वेळेचे नियोजन हवे...

रवींद्र तांबे


आपण रोज मोबाइलच्या दुनियेत वावरत असताना वेळेकडेसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या तरुणाई नेहमीच मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात करीत असल्याचे पाहायला मिळते. तेव्हा विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करण्यासाठी आवश्यक कामासाठी मोबाइलचा वापर करावा. मनुष्याच्या जीवनात वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे असते. जो वेळेचे नियोजन अचूक करतो, तो जीवनात यशस्वी होतो, हा निसर्गाचा नियम आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या तरुणाई नेहमीच अभ्यास करताना वेळेचे नियोजन करायला हवे. वेळ कधीही आपल्यासाठी थांबत नाही, तर एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. जीवनात उत्तमप्रकारे यश संपादन करायचे असेल तर वेळेच्या नियोजनाशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थीदशेत अभ्यासाचे नियोजन करीत असताना वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. अध्यापकांनी अध्यापन करण्यापूर्वी अभ्यासाचे नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी अगदी सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना नियोजन या संकल्पनेचा अर्थ शिक्षकांनी समजावून सांगावा.


एकदा का विद्यार्थ्यांना नियोजन म्हणजे काय? नियोजन कसे केले जाते? याची अचूक माहिती मिळाली की, विद्यार्थी बिनधास्तपणे वेळेचे नियोजन करू शकतात. याचा परिणाम विद्यार्थी अधिक जोमाने अभ्यास करू लागतात. त्यासाठी नियोजन ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे असते. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यावर आपल्याला चांगले गुण संपादन करण्यासाठी मुलांनो अभ्यासाचे नियोजन करा, असे अध्यापक वर्ग सांगत असतात. मात्र नियोजन ही संकल्पना न समजल्यामुळे त्याकडे काही विद्यार्थी दुर्लक्ष करतात. असे असले तरी ते नियमित अभ्यास करीत असतात. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनात नियोजनाला खूप महत्त्व आहे.


अभ्यासाचे नियोजन करा की, लागलीच विद्यार्थी नियोजन कसे करावे असे एकमेकांना प्रश्न विचारीत असतात. कारण नियोजनाबरोबर अभ्यासक्रम समजलेला नसतो. त्यासाठी अगोदर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल. त्यानंतर अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी वेळेचे नियोजन करावे लागेल. यामध्ये नियमितपणा हवा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव निर्माण होत नाही. आजही अनेक विद्यार्थी काम करून शिक्षण घेतात. तरीपण समाधानकारक गुण मिळवितात. असे विद्यार्थी वेळेचा दुरुपयोग करीत नाहीत. मिळेल त्यावेळेला अभ्यास करताना दिसतात. त्यांना मिळणारा मोकळा वेळ अतिशय महत्त्वाचा असतो. त्याचा ते उत्तमप्रकारे वापर करून घेतात. वेळेचे नियोजन करीत असताना एका दिवसाच्या २४ तासांचे योग्य नियोजन विद्यार्थ्यांनी करायला हवे. म्हणजे या २४ तासांमध्ये ठरविलेला अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही वेळेचा योग्यप्रकारे वापर करता, असे म्हणता येईल. जर तुम्ही अभ्यास वेळेत केला नाही तर तुम्हाला वेळेचे नियोजन करता आले नाही, असे म्हणता येईल. यासाठी तुम्हाला वेळ ठरवावी लागेल. त्यावेळेतच अभ्यास संपवावा लागेल.


पहिल्या सुरुवातीला वेळेचा अंदाज येणार नाही. एखाद्या विषयाला कमी-जास्त वेळ होऊ शकतो. तेव्हा अभ्यासाचा वेळ निश्चित करा. त्याप्रमाणे इतर कामे करून नियमित अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांचा अभ्यासही चांगल्याप्रकारे होऊ शकतो. वेळेनुसार अभ्यास केल्यास अभ्यासाची आवड निर्माण होऊन काहीवेळा वेळेच्या अगोदर अभ्यास पूर्ण करून कठीण वाटणाऱ्या विषयाला अधिक वेळ देता येऊ शकतो. हे केवळ वेळेचे नियोजन केल्यामुळे शक्य होते. याचा परिणाम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्याला मदत होते. यात खेळ आणि झोप अतिशय महत्त्वाची असते. तसेच लिहिण्याचाही सराव तितकाच महत्त्वाचा असतो. तेव्हा वेळेचे नियोजन करीत असताना एकूण विषयांची प्रथम यादी तयार करावी लागेल. त्यामध्ये एकूण धडे, कविता व कथा किती आहेत, याची स्वतंत्र यादी तयार करायला हवी. त्यानंतर वेळ ठरवून अभ्यास करावा लागेल. यात विषयाची विभागणी अतिशय महत्त्वाची असते. मात्र एखाद्या विषयाकडे दुर्लक्ष होणार नाही,याची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल. म्हणजेच विद्यार्थ्यांची जबाबदारी अधिक वाढली असे म्हणता येईल. वेळेप्रमाणे अभ्यास करीत असताना विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा असतो.


बरेच विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी पुस्तक घेऊन बसतात. आई-वडील समोर असल्यामुळे फक्त पुस्तक उघडून ठेवतात. मात्र त्यांचे लक्ष दुसरीकडे असते. अशा सवयीमुळे विद्यार्थी आपले नुकसान करून घेत असतात. तेव्हा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी वेळीच आपल्या वाईट सवयींना आळा घातला पाहिजे. असे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सवयी बदलून वेळेला महत्त्व दिल्याने उत्तम गुण मिळवून यश प्राप्त केले आहे. काही विद्यार्थी वेळेकडे दुर्लक्ष करतात. वेळेकडे दुर्लक्ष केल्याने वेळ वाया जातो. तेव्हा विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये. वेळेचे महत्त्व लक्षात ठेवा. अभ्यास हेच माझे ध्येय हे गृहीत धरून मुलांनी अभ्यास करावा. तेव्हा विद्यार्थी जीवनात यशवंत होण्यासाठी वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात वेळेचे नियोजन हाच खरा यशाचा मार्ग आहे.

Comments
Add Comment

तगडा नायक , उमदा माणूस

पंजाबच्या मातीतून आकाराला आलेलं शिल्प म्हणजे धर्मेंद्र. बलदंड शरीर, तितकाच सोज्वळ चेहरा आणि दमदार अभिनय.

सारे काही बेस्टसाठी...

मागील आठवड्यात आपण पाहिलेच की, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भल्याची जणू सर्वांनाच अचानक काळजी वाटू लागली आहे. आजवर

नमस्कार : मानवी नात्यांना जोडणारी शक्ती

‘नमस्कार’ हा शब्द उच्चारताच मनात एक ऊबदार भावना निर्माण होते. समोरच्या व्यक्तीला मान देणे, त्याच्याशी संवादाची

नामुष्कीचा पराभव

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रमाणात मोठमोठी आश्वासने दिली, पैशाची खैरात केली, त्या

डीपफेक आणि एआयवर आधारित गुन्हे : वाढता धोका आणि संरक्षण

गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल) आणि विशेषत: डीपफेक तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात

चीनशी करारामुळे अमेरिकेचा जीव भांड्यात!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अलीकडेच करार झाला. दोन महासत्तांचे