पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्तेवर येताच ‘सबका साथ, सबका विकास’ हे ब्रिद नजरेसमोर ठेवून देशात सर्वांगीण विकासाचे पर्व सुरू केले. त्यांनी गरीब, कामगार, शेतमजूर, शेतकरी, बालिका, महिला अशा सर्वांसाठी अभिनव अशा योजनांची आखणी केली. केवळ योजना तयार करून चालणार नाहीत, तर त्या योजनांची सर्व स्तरावर यशस्वीरीत्या अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, याची पुरेपूर जाण पंतप्रधान मोदी यांना असल्याने त्यांनी सर्व संबंधितांना त्या दृष्टीने कामास लावले. त्यामुळेच त्यांच्या कार्यकाळातील अनेक योजना या सफल झालेल्या किंवा त्यांचा लाभ अगदी तळागाळापर्यंतच्या घटकांना झालेला आपल्याला दिसतो.
देशात सर्वधिक काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळातही अनेक लोकोपयोगी योजना त्या त्या काळातील पंतप्रधानांनी घोषित केल्या. पण त्यापैकी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने त्या योजना तशाच कागदावर राहिल्या आणि वाया गेल्या, तर काही योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्याने किंवा त्या राबविताना स्थानिक पातळीवर किंवा पक्षीय पातळीवर राजकारण झाल्यास अशा योजनांचा परिणाम हा नगण्य ठरतो व त्या योजना कितीही चांगल्या जरी असल्या तरी त्या फसल्याचा शाप त्यांच्या माथी बसतो. या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यकाळात घडू नयेत, याची सर्व काळजी पंतप्रधान मोदी यांनी घेतल्याने त्यांनी आणलेल्या योजनांचे लाभ सर्व संबंधितांना होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे २०१४ च्या आधी दहा वर्षांत जेवढे काम झाले नाही, त्याच्या सहापट अधिक काम विविध क्षेत्रांत मोदी यांच्या सरकारने करून दाखविले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून विकासकामांचे मोठ-मोठे आकडे सांगितले जात आहेत. त्यापूर्वीच्या काळात असे मोठे आकडे केवळ भ्रष्टाचारासाठी सांगितले जात होते. शेतकऱ्यांच्या मतांवर अनेकजण राजकारण करताना दिसतात. मात्र त्यांना पाण्याच्या एका थेंबासाठी तरसविले गेले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आजपर्यंत फक्त शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले गेले. निळवंडेसारखा प्रकल्प एवढे वर्षं रखडल्याचा उल्लेख केला. हा प्रकल्प मार्गी लागल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल; परंतु जलसिंचन वाढविण्यासाठी ‘बळीराजा जलसंजीवनी योजने’ची सुरुवात मोदी सरकारने केली अाहे. याच माध्यमातून राज्यातील २६ प्रकल्प पूर्ण करणे प्राधान्यक्रम आहे. त्याच मुद्द्यावरून मोदी यांनी यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठविताना आतापर्यंत शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल जाहीरपणे विचारून पवारांची व त्यांच्या पाठीराख्यांची चांगलीच गोची केली. तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प आम्ही पूर्ण करीत आहोत, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. हे करताना त्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून शेतकऱ्यांनी आपला विकास साधावा, असे भावनिक आवाहनही केले. कारण बरेचदा लोकांना पाण्याचे महत्त्वच कळत नाही किंवा पाण्याचा गैरवापर केलेला आपल्याला दिसतो.
मोदींच्या सरकारने योजनांची अंमलबजावणी करताना गरिबांच्या कल्याणाला प्राधान्यक्रम दिला आहे. योजनांची यशस्वी अंमलबजावणी हाच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय असल्याचे ठाऊक असल्याने पंतप्रधान मोदी यांनी अनेक प्रकल्प, येजनांची पूर्तता करण्यावर लक्ष केंद्रित केले, तर ज्या काही महत्त्वपूर्ण योजना अपूर्णावस्थेत असतील किंवा काही कारणांनी त्या रखडल्या असतील, तर त्यांची त्वरित पूर्तता करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. अशा प्रकारे सत्तेवर येताच त्यांनी देशभरात ज्या ज्या राज्यांमधील प्रकल्प अपूर्णावस्थेत असतील, तर ते पूर्ण करण्यावर भर दिला. त्यांच्या काम करण्याच्या या धोरणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिर्डीत आल्यावर प्रथम साई समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते येथे सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थानतर्फे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक, भव्य दर्शन रांगेचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे या दर्शनरांगेसाठीच्या प्रकल्पाचे काही वर्षांपूर्वीच मोदी यांनी भूमिपूजन केले होते. त्यानंतर त्यांनी निळवंडे धरणावर जाऊन जलपूजन आणि कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर शिर्डी विमानतळाशेजारी आयोजित सभेत मोदी यांनी केंद्र आणि राज्याची विकासकामे मांडली.
देशाच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी आपला देश जगातील एक विकसित राष्ट्र बनायला हवा, त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. याचाच अर्थ मोदी हे किती दूरदृष्टीचे नेते आहेत, हे सिद्ध होते. कारण, सध्या देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मोदी हे पुढील २५ वर्षांनंतर येणाऱ्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाचा विचार आता करीत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यादृष्टीने देशाने प्रगती साधून देश एक विकसित राष्ट्र व्हावा, हे मोदींचे स्वप्न आहे व त्या दृष्टीने त्यांची पावले पडत आहेत हे दिसते. एकूणच मोदी आणि त्यांचे सरकार ‘सब का साथ, सब का विकास’ हे ध्येय घेऊन जोमाने काम करीत आहे.