासाठी घेतला, तेव्हा पॅराडाईज बर्ड्समधील सगळे पक्षी मी बघितले, त्यांचे वेगवेगळे प्रकारचे कलागुण बघितले आणि मगच त्यातील काही निवड करून त्यांच्या संयोजनाने ही कलाकृती करावयास घेतली. या कलाकृती करताना मला आलेला एक अनुभव सांगते. एक दिवस गंमत अशी झाली की, मी ब्ल्यू बर्ड बरीच मेहनत करून बनवला. खूप सूक्ष्म कात्रणं केली अगदी केसासारखी. झाडावर हा उलटा पंख पसरवून लटकलेला आहे असं चित्रात दाखवायचं होतं. तो पक्षी मी झाडावर उलटा लटकवला. जेमतेम सहा सेंटिमीटरचा पक्षी बनवायला मला १५ दिवस लागले. रात्री दोन वाजेपर्यंत तो पूर्ण झाला आणि मी शांतीने झोपायला गेले. रात्री तीन वाजता मला जाग आली आणि बघितलं, तर दारामध्ये दोन डोळे लकाकत होते. घाबरून उठले आणि लक्षात आलं की, आमचा रेनबो नावाचा जर्मन शेफर्ड कुत्रा उभा होता. मी उठून त्याला म्हटलं, “जा तुझ्या जागेवर जाऊन झोप” म्हणून त्याच्या मागे गेले. अचानक तो माझ्या पेंटिंगच्या रूममध्ये गेला. त्या अंधारात सुद्धा मला काहीतरी वेगळं घडलय वाटायला लागलं. लाईट लावून पाहते तो त्या ब्ल्यू बर्डचे सगळे पंख रूममध्ये अस्ताव्यस्त पडलेले होते आणि मी रडत रडतच ओरडले, “रेनबोssssss” मला कळून चुकले की, रेनबोने तो पक्षी खरा समजून तिथून काढला आणि सगळी पिसं पिसं पसरवली. काय करावे काहीच सुचले नाही. पण घरच्यांनी समजूत काढली की, त्याने तुझ्या कलेला पावती दिली. तो पक्षी त्याला खरा वाटला. खरं तर या पक्ष्याचे चमकदार निळसर रंग खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात आकर्षक आणि चमकदार दिसत होते, त्यामुळे सहाजिकच रेनबोला हा पक्षी खरा वाटला असेल. अशा या पावत्या मला कधी कधी खूपच महागात पडल्या. या कलाकृती करताना असे मला अनेक अनुभव येत होते. नशीब की, तेव्हा मी तो एकच पक्षी तिथे चिटकवला होता. त्यानंतर मला माझ्या कलाकृतींना खूप सांभाळून ठेवावे लागत होते, अगदी सर्वांपासूनच.

ही कलाकृती बनविताना जंगलातील बारकावे काढताना खूप आनंद होत होता. झाडांवर असणाऱ्या बुरश्या, झाडांवर चढणाऱ्या फळांच्या-फुलांच्या वेली, सुकलेली पानं, फांद्यांवर असणारं शेवाळ, बग्जसारखा कीटक, सुकलेले आणि नुकतेच ताजे उगवलेले गवत, कोवळी पालवी, बांडगूळ, वेली बनविताना गर्द वनराईत गेल्यासारखे वाटत होते. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचं निरीक्षण होत होतं. खूपच अप्रतिम अनुभव होता.

या स्वर्गीय पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते की, हे पक्षी डोक्यापासून ते शेपटापर्यंत खूप वेगवेगळ्या आकाराचे, काही मुकुटधारी, तलम-चमकदार इंद्रधनुषी रंगीबेरंगी पंखांचे, नर्तक, गोड आवाज काढणारे, सर्वांना आकर्षित करून घेणारे आपल्याला स्वर्गात असल्याचा आनंद देणारे… असे हे पक्षी खरोखरच परमेश्वराने आपल्यासाठी स्वर्गातून पाठवले की काय असे वाटणारे, केवळ आपल्या विध्वंसक प्रवृत्तीमुळे या जगातूनच नामशेष होतात की काय असे वाटते. हे पक्षी अतिशय सुंदर असल्यामुळे यांची खूप मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते आणि यांच्या पंखांचा उपयोग टोप्या आणि पोशाखांमध्ये सजविण्यासाठी केला जातो. शिवाय जंगलतोड या सर्वांमुळे आता ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वृक्षतोड झाल्यामुळे अन्न आणि निवारा या दोन्हींपासून हे पक्षी वंचित होतात आणि मग त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. शास्त्रज्ञांच्या मते आता या जगात फक्त दहा हजार स्वर्गीय पक्षी शिल्लक आहेत. जर यांचे संरक्षण आणि संवर्धन झाले नाही, तर भावी पिढ्यांना हे पक्षी पाहता येणार नाहीत.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -