
काय म्हटले आहे मेलमध्ये?
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. म्हणूनच की काय त्यांच्याकडे तब्बल वीस कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेल (Threat mail) त्यांना पाठवण्यात आला आहे. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी या मेलमधून देण्यात आली आहे. संबंधित मेलविषयी पोलिसांना कळवण्यात आले असून हा मेल कोणी पाठवला याचा तपास सुरु आहे.
काल म्हणजेच २७ ऑक्टोबरला मुकेश अंबानी यांच्या अकाऊंटवर एक मेल आला. एका अज्ञात व्यक्तीने इंग्रजीतून हा मेल पाठवला होता. मुकेश अंबानी यांच्याकडे पैशाची मागणी करत त्यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत."
हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.
धमकीची ही पहिलीच वेळ नाही...
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अँटिलियाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती. हे लक्षात घेऊन मुकेश अंबानींना Z+ सुरक्षा देण्यात आली होती, तर नीता अंबानींना Y+ दर्जाची सुरक्षा दिली होती. तसेच सीआरपीएफ (CRPF) ही अंबानी कुटुंबाच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा पुरवते.