- पाचवा वेद : भालचंद्र कुबल
नाट्यनिर्मिती हा पूर्णवेळ व्यवसाय आहे आणि तो करायला इतर व्यवसायांप्रमाणेच मेहनत लागते, क्रिएटिव्हीटी लागते आणि शिक्षित व्यावसायिकता तर लागतेच लागते, इत्यादी नियम धाब्यावर बसवून केवळ नाव छापून आले पाहिजे, या हव्यासापोटी अनेक जण या निर्मितीत नशीब आजमावायला फिरताहेत ते बरोब्बर. या व्यवसायात आधीपासूनच थोडंफार नाव असलेल्या ‘गळाला’ लागतात आणि एका नाटकामागे फार नाही. मात्र चार-पाच लाखांची काशी करून घेतात. या गळाला लागलेल्या तथाकथित निर्मात्यांना आपण या व्यवसायातील सर्वज्ञ असल्याचा दृष्टांत प्राप्त होतो आणि मग ही निर्माती मंडळी पुढल्या दुष्टचक्राच्या उभारणीस लागतात.
आजमितीला हेच सर्वज्ञ निर्माते स्वतःच्या अदमासे हिशोबाने जे नाटक तुमच्या माथी मारतील तेच तुम्हाला बघावे लागतेय, कारण आता नाट्यनिर्माता स्वतःच्या पैशाची १०० टक्के गुंतवणूक या व्यवसायात करताना दिसत नाही. हल्ली कमीत कमी दोन तीन फायनान्सर जमवून नाट्यनिर्मितीचा घाट घातला जातो. त्यामुळे एखादे नाटक फ्लाॅप झाले, तर निर्मितीस लागलेल्या १५-२० लाखांचा तोटा एका व्यक्तीस न होता, तो नाटक “कंपनी”ला सहन करावा लागतो. त्यामुळे पुढल्या नाटकासाठी नवे फायनान्सर गळाला लावून नव्या नाटकाला सुरुवात होते. मराठी माणसाची पॅशन असणाऱ्या गोष्टींमधे ‘नाटक’ ही बाब अग्रस्थानी धरल्यास चार दोन लाख सहज टाकणारे नवनिर्माते फायनान्ससाठी सहज उपलब्ध होऊ शकतात. हे फायनान्सर रिटायर्ड शासकीय अधिकारी किंवा तत्सम वर्गातली मंडळी असतात. नाटकाची प्रचंड आवड असूनही नोकरीमुळे आयुष्यात नाटक या पॅशनसाठी काहिही करू न शकलेले हे ‘बकरे’ असतात, असा आजवरचा माझा सर्वेक्षण अभ्यास सांगतो.
मराठी नाटक जे भरत जाधव, प्रशांत दामले, अशोक सराफ, वैभव मांगले, संजय नार्वेकर आणि भाऊ कदम यांच्याभोवती घुटमळत होते, ते आता बिनचेहऱ्याच्या नटांभोवतीही फेर धरत आहे आणि त्यासाठी खास कंटेटचा बागुलबुवा पुण्यातून इंपोर्ट केला जातोय. तद्दन टाकाऊ आणि थुकरट संकल्पनेला वैचारिक मुलामा चढवून पाच-पंचवीस प्रयोगातून आपले खिसे भरू पाहणाऱ्यांची एक नवी नाटकी जमात दबक्या पावल्याने या इंडस्ट्रीत प्रवेशकर्ती झालीय. कंटेंटला पर्याय नाही म्हणत जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन ही बाब स्वागतार्ह आहे; परंतु जुन्या नाटकांना सद्य काळाचे संदर्भ देऊन चेहरा-मोहरा बदललेले कंटेट आता बघावे लागतील. थोडक्यात पोस्टकोविड काळ ‘कंटेट’ आणि फक्त ‘कंटेट’ असलेल्या नाटकांसाठी सुगीचा आहे, हे निर्विवाद न उलगडलेले सत्य माथी मारले जातेय.
परवा दसरा झाला आणि नाटकांच्या जाहिरातीत किमान सात ते आठ नाटके केवळ १५ नोव्हेंबरपर्यंत येऊ घातलीयत..! म्हणजे पुढल्या एकवीस दिवसात सात म्हणजे दर तीन दिवसांनी एक नाटक रिलिज होताना आपण पाहणार आहोत? एवढा जर नाट्यनिर्मितीचा स्पीड राहिला, तर वार्षिक आर्थिक उलाढाल केवढ्या रकमेची असेल? या विचारानेच गोंधळ उडालाय. तरी बरं, मागील वर्षात प्रेक्षकप्रिय ठरलेली नाटकं केवळ एका हाताच्या बोटांवरील सख्येपेक्षा कमी होती. एखाद्या नाटकाला सातत्याने प्रेक्षक मिळणारा हा काळ नव्हे. तो काळ भूतकाळ होता, हे हल्लीच्या प्रेक्षक संख्येवरून नाईलाजाने म्हणावं लागतंय. काही नाटकं तर प्रेक्षक संपले म्हणून बंद पडली आहेत. हमखास मनोरंजनाचे अॅटमबाँब देखील याच काळात फुसके ठरलेत. सिनेमा बनण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यातील स्टार व्हॅल्यू असलेली मंडळी नाटकात दिसण्याची शक्यता निर्माण झालीय. विशेष म्हणजे यात तरुण वर्गाचा सहभाग अत्यंत अल्प आहे. एखादं सिनेमात गाजलेलं तरुण जोडपं असलेलं नाटक. मात्र माऊथ पब्लिसिटीला बळी पडून बघितलं जातंय. त्यातील क्रॅक केलेल्या जोक्सवर शिट्ट्या किंवा हुकारे ऐकून कुणाला नेमकं काय म्हणायचंय तेच कळंत नसलेली नाटकं सुद्धा पचवावी लागणार आहेत.
२०२४ साल हे राजकारण्यानी हेरून ठेवलेल्या युथ सेगमेंटला (तरुण वर्गाला) टार्गेट करणारे ठरणार आहे. साधारण ४२% तरुण वर्ग २०२४ च्या मतदानास उतरेल, तेव्हा प्रत्येक बाबींमध्ये तरुण वर्गाचा विचार होईल. भिन्न भिन्न रुची असलेला हा वर्ग देशभरात विखुरलेल्या अवस्थेत आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून तो एकसंध करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या जून २४ पर्यंत अंदाजे १५० एकांकिका स्पर्धा केवळ महाराष्ट्रात भरवल्या जातील. सरासरी ४० ते ५० हजार रुपयांच्या बक्षिसांची लयलूट त्यातून होईल आणि मग मिळालेला पैसा पुन्हा तरुण वर्गाकडून नाट्यनिर्मितीत गुंतवला जाईल. व्यावसायिक नाटकांच्या प्रेक्षकांची नाडी माहीत नसल्यामुळे म्हणा किंवा अम्यॅच्युअर (हौशी) रंगभूमीची सवय सुटत नसल्याने नव निर्मितीचा खेळखंडोबा झालेला दिसून येईल. प्रायोगिक किंवा समांतर नाटकांबाबतीत मात्र नाट्यनिर्मिती बाबतचे अंदाज खरे ठरल्यासारखे दिसत आहेत. आजमितीला छोट्या छोट्या थिएटर्समधून बारा ते पंधरा प्रायोगिक नाटके सादर होतायत.
मुळातच प्रेक्षकांकडून सर्वसाधारण अपेक्षा आणि युनिव्हर्सल कंटेट या भांडवलावर या नाटकांना प्रेक्षक मिळत आहेत. मात्र बालनाट्यांची, संगीत नाटकांची आणि ऐतिहासिक नाटकांची पोस्ट कोवीड अवस्था बिकट आहे. नाटक या माध्यमाचं कंबरडं कोविडच्या दोन्ही लाटांनी पार मोडून टाकलं. चित्रपट सावरला, मालिका सावरल्या; परंतु शासनाच्या प्रयोगागणिक मिळणाऱ्या अनुदानातून नाटक हे माध्यम सावरू शकेल का? याबाबत शंका वाटते. प्रायोगिक किंवा समांतर नाटकांबाबतीत मात्र नाट्यनिर्मिती बाबतचे अंदाज खरे ठरल्यासारखे दिसत आहेत. आजमितीला छोट्या छोट्या थिएटर्समधून बारा ते पंधरा प्रायोगिक नाटके सादर होतायत. मुळातच प्रेक्षकांकडून माफक खर्चाची अपेक्षा ठेवून आणि युनिव्हर्सल कंटेट या भांडवलावर या नाटकांना प्रेक्षक मिळत आहेत. मात्र बालनाट्यांची, संगीत नाटकांची आणि ऐतिहासिक नाटकांची पोस्ट कोविड अवस्था बिकट आहे. नाटक या माध्यमाचं कंबरडं कोविडच्या दोन्ही लाटांनी पार मोडून टाकलंय. चित्रपट सावरला, मालिका सावरल्या; परंतु शासनाच्या प्रयोगागणिक मिळणाऱ्या अनुदानातून नाटक हे माध्यम सावरू शकेल का? याबाबत शंका वाटते. यावर अनेक उपाय तमाम नाट्यप्रभुतींद्वारा सुचवले गेलेत. त्यातला महत्त्वाचा उपाय म्हणजे दहा प्रयोगांपर्यंत जर नाटकास प्रेक्षक कमी मिळंत असतील, तर एकंदर मानधन या खर्चाच्या घटकात लक्षणीय घट होणे गरजेचे आहे. लेखक, दिग्दर्शक, नट यांना प्रयोगागणिक द्याव्या लागणाऱ्या मानधनाची रक्कम नाट्यनिर्मिती जगावी म्हणून कमी करणे अत्यावश्यक आहे. सिनेमा आणि सुपाऱ्यांनी मिळवून दिलेलं सेलिब्रिटी स्टेटसची मोजपट्टी नाटकाच्याही मानधनाला लावली जातेय. प्रत्येक वेळी, “निर्माता कमवतो तेंव्हा आमचा कुठे विचार होतो”, “आम्हाला आमचं स्टेटस जपायला खर्च येतो” किंवा “आमच्या फेसव्हॅल्यूमुळेच तर नाटके चालतात” अशी मुक्ताफळे ऐकून व्यवसायासाठी उतरलेला मराठी नाट्यनिर्माता कायम काँप्रमाईज मोडवरच या पोस्ट कोविड उभा असलेलला आपणांस दिसेल. शेवटी हा त्याला विचारत नाही म्हणून तो त्याला मग ते त्यांना आणि अल्टीमेटली प्रेक्षक नाटकाकडे पाठ फिरवतो… आणि हे दुष्टचक्र लाॅकडाऊन संपल्या पासून सुरूच आहे. गेल्या दीड वर्षांत पोस्ट कोविड आर्थिक परीस्थितीची झळ नाट्यनिर्माता व थिएटर मालक किंवा संस्था सोडून इतर कुठल्याही घटकाला बसलेली नाही. त्यात फास्ट रिझल्ट्सवर विश्वास बसत चाललेली तरुण पिढी. न चालणाऱ्या नाटकाची निर्मिती करून चालले नाही, तर बंद करा म्हणून अविचारी सल्ला देण्यापलिकडचे उपाय सुचविण्याव्यतिरिक्त काहीही करत नाही. उपायांची असलेली वानवांमुळे खरंतर सद्याचं मराठी नाटक आर्थिकदृष्ट्या डळमळीत झालंय. या लेखातील अनेक विचार तद्दन व्यावसायिक बुरखे पांघरलेल्या नाट्यनिर्मात्याना बिलकूल पटणार नाहीत, कारण या व्यवसायात जो तो केवळ आणि केवळ स्वतःचाच विचार करतो जो आजचा आहे आणि घातक आहे..!